जिल्हा प्रमुखपदाची धुरा कटके यांच्या खांद्यावर

शिवसेना पक्ष प्रमुखांकडून दखल : शिरूर लोकसभा मतदारसंघात वर्चस्व

थेऊर – वाघोली गटातील जिल्हा परिषद सदस्य माऊली कटके यांची शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आल्याने वाघोली गटासह पंचक्रोषितील शिवसैनिकांसह युवा कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. जिल्हा प्रमुख राम गावडे यांच्या खेड तालुक्‍यात लोकसभेला शिवाजी आढळराव पाटील हे पिछाडीवर गेल्याने राम गावडे यांच्या जागी युवा चेहरा असलेल्या माऊली कटके यांच्या खांद्यावर जिल्हा प्रमुखपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.

कुस्ती क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी करून नॅशनल चॅम्पियन्स बिरुदावली मिळवणारा पैलवान माऊली कटके ते राजकीय आखाड्यातही आपले प्राबल्य टिकवून असल्याने शिवसेनेने संघटना मजबूत करण्याकामी सातत्याने यशस्वी ठरलेल्याची बाब लक्षात घेत माऊली कटके यांची जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.

लोकसभा निवडणुकीत वाघोली गटातून आढळराव पाटील यांना माऊली कटके यांनी मताधिक्‍य मिळवून दिले होते. कटके यांनी राजकारणात प्रदीर्घ अनुभव असलेल्या दिग्गजांना आस्मान दाखवत वाघोली जिल्हा परिषद गटातून मोठ्या मताधिक्‍याच्या फरकाने शिवसेनेचा भगवा फडकवलेला आहे. त्यांच्या वैयक्तिक करिष्म्याने वाघोली गटातील दोन्हीही गणांतून अनुक्रमे नारायण आव्हाळे व सर्जेराव वाघमारे या दोन्ही शिलेदारांनी पंचायत समितीमध्ये प्रवेश केला. वाघोलीतील अनेक राजकीय पुढाऱ्यांची मक्तेदारी मोडीत काढून तरूणांना रोजगार देवून ज्येष्ठ नागरिकांकरिताही विकासात्मक कामे करीत गटामध्ये बेरजेचे राजकारण केल्याने वाघोलीसह पंचक्रोशीत कटके यांचे पारडे तुल्यबळ मानले जाते.

माऊली कटके यांनी गटातटाचे राजकारण न करता सर्व नागरिकांची कामे मार्गी लावण्याचा सपाटा लावला आहे. कार्यकर्ता मतदारसंघातील असो अथवा बाहेरील, कोणत्या राजकीय पक्षाशी संलग्न आहे हे न पाहता त्याचे काम पूर्ण करणे यासाठी कटके यांनी भर दिल्याने सर्वसामान्य नागरिकांसह राजकीय कार्यकर्त्यांमध्ये त्यांचा मोठा बोलबाला आहे. यामध्ये त्यांनी तरुणांची मजबूत फळी तयार करून हवेलीच्या पूर्व भागातही आपला वारंवार संपर्क ठेवून युवा कार्यकर्त्यांना मोठी ताकद दिल्याने तरुणांमध्ये त्यांची क्रेझ आहे. वाघोलीसह हवेलीच्या पूर्व भागातही लोकसभेला आढळराव पाटील यांना मताधिक्‍य मिळवून देण्यासाठी त्यांनी मोठी मेहनत घेतली. पक्षविरहित संबंध जोपासल्याने कटके यांना मानणारा मोठा वर्ग तयार आहे.

विधानसभेकरिताही कटके यांचे महत्त्व…
वाघोली गटात मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करून प्राधान्यक्रमाने कामे पूर्ण करण्याचा मानस असल्याने कटके यांचीनाळ सर्वसामान्य मतदारांपर्यंत जोडली गेली आहे, त्यामुळे शिरूर-हवेली विधानसभेसाठी इच्छूक असलेले सर्वच राजकीय पक्षांतील धुरंधर राजकारणी माऊली यांच्यासोबत संपर्क साधून आहेत. जिल्हा प्रमुखपदी तरूण चेहऱ्याची निवड झाल्याने जिल्ह्यांमध्ये तरूण वर्ग व सर्वसामान्य नागरिक शिवसेनेकडे आकर्षित होऊ शकतो, असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.