जाळीमंदी पिकली करवंद !

अस्सल रानमेव्याचा हंगाम सुरू

राजगुरूनगर- खेड तालुक्‍यातच्या आदिवासी भागामध्ये डोंगराची काळी मैना करवंद हंगाम सुरू झाला असून गावागावात करवंद गोळा करून त्याची विक्री केली जात आहे. आदिवासी भागातील गावात राहणाऱ्या नागरिकांना उदर निर्वाहाचे करवंद हे एक साधन असल्याने ती रानातून गोळा करण्यासात या भागातील नागरिक व्यस्त झाला आहे.

खेड तालुक्‍याच्या आदिवासी भागातील भीमाशंकर, भोरगिरी, भोमाळे, वांद्रा, आंबोली या परिसरात सह्याद्रीच्या डोंगरावर मोठ्या प्रमाणात करवंदाच्या जाळी (झाडे) आहेत. भीमाशंकर भोरगिरी परिसरात अभयारण्यात करवंदाची झाडे अधिक आहेत. या भागातील डोंगराची काळी मैना करवंद सर्वत्र प्रसिद्ध आहे. डोंगरची काळी मैना आता पिकू लागल्याने या भागात करवंदे खाण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे. शहरातील नागरिक भीमाशंकर परिसरातील करवंदे खाण्यासाठी एप्रिल मे महिन्यात हमखास येतात. रस्त्या-रस्त्यावर लहान मुले महिला करवंदे विकताना दिसत आहेत.

करवंदाच्या झाडाला अधिक आणि मोठे काटे असतात या काट्यात करवंद येते. करवंदाच्या झाडाला ग्रामीण भाषेत जाळी म्हणतात. या करवंदाची फुले पांढरी शुभ्र असतात. करवंद लागले की ते हिरवे असते. पिकण्याच्या आधी ते नारंगी-पिवळे होते आणि पिकल्यानंतर ते काळे होते. अशा या करवंदाला “डोंगराची काळी मैना’ म्हणून ओळखले जाते.

तालुक्‍यातील आदिवासी भागातील महादेव कोळी, कातकरी, ठाकर आदी समाजातील नागरिक ही करवंदे गोळा ती शहरात मोठ्या गावात विकायला नेतात. पूर्वी करवंदाच्या बदल्यात तेल, मीठ, मिरच्या घेतल्या जात होत्या. आताही काहीजण ये घेतात; मात्र जास्त प्रमाणात करवंदाची विक्री रोख स्वरुपात केली जाते. खेड तालुक्‍यातील भोरगिरी-भीमाशंकर परिसरात पिकणारी डोंगराची काळी मैना पुणे, मुंबई आणि इतर मोठ्या शहरात विक्रीसाठी पाठवली जाते. दररोज सकाळी राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरू यांच्या एसटी बस स्थानकाजवळील पुतळ्याजवळ करवंदाची खरेदी विक्री केली जाते. या ठिकाणी करवंदे खरेदीसाठी व्यापारी येतात.

सध्या करवंदाचा हंगाम सुरू झाला असून भोरगिरी भीमाशंकरच्या डोंगर रांगावरील काळी मैना बाजारात दाखल झाली आहे. करवंदा बरोबर रायवळ आंबे, जांभळे बाजारात विक्रीला येत आहेत. या भागातील काळे आवळे शहरी नागरिकांची खास उन्हाळ्यात मेजवानी असते. भोरगिरी भीमाशंकर परिसरात जांभूळ आणि करवंदे यांच्यावर प्रक्रिया करणारे उद्योग शासनाने सुरू करावेत, अशी मागणी या भागातील नागरिक करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)