जालियनवाला बाग हत्याकांड ब्रिटीश राजवटीसाठी लाजिरवाणा डाग – ब्रिटीश पंतप्रधान थेरेसा मे यांनी व्यक्‍त केला खेद

लंडन – भारतावर ब्रिटीशांचे राज्य असताना स्वातंत्र्य चळवळीदरम्यान झालेल्या “जालियनवाला बाग’ हत्याकांड हे ब्रिटीश साम्राज्यासाठी अत्यंत लाजिरवाणा डाग आहे, अशा शब्दात ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी खेद व्यक्‍त केला आहे. जालियनवाला बाग हत्याकांडाला 100 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने थेरेसा मे यांनी आपल्या भावना व्यक्‍त केल्या. मात्र या घटनेबाबत दिलगिरी व्यक्‍त करण्याची औपचारिकता त्यांनी दाखवली नाही.

संसदेच्या कनिष्ठ सभागृहामध्ये दर आठवड्याला होणाऱ्या वार्तालापाच्या प्रारंभीच थेरेसा मे यांनी जालियनवाला बाग हत्याकांडाविषयी तीव्र खेद व्यक्‍त केला. मात्र या हत्याकांडाबाबत ब्रिटीश सरकारने यापूर्वीच दिलगिरी व्यक्‍त केली आहे, असे सांगून थेरेसा मे यांनी याप्रसंगी नव्याने दिलगिरी व्यक्‍त करणे टाळले.

“1919 साली झालेले जालियनवाला बाग हत्याकांड म्हणजे भारतावरील ब्रिटीश शासनकाळातील सर्वात लाजिरवाणा डाग आहे. ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ – द्वितीय यांनी 1997 च्या भारतभेटीदरम्यान या हत्याकांडाविषयी खेद व्यक्‍त केला होता. भारतावरील ब्रिटीश शासनाच्या इतिहासातील अत्यंत वेदनादायी घटना म्हणून या घटनेची नोंद घ्यायला हवी, असे त्या म्हणाल्या होत्या.’ याची आठवण थेरेसा मे यांनी करून दिली.

स्वातंत्र्यपूर्व कालखंडात 1919 साली एप्रिल महिन्यात बैसाखीच्या दिवशी पंजाबमधील अमृतसरमध्ये जालियनवाला बागेत झालेल्या सभेवर जनरल डायर या ब्रिटीश लष्करी अधिकाऱ्याने मशिनगनद्वारे बेछुट गोळीबार करण्याचे आदेश दिले होते. त्या गोळीबारात हजारो निरपराध मरण पावले होते. तर शेकडो जण जखमी झाले होते. या मृतांमध्ये महिला आणि बालकांचाही समावेश होता.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.