जिल्ह्यातील पाणी टंचाईबाबत सदस्य, अधिकारी उदासीन

बोलावण्यात आलेल्या विशेष बैठकीस मोजकेच अधिकारी उपस्थित
– बैठकीमध्ये पाणी टंचाईचा आढावा घेवून पुढील वर्षीचे नियोजन
– साडेआठ कोटींचा पुरवणी टंचाई कृती आराखडा जिल्हाधिकाऱ्यांना सादर

प्रभात वृत्तसेवा
पुणे, दि.29 – जिल्ह्यातील पाणी टंचाईवर चर्चा करण्यासाठी सदस्य आणि अधिकाऱ्यांना वेळ नसल्याचे चित्र नुकत्याच जिल्हा परिषदेत झालेल्या पाणी टंचाई बैठकीत दिसून आले. नेहमीप्रमाणे अध्यक्ष, मुख्य कार्यकारी आणि बोटावर मोजण्याइतके पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, सोमवारी (दि.25) झालेल्या बैठकीमध्ये पाणी टंचाईचा आढावा घेवून पुढील वर्षीचे नियोजन करण्यात आले. यावेळी 8 कोटी 46 लाख 32 हजार पुरवणी टंचाई कृती आराखडा जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आला. त्यामध्ये टंचाईच्या 723 कामांचा समावेश आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जिल्हा परिषद अध्यक्ष विश्‍वासराव देवकाते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला बांधकाम सभापती प्रवीण माने, समाज कल्याण सभापती सुरेखा चौरे, कृषी व पशुसंवर्धन सभापती सुजाता पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले यासह पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीला गैरहजर राहिलेल्या अधिकाऱ्यांकडून चौकशी अहवाल मागवून तो राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडगे यांनी जुन्नर तालुक्‍यात धरणे असूनही 25 गावांतील नागरिकांना पिण्यासाठी पुरेशे पाणी नाही. विंधन विहीरींसाठी 200 फुटांची खोदाई केली जाते. मात्र त्याला पाणीच लागत नाही, भूगर्भातील पाणी पातळी खाली गेल्याने बोरसाठी 300 मीटरची खोदाई करण्याची मागणी शिवसेनेच्या गटनेत्या आशा बुचके आणि रणजित शिवतरे यांनी केली.

याबाबत मुख्य कार्यकरी अधिकारी यांनी 200 फुटांपेक्षा अधिक खोदाई करण्यास परवानगी नसून, त्यावर कारवाई होवू शकते. तसेच वनजमिनींवर विंधन विहीर घेता येत नाही, ती जागा बदलून घ्या. तसे ते गाव टंचाई बृहृत आराखड्यात असले पाहिजे. यावेळी कॉंग्रेसचे गटनेते विठ्ठल आवाळे यांनी विंधन विहीर घेण्यासाठी असणारी मोठी गाडी दुर्गम भागात जात नाही. त्यासाठी छोटी गाडी घेण्याची मागणी केली. तसेच जलयुक्त शिवाराच्या कामामध्ये भ्रष्टाचार होतो. लोकप्रतिनिधी ना विश्वासात घेतले जात नाही. अधिकारीच टक्केवारी घेत असल्याचा आरोप बैठकीत सदस्यांनी केला. त्यावेळी भ्रष्टाचाराचे पुरावे द्या लगेच कारवाई करतो असे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितले.

पाणी पुरवठा योजनेच्या विजबील थकीत आहेत, तरी त्या बिलांवर अनुदान द्यावे अशी मागणी दिलीप यादव यांनी केली. ज्या विहिरी नळ पाणीपुरवठा योजनेच्या स्त्रौत आहेत त्या विहिरीतील गाळ आणि दुरुस्ती प्राधान्याने करण्यात येणार असल्याचे मांढरे यांनी सांगितले.
………..
जिल्ह्यात सध्या 23 टॅंकर सुरू असून 16 गांवे 142 वाड्यांना पुरवठा केला जात आहे. 2017-18 मध्ये 367 विंधन विहिरी घेण्यात आल्या होत्या. त्यातील 316 खोदाई पूर्ण झाली. 271 विंधन विहिरी यशस्वी झाल्या, 250 विंधन विहिरींवर हातपंप बसवण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)