“जांबे’ प्रकरणी मृत्यू, मृतदेह घेण्यास नकार

पिंपरी – तलवार हाती घेतलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने शहरात चर्चेत आलेले “जांबे मारहाण’ प्रकरण अधिकच चिघळले आहे. शनिवारी (दि. 21) गावातील एका टोळक्‍याने मारहाण केलेल्या पैकी सुरेश अडसूळ (वय- 52, रा. जांबे) यांना उपचारासाठी लोकमान्य रुग्णालयात दाखल केले होते. मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास हृदय विकाराने त्यांचा मृत्यू झाला असून नातेवाईकांनी मृतदेह घेण्यास नकार दिला आहे. आरोपींवर आणि मारहाण प्रकरण दाबण्याऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा इशारा कुटुंबीयांनी दिला आहे.

या प्रकरणी सुशांत गायकवाड, धर्मराज गायकवाड, चैतराम गायकवाड, आदित्य शिनगारे (सर्व रा. जांबे, मुळशी) यांना पोलिसांनी अटक केली आहे. सुरेश यांचा 18 वर्षाचा मुलगा चिरायू याच्यावर तलवारीने वार केले होते. चिरायू अडसूळ याने 20 सप्टेंबर रोजी ठेवलेल्या व्हॉटस्‌ ऍप स्टेटस्‌वरून या वादाला सुरुवात झाली होती. अडसूळ व गायकवाड यांच्यात आधीपासूनच वाद होते. यावेळी शनिवारी गायकवाड व त्याच्या साथीदारांनी कारमधून जाताना चिरायू याच्या गाडीला कट देखील मारला होता. ही बाब चिरायू याने त्याच्या चुलत भावाला सांगितली. त्यानंतर सुशांत गायकवाड व त्याच्या भावांनी अडसूळ यांच्या घरात घुसून कुटुंबीयाला मारहाण केली. यामध्ये सुरेश अडसूळ यांनाही लाकडी दांडक्‍याने जबर मारहाण करण्यात आली होती. यावेळी सुशांत गायकवाड याने जातीवाचक शिवीगाळ केली होती. या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मात्र या प्रकरणात पोलिसांनी आरोपीची बाजू घेत प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप अडसूळ कुटुंबीयांनी केला आहे. माहिती देऊनही पोलीस घटनास्थळी आले नाहीत. शिवाय ऍट्रॉसिटीचा गुन्हाही दाखल झाला नाही. तलवारीने वार करुन देखील पोलिसांनी केवळ मारहाणीचा गुन्हा दाखल केला. यामध्ये मारहाण झालेल्याचा मृत्यू झाला. त्यामुळे यात आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल व्हावा, तसेच हे प्रकरण दाबणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी अडसूळ कुटुंबाने पोलीस आयुक्‍त आर. के. पद्मनाभन यांच्याकडे केली आहे.

दै. “प्रभात’ शी बोलताना अडसूळ कुटुंबीय म्हणाले, आम्ही वारंवार पोलीस आयुक्‍तांनाही भेटण्याचा प्रयत्न केला, मात्र आम्हाला भेटू दिले गेले नाही. जांबे येथे आमच्या समाजाचे एकच घर आहे. या आधीही आरोपींनी दबाव आणल्याचा आरोपही त्यांनी केला. आरोपीचे परिसरात अवैध दारूचे दुकान आहे. यावरही पोलीस कोणतीच कारवाई करत नसल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)