जामखेड दुहेरी हत्याकांड तपासासाठी 15 पोलीस पथके

पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा : हत्या राजकीय वादातून नाही
जामखेड  – येथील दुहेरी हत्याकांडाचा तपास योग्य दिशेने सुरू आहे. कालपासून तब्बल 40 जणांची या प्रकरणी चौकशी करण्यात आली आहे. त्यातील चौघांना संशयीत म्हणून ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू आहे. या तपासासाठी 15 पोलीस पथके तयार केली असून ती वेगवेगळ्या ठिकाणी रवाना करण्यात आली आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी दिली. ही हत्या राजकीय वादातून नसल्याचे प्रथमदर्शनी दिसते, असे शर्मा म्हणाले.
जामखेड शहरात शनिवारी सायंकाळी राकेश राळेभात व योगेश राळेभात यांची अज्ञातांनी गोळ्या घालून हत्या केली होती. तेव्हापासून शहरात तणावपूर्ण स्थिती होती. त्यानंतर पोलीस अधीक्षक शर्मा काही वेळातच घटनास्थळी पोहोचले होते. त्यांनी अतिरिक्‍त पोलीस बंदोबस्त तैनात करून तणावाची स्थिती हाताळली. त्यांनी रात्रीपासूनच गुन्ह्याच्या तपासाचे नियोजन केले. त्याबाबत माहिती देण्यासाठी आज रात्री त्यांनी पत्रकार परिषद घेतली.
शर्मा म्हणाले की, ही हत्या राजकीय वादातून झाल्याचे प्रथमदर्शनी तरी दिसत नाही. तपास अगदी योग्य दिशेने सुरू आहे. त्यासाठी 15 पोलीस पथके वेगवेगळ्या ठिकाणी रवाना करण्यात आली आहेत. जामखेड बंद दरम्यान काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी 200 पोलीस कर्मचारी शहरात ठिकठिकाणी तैनात करण्यात आले आहेत. तसेच 20 वरिष्ठ पोलीस अधिकारीही येथे आहेत, असे त्यांनी सांगितले. घटना घडली त्या हॉटेल परिसरातच दोन दिवसांपूर्वी योगेश राळेभात आणि दुसऱ्या एका व्यक्‍तीचे भांडण झाले होते. मात्र ते भांडण आपआपसात मिटले होते. त्यामुळे त्या वादाचाही या गोळीबारीशी काही संबंध दिसत नाही. तपासासाठी आम्ही 40 जणांची चौकशी केली होती. त्यातील चौघांना संशयीत म्हणून ताब्यात घेतल्याचे शर्मा म्हणाले.
अंत्यसंस्काराला विरोध..
पुणे येथील ससून रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी राकेश राळेभात व योगेश राळेभात यांचे मृतदेह पाठविले होते. त्यांचे मृतदेह आज सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास जामखेड येथे आणण्यात आले. त्यावेळी त्यांचे नातेवाईक, कार्यकर्त्यांनी दोघांचेही मृतदेह घेऊन आलेली रुग्णवाहिका पोलीस ठाण्यासमोरच अडविली. आरोपींना पकडेपर्यंत मृतदेह पोलीस ठाण्यात ठेवण्याचा आग्रह धरला. यावेळी हजारोंचा जमाव जमला होता. अखेर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मधुकर राळेभात यांनी मध्यस्थी केली. अगोदर अंत्यसंस्कार करू, त्यानंतर योग्य तपासासाठी पोलिसांकडे आग्रह धरू, असे त्यांनी नातेवाईक व कार्यकर्त्यांना सांगितले. त्यानंतर त्या दोघांवरील अंत्यसंस्काराचा मार्ग मोकळा झाला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)