जानकरांना मंत्रिपद म्हणजे धनगर समाजाला आरक्षण नाही

जयदीप कवाडे यांची टिका

सातारा, दि.29 (प्रतिनिधी )- महादेव जानकरांना मंत्रिपद दिले म्हणजे धनगर समाजाला आरक्षण मिळाले का? असा सवाल करत सरकारने युवकांच्या हाताला रोजगार देण्याचे आश्वासन पूर्ण केले नाही उलट बेरोजगारीमुळे समाजात गुन्हेगारी वाढत असून त्या परिस्थितीला केवळ भाजप सरकार जबाबदार असल्याचा आरोप पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांनी केला.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्‍चिम महाराष्ट्राच्या दौऱ्याच्या निमित्ताने शनिवारी साताऱ्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी जिल्हाध्यक्ष युवराज कांबळे, संजय गाडे, दयानंद माने, संतोष सपकाळ, कपिल लिंगायत,सोमनाथ भोसले उपस्थित होते.
आगामी निवडणुकीत पीपल्स रिपब्लीकन पार्टी ही कॉंग्रेस- राष्ट्रवादी सोबत आघाडी करणार असून राज्यात लोकसभेच्या दोन तर विधानसभेच्या पंधरा जागा लढविणार आहे. आगामी रणनीती ठरविण्यासाठी 17 ऑक्‍टोबरला नागपूर येथे पीपल्सचा राष्ट्रीय मेळावा होणार आहे. त्यास कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील हे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती देवून कवाडे म्हणाले, राज्यात बहुजन समाज आपापसात लढून मेला पाहिजे अशी भाजपची खेळी आहे. त्याचाच एक भाग म्हणून भीमा-कोरेगावच्या घटनेकडे पहावे लागेल. या घटनेतील सूत्रधार आरोपी संभाजी भिडे यांना अद्याप अटक का केली जात नाही, असा सवाल कवाडे यांनी उपस्थित केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आम्ही फक्त त्यांनाच राजे मानतो
अट्रोसिटीच्या मुद्‌द्‌यावर खासदार उदयनराजे यांनी केलेल्या विधानावर बोलताना जयदीप कवाडे म्हणाले, आम्ही राजे फक्त छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याशिवाय कोणालाही राजे मानत नाही. खासदार उदयनराजे यांनी मन मोठे दाखवायला पाहिजे. पण ते ज्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत त्या संभाजी भिडे यांना गुरू मानत असतील तर शोकांतिका आहे.

एमआयएम चालते, मग आम्ही का नाही?
रिपब्लिकन ऐक्‍य नव्हे तर आता प्रत्येकाने आपले गट निवडणूक आयोगाकडे विसर्जित करण्याची गरज आहे. त्याशिवाय ऐक्‍य होणार नाही असे सांगून कवाडे म्हणाले, प्रकाश आंबेडकरांचा आम्ही कायम आदर करतो मात्र त्यांना एमआयएम चालते, मग आम्ही का नाही चालत? एमआयएम हा पक्ष आरएसएससाठी काम करत असून नुकत्याच झालेल्या सांगली महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांच्या उमेदवारांचे डिपॉझिट मतदारांनी जप्त केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)