जिल्हा व राज्य मार्गावरील वृक्षसंपदा नामशेष होण्याच्या मार्गावर

झाडे जाळणे, कत्तलीचे प्रमाण वाढले

कापूरहोळ- नसरापूर-वेल्हा, कापूरहोळ-भोर, कापूरहोळ-नारायणपूर मार्गावरील मोठ-मोठी झाडे वणव्यामुळे खाक होत आहेत. त्यामुळे मार्गावरील अनेक जुने झाडे हळूहळू नष्ट होवू लागली आहेत. रस्त्याच्या दुतर्फा वाळलेले गवत पेटवले जात असल्यामुळे वाळवी लागलेली मोठमोठी वडाची व इतर झाडे अर्धवट जळाल्यामुळे ती केव्हाही कोसळण्याची भिती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रवाशांच्या जिवीतास धोका निर्माण झाला असून मार्गावरील जुने वृक्ष जोपासण्याची मागणी पर्यावरण प्रेमींनी केली आहे.

या मार्गावर साठ ते सत्तर वर्ष जुनी झाडे आहेत. या महाकाय झाडांमुळे यामार्गावर प्रवाशांना जागोजागी सावली मिळत आहे. तत्कालीन शासनाने हा रस्ता तयार करताना प्रवाशांना सावली मिळावी, या हेतूने वड, आंबा, साग, पिंपळ, महारूंगी, करंज, जांभूळ, चिंच, आंबा आदी देशी झाडे लावून ती जोपासली होती. त्यामुळे मार्गावर प्रवाशांना या झाडांचा लावलीचा एक सुखद अनुभव घेता येता होता. परंतु, गेल्या काही वर्षांपासून संबंधित विभागाने या झाडांच्या भोवतालचे गवत तसेच झाडांना चुना व काव लावून झाडांची किडी व वाळवीपासून संरक्षण करणे तसेच मोडकळीस आलेले वृक्ष वेळेत कापण्याकडे दुलर्क्ष केल्याचे दिसून येत आहे.

अनेक शेतकरी आपल्या शेताच्या बांधाची साफसफाई करण्यासाठी शेतातील बांध पेटवतात. अशावेळी या मार्गालगतच्या झाडांच्या खोडाजवळ साचलेल्या कचऱ्याला आग लागून खाक होत आहेत. हे वृक्ष देखील खोडापासून लागलेल्या किडीत आग जलद गतीने पाहोचल्याने मोठमोठे वृक्ष रस्त्याच्या कडेला कोसळत आहेत. त्यामुळे प्रवाशांना दुखापती होऊन काही वेळेस प्राण गमवावे लागले आहेत. तर चेलाडी-वेल्हा मार्गावर नसरापूर बाजार पेठेच्या रस्त्याच्या दुर्फात असलेली वृक्ष खुलेआम तोडली जात आहेत. त्यामुळे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. वनविभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामाबाबत नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.

 • प्रशासनाचे दुर्लक्ष
  एका बाजूला शासन झाडे लावा म्हणून दर वर्षी आवाहन करीत असते. त्याला प्रतिसाद ही नागरिकांकडून मिळतो. परंतु, हीच झाडे मार्च ते जून महिन्याच्या मध्यात पाण्यावाचून जळून जातात. तरीही शासन उद्देश साध्य करण्यासाठी ठोस कारवाई करताना दिसत नाही.
 • मार्गालगतच्या झाडांच्या संवर्धनासाठी केवळ शासनावरच अवलंबून न राहता नागरिकांनीही स्वतः पुढाकार घेणे गरजेचे आहे. झाडांच्या संवर्धनासाठी ठोस कामे करावीत. मार्गावरील मोठमोठे वृक्ष आग लागल्यामुळे कोसळतात. अशी झाडे पुन्हा तयार होण्यासाठी अनेक वर्षांचा काळ लागतो. सध्या उन्हाचा कडाका वाढला असून एक ठिणगी देखील आग लागण्यास पुरशी होत आहे.
  चंदू परदेशी, अध्यक्ष, मैत्री प्रतिष्ठान
 • शासनाकडून एकाबाजूला झाडे लावण्यासाठी लाखो रुपये खर्च केले जातात तर दुसरीकडे शेकडो वर्ष जुनी झाडांच्या कत्तलीकडे डोळेझाक केले जात आहे. परिणामी वड, पिंपळ, चिंच, जांभूळ, आंबा असे देशी महाकाय झाडे नष्ट होत आहेत. त्यामुळे पुढील काळात वृक्षसंपदेला मोठा धोका पोहोचणार आहे. शासनस्तरावर झाडे तोडणारंवर कडक कारवाई झाल्यास अशी झाडे तोडण्याची हिंमत कोणाची होणार नाही.
  संतोष धावले, माजी सरपंच तेलवडी गाव
 • राखीव वनाच्या झाडाची तोड केल्यास त्याची लेखी तक्रार आमच्याकडे आली तरच आम्ही कारवाई करू.
  एस. यू. जाधवर, वनपाल नसरापूर परिक्षेत्र

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.