जिल्हा कारागृह परिसरातील बांधकाम निर्बंध शिथील करा

आ. शिवेंद्रसिंहराजेंची मागणी:कार्यवाही करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आश्‍वासन
सातारा- सातारा जिल्हा कारागृह हे पुर्णपणे नागरी वस्तीत असून कारागृहाच्या आसपास हजारो लोक वास्तव्यास आहेत. या परिसरात साडेसात मीटर अंतरापर्यंत कसल्याही प्रकारचे बांधकाम करण्यास मज्जाव आहे. यामुळे शहराच्या विकासावर विपरीत परिणाम होत आहे. यासंदर्भात गृहराज्यमंत्री ना. रणजीत पाटील व अन्य संबंधीत अधिकाऱ्यांसमवेत सकारात्मक चर्चा झाली असून निर्बंध शिथील करण्याबाबत अधिकार जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षेत आहेत. त्यामुळे यासंदर्भात तातडीने संबंधीत अधिकाऱ्यांची बैठक घेवून सदर निर्बंध शिथील करण्याचा निर्णय घ्यावा, अशी आग्रही मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जिल्हाधिकारी श्रीमती श्‍वेता शिंघल यांच्याकडे केली.

आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या मागणीवरुन जिल्हा कारागृहासंदर्भात मुंबई येथे विधान परिषदेचे सभापती ना. रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या दालनात गृहराज्यमंत्री ना. रणजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपुर्ण बैठक झाली होती. या बैठकीस ना. रामराजे, ना. पाटील, आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्यासह महाराष्ट्र राज्य पुणे -1 कारागृह विभागाचे विशेष पोलीस महानिरिक्षक विठ्ठल जाधव, टाउन प्लॅनिंग विभागाचे अव्वर सचिव शिंदे, सातारा जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, साताऱ्याचे अपर पोलीस अधिक्षक विजय पवार, सातारा नगर पालिकेचे मुख्याधिकारी शंकर गोरे यांच्यासह संबंधीत सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्यावेळी सकारात्मक चर्चा होवून जिल्हा कारागृह परिसरातील बांधकामाबाबतचे निर्बंध शिथील करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना देण्यात आले असून तशा सुचना आपण जिल्हाधिकाऱ्यांना केल्या असल्याचे ना. पाटील यांनी नुकतेच आ. शिवेंद्रसिंहराजे यांना कळवले होते. त्यानुसार आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सदर प्रश्‍न तातडीने सुटावा यासाठी जिल्हाधिकारी यांची भेट घेवून याबाबतचे निवेदन त्यांना दिले. यावेळी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

दिवसेंदिवस सातारा शहराच्या नागरी वस्ती वाढत असून शहराच्या मध्यभागी, भरवस्तीत जिल्हा कारागृहाची इमारत असल्याने अनेक अडचणी निर्माण होत आहेत. याच ठिकाणी पोलीस मुख्यालय, शहर पोलीस ठाणे, सातारा नगरपरिषद कार्यालय, लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय यासह अनेक शासकीय, निमशासकीय, खाजगी कार्यालये, संस्था, शाळा आणि विविध व्यावसायिक दुकाने आहेत. शासनाच्या निकषांनुसार जिल्हा कारागृहाच्या साडेसात मीटर परिसरात नवीन बांधकाम करण्यावर निर्बंध आहेत. त्यामुळे या परिसरातील नागरिकांची गैरसोय होत आहे. कारागृह हे शहराच्या मुख्य बाजारपेठेत असल्याने त्याचे दुरोगामी परिणाम शहराच्या विकासावर होत आहेत. कुटूंबातील लोकांची संख्या वाढल्याने संबंधीत कुटूंबाला घराचा विस्तार करणे अनिवार्य असते. मात्र जिल्हा कारागृहामुळे अशा अनेक कुटुंबांना त्यांच्याच जागेत नवीन घराचे बांधकाम अथवा विस्तार करता येत नसल्याचे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी बैठकीत सांगितले.

जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला असून तातडीने बैठक घेवून निर्बंध शिथील करण्यासाठी कार्यवाही केली जाईल, असे आश्‍वासन जिल्हाधिकारी सिंघल यांनी यावेळी दिले. दरम्यान, जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांचा आज वाढदिवस होता. त्यामुळे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी श्रीमती सिंघल यांना बुके देवून वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)