जिल्ह्यातील पहिलीच ओजस शाळेचा मान

शिक्रापूर-संपूर्ण पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा 15 जून रोजी सुरू होत असताना शिक्रापूर (ता. शिरूर) येथील वाबळेवाडी इंटरनॅशनल ओजस शाळा मात्र 4 जून रोजीच सुरू करण्याचा निर्णय शाळा व्यवस्थापन समितीने घेतला आहे. शाळेसाठी सहा शिक्षकांची नव्याने उपलब्धतता शासनाने करून दिल्याने आता शाळेत एकूण नऊ शिक्षक अध्यापनासाठी उपलब्ध झाले असल्याची माहिती मुख्याध्यापक दत्तात्रय वारे यांनी दिली.
वाबळेवाडी जिल्हा परिषद शाळेला यावर्षी इंटरनॅशनल ओजस शाळा म्हणून इयत्ता 8वीपर्यंत मान्यता मिळाली. मान्यता देताना शासनाने शाळेत महाराष्ट्र इंटरनॅशनल एज्युकेशन बोर्डच्या अभ्यासक्रमाचा आग्रह करून त्याची तयारीही सुरू केली आहे. इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आत्तापर्यंत केवळ तीनच शिक्षक होते. मात्र इयत्ता बारावीपर्यंत शाळेला मान्यता देताना शासनाने तीन शिक्षकांच्या मदतीला आता चार उपशिक्षक तर दोन पदवीधर शिक्षक उपलब्ध करून दिले आहेत. तर एकूण शिक्षक संच मान्यतेनुसार सुनिल पलांडे, संदीप गिते, जयश्री पलांडे, प्रतिभा पुंडे, शरीफा तांबोळी, दिलीप कुसाळे हे सहा शिक्षक येथे नव्याने रुजू झाले असून, या सर्वांचे 21 दिवसांचे महाराष्ट्र इंटरनॅशनल एज्युकेशन बोर्डच्या अभ्यासक्रमाबाबतचे विशेष प्रशिक्षण रामभाऊ म्हाळगी प्रशिक्षण संस्थेत सध्या मुंबईत सुरू असल्याची माहिती मुख्याध्यापक वारे यांनी दिली. या शिक्षकांचे सुरु असलेले प्रशिक्षण 2 जून रोजी पूर्ण होणार असून इयत्ता पहिली ते आठवीचे शाळावर्ग 4 जूनपासून सुरू करण्याचा निर्णय शाळा व्यवस्थापन समिती वाबळेवाडी ग्रामस्थ व पालकांनी एकत्रित घेतल्याची माहिती उपशिक्षक एकनाथ खैरे व सतीश वाबळे यांनी दिली.

  • नवीन शिक्षिकेस रुजू करण्यास टाळाटाळ
    वाबळेवाडी इंटरनॅशनल ओजस शाळा या ठिकाणी शासनाच्या नवीन शिक्षक बदलीच्या धोरणानुसार बदली होऊन वाबळेवाडी शाळा मिळालेल्या एका शिक्षिकेकडे शासनाच्या शिक्षण विभागाचे पत्र 28 मे रोजी मिळाल्यानंतर या शिक्षिका 29 मे रोजी या शाळेत रुजू होण्यासाठी गेल्या असताना त्या अनेक आदर्श पुरस्कारप्राप्त शिक्षिकेस शाळेमध्ये रुजू करून घेण्यामध्ये प्रशासन टाळाटाळ करत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. गुणवत्ता असलेल्या तसेच अनेक पुरस्कार प्राप्त शिक्षिकेस नवीन शाळेत नियुक्त होण्याचे पत्र घेऊन फिरण्याची वेळ आली असल्यामुळे येथील शाळेचा नेमका काय प्रकार चालू आहे, हे कळत नाही. आमच्याकडे जादा शिक्षक असून तुम्हाला रुजू करून घेता येणार नसल्याचे पत्र केंद्रप्रमुख यांनी शिक्षिकेला दिले आहे. त्यामुळे शिक्षक बदलीचा काळाबाजार की प्रशासनाचा गैरकारभार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)