जिल्हा रूग्णालयातील समाजसेविकेला कामाचा भार पेलेना

बेवासर रूग्णांची होतेय हेळसांड; गितांजली कारंजकर रूग्णाकडे फिरकतच नाहीत

प्रशांत जाधव, सातारा
गरजू रुग्णांप्रति सहानूभूती दाखवून त्यांच्यासाठी असलेल्या सवलतींची माहिती देण्याऐवजी रुग्णांना गुन्हेगार असल्यासारखी वागणूक देण्यात येथील एका समाज सेविकेचा हातखंडा आहे. जिल्हा रुग्णालयातील त्या समाजसेवीकेकडून दरडावून बोलणे, माहिती देण्यास टाळाटाळ करणे, दिशाभूल करणे असे प्रकार सर्रास घडत आहेत. बेवारस पण उपचाराच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांना तातडीने मदत करण्या ऐवजी ज्यांनी सामाजिक भान ओळखून रुग्णांना तेथे दाखल केले त्यांनाच, तुम्ही त्यांना आणले आहे, तुम्हीच बघा असा उर्मट सल्ला देणाऱ्या त्या समाज सेविकेविरोधात पुरूष रूग्ण विभागातील अधिपरिचारक नाना जाधव यांनी गितांजली कारंजकर यांच्या कार्यपद्दतीवर आक्षेप घेणारे पत्र वरिष्ठांना पाठवले आहे. त्यामुळे कारंजकर यांच्या कार्यपध्दतीवर प्रश्‍न निर्माण होत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जिल्हा रुग्णालयांतील वैद्यकीय समाजसेवकांचे कर्तव्य हे गरीब व गरजू रुग्णांना त्यांच्यासाठी उपलब्ध असलेल्या सवलती व सुविधांची माहिती देणे हे आहे. तसेच दुर्घटनेची माहिती देऊन रुग्णांच्या नातेवाईकांचे समुपदेशन करणे, प्रत्यारोपणासाठी रुग्ण असेल तर नातेवाईकांची त्यासाठी मानसिकता तयार करणे हे आहे. पण, यापैकी सर्वांत महत्त्वाचे काम हे गरीब रुग्णांना सवलतींची माहिती देणे आणि मार्गदर्शन करणे आहे.तसेच बेवारस रूग्णांच्या नातेवाईकांचा शोध घेत त्यांचे पुर्नवसन करणे हे आहे. पण, सध्या जिल्हा रुग्णालयांतील वैद्यकिय समाजसेवक गितांजली कारंजकर रुग्णांना सुविधा देण्याऐवजी तो रुग्ण परत जिल्हा रुग्णालयात कसा येणार नाही यासाठी त्याच्या नातेवाईकांचे ब्रेन वॉश करतात. अस गंभीर आरोप एका कर्मचाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले आहे.

समाजसेवा या विषयात पदव्यूत्तर पदवी (एमएसडब्ल्यू) घेतलेल्या उमेदवारांना रुग्णालयांत वैद्यकिय समाजसेवक म्हणून नियुक्‍ती करण्यात येते. अभ्यासक्रमांमध्येच समाजाशी (रुग्णांशी) संवाद कसा साधावा याचे शिक्षणही त्यांना दिले जाते. मात्र याच्या उलटच या समाजसेवक महिलेची वर्तवणूक आहे.निर्धन रुग्ण व आर्थिक दुर्बल घटकांसाठी असलेल्या सुविधांची माहिती घेण्यासाठी रुग्णालयांतील या वैद्यकिय समाजसेवकांशी संपर्क साधावा लागतो. रुग्णांनी आपल्या आर्थिक परिस्थीतीची माहिती दिल्यावरही त्यांच्यावरच प्रश्‍नांची सरबत्ती केली जाते. विविध प्रश्‍न विनाकारण विचारून त्याला योजनेतून कसे कटवता येईल अन आपल्या डोक्‍याचा ताप कसा कमी होईल यासाठी समाजसेविका महोदया त्या रुग्णांना अपमानाची “गितांजली’ कारंजकर या वाहत असतात.

जिल्हा रुग्णालयात दि. 6 जुलै रोजी एका बेवारस रूग्णाला सामाजिक कार्यकर्ते रवी बोडके यांनी दाखल केले. त्या रुग्णाचे आजरपण येथे बरे झाले नाही. त्यामुळे त्याला एक तर पुणे येथील ससूनला किंवा जर तो बरा झाला तर त्याचे नातेवाईक शोधून त्यांच्या ताब्यात देणे आवश्‍यक आहे. हे सगळे करण्याची जबाबदारी जिल्हा रूग्णालयातील या समाजसेविकेवर आहे. मात्र त्यांनी तसे न करता ज्यांनी या रुग्णाला दाखल केले त्यांना फोन करून तुम्हीच त्या रुग्णाला घेऊन जावा असा तगादा लावला आहे . बेवारस रुग्णांना त्यांच्या नातेवाईकांपर्यंत किंवा पुढील उपचारासाठी पाठवण्याची जबाबदारी नक्की कोणाची आहे, ही जबाबदारी समाजसेविका का टाळत आहेत असा प्रश्‍न ही निर्माण होत आहे. कर्तव्यदक्ष अधिकारी डॉ. अमोद गडीकर हे रूग्णालयाची घडी बसवत आहेत. कारंजकर यांच्यासारख्या उपद्‌व्यापी कर्मचाऱ्यांना वेळीच जागेवर आणने हे गडीकर यांच्या समोरील आव्हान असेल.

त्या नेमके काम काय करतात?
रुग्णालयात 6 जुलैला दाखल केलेल्या रूग्णाला जर या महोदया 4 ऑगष्टला भेटत असतील तर या रोज कुठे असतात? 4 ऑगष्ट नंतर या 20 ऑगष्टला भेटल्या मग 16 दिवस त्यांनी काय केले? जर या रोज किंवा एक दोन , दिवसातून रूग्णांची विचारपूस करत असतात . असे असेल तर मग दि. 4 ऑगष्ट रोजी अधिपरिचारकांनी शल्यचिकीत्सकांना पत्र लिहून समाजसेवक कारंजकर या वार्डात न आल्याने रूग्णांचे हाल होत असल्याचे का कळवले? एखाद्या बेवारस व्यक्तीला दाखल करणाऱ्यांनी घरी सोडायचे मग तुम्ही काय करता? प्रश्‍न ही या निमित्ताने निर्माण होत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)