जागेअभावी रखडले पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय

पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलिस आयुक्‍तालय स्थापित करण्याच्या सर्व औपचारिकता पूर्ण होऊन मंत्रिमंडळात या निर्णयावर शिक्‍कामोर्तबही झाला. दोन आठवडे उलटून गेल्यानंतरही अद्याप स्वतंत्र आयुक्‍तालयाच्या उद्‌घाटनाच्या तारखेची घोषणा करण्यात आली नाही. कित्येकांनी अंदाज वर्तविला होता की एक मे अर्थात महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर शहराचे स्वतंत्र पोलीस आयुक्‍तालय सुरु होईल. परंतु सध्या तरी तशी काही चिन्हे दिसत नाहीत. अद्यापही आयुक्तालयासाठी जागा उपलब्ध न होऊ शकल्याने येत्या महाराष्ट्र दिनी आयुक्‍तालय सुरु होण्याचा अंदाज गुलदस्त्यातच राहण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाचे स्वप्न साकारण्यासाठी पिंपरी-चिंचवडकरांना काही कालावधी वाट पहावी लागणार आहे.

स्वतंत्र पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्‍तालयाला मंत्री मंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाल्यानंतर शहरात या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. आयुक्‍तालय स्थापित करण्यासाठी तत्पूर्वीच शहरातील विविध जागांचा शोध घेणे सुरु झाले होते. याकरिता आतापर्यंत संत तुकारामनगर येथील डॉ. डी. वाय. पाटील तंत्र शिक्षण संस्थेजवळील मोकळी जागा, प्रेमलोक पार्कमधील महापालिका शाळा आणि फ क्षेत्रीय कार्यालय या जागांची पाहणी व मागणी करण्यात आली होती. मात्र, अद्यापही या जागा ताब्यात न मिळाल्याने आयुक्‍तालयाचे घोडे अडले आहे. दरम्यान, महाराष्ट्र दिनाला केवळ एक आठवडाभराचा कालावधी बाकी असताना पोलीस प्रशासनाकडून जागा शोध मोहीम आणखी तीव्र करण्यात आली आहे. परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी पक्षनेते एकनाथ पवार यांची महापालिकेत प्रत्यक्ष भेट घेत, या विषयावर चर्चा केली.

आयुक्‍तालयासाठी दोन जागांची मागणी
पोलीस आयुक्‍तालयासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील विविध ठिकाणच्या जागांचा शोध घेण्यात आला. यामध्ये तयार इमारतींची पाहणी करण्यात आली. मात्र, कोणत्याही एका इमारतीवर शिक्कामोर्तब होऊ शकला नाही. त्यामुळे आयुक्‍तालयासाठी तात्पुरती जागा भाड्याने घेतली जाण्याची शक्‍यता होती. पोलीस प्रशासनाने प्रेमलोक पार्कमधील महापालिका शाळा इमारत आणि महापालिकेचे निगडीतील फ क्षेत्रीय कार्यालय या दोन इमारतींची महापालिका प्रशासनाकडे मागणी केली आहे. यावर अद्याप निर्णय झालेला नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)