जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाला 871 कोटी रुपये कर्जमाफीचा लाभ

शेतकरी सन्मान योजना : ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 1 मेपर्यंतची मुदतवाढ
नगर – राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील 2 लाख, 47 हजार 462 शेतकऱ्यांना 871 कोटी 44 लाख रुपयांचा लाभ मिळाला आहे. या योजनेत यापूर्वीच्या कालावधीत अर्ज करण्यापासून वंचित राहिलेल्या
शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन पध्दतीने अर्ज करण्याची मुदत दि. 1 मेपर्यंत वाढवण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी या वाढीव कालावधीचा लाभ घेऊन ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आहे. राज्य शासनाच्या या योजनेत सहभागी असलेल्या जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना
कर्जमाफीचा लाभ निश्‍चितपणे मिळेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेमार्फत पात्र 210395 लाभार्थ्यांना रक्कम रुपये 614.23 आणि व्यापारी, ग्रामीण व खाजगी बॅंकामार्फत पात्र 37061 लाभार्थ्यांना रक्कम रुपये 257.21 असा एकूण 247462 लाभार्थ्यांना रक्कम रुपये 871.44 कोटी कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे.
राज्य शासनाने ही योजना जाहीर केल्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यात जिल्ह्यामध्ये दि. 24 जुलै 2017 ते 22 सप्टेंबर 2017 अखेर एकूण 3 लाख 34 हजार, 920 ऑनलाइन अर्ज आपले सरकार पोर्टलवर अपलोड करण्यात आले. त्यापैकी आधार कार्ड संलग्नित ऑनलाइन अर्ज अपलोड केलेल्या शेतकऱ्यांची संख्या 3 लाख 15 हजार, 100 तर आधार कार्ड शिवाय अर्ज अपलोड करणारांची संख्या 19 हजार 820 इतकी होती. याशिवाय, ग्रीन यादी प्राप्त झाल्यानुसार संबंधित लाभार्थ्यांना कर्जमाफी रक्कम वर्ग कऱण्यात आली.
त्यात, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेकडील या यादीत असणाऱ्या 2 लाख, 69 हजार, 946 लाभार्थ्यांना 882.17 कोटी आणि व्यापारी बॅंकेतील 57 हजार 221 लाभार्थ्यांना 414.53 कोटी रुपये मिळणार आहे. सध्या जिल्हा बॅंकेला त्यापैकी 614.23 कोटी इतकी रक्कम प्राप्त झाली असून या संपूर्ण रकमेचे वितरण 2 लाख 10 हजार 395 लाभार्थ्यांना करण्यात आले आहे. व्यापारी बॅंकेस प्रत्यक्ष प्राप्त झालेल्या 414 कोटी 53 लाख रकमेपैकी 37 हजार 61 लाभार्थ्यांना 257 कोटी 21 लाख रुपयांचे वितरण करण्यात आले आहे. उर्वरित रक्कम संबंधितांच्या खात्यावर तत्काळ वर्ग करण्याचे निर्देश संबंधित बॅंकांना देण्यात आले आहेत.
या कर्जमाफी योजनेत राज्य शासनाने जाहीर केलेल्या दीड लाख रुपयांच्या आतील थकबाकी तसेच पुनर्गठण, प्रोत्साहनपर आणि एकरकमी परतफेड योजनेत सहभागी लाभार्थ्यांना त्यांच्या बॅंक खात्यावर थेट लाभ देण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)