जळगाव : उमेदवारीतील संभ्रम

जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपचे वर्चस्व आहे. गेल्या निवडणुकीत तेथून भाजपचे ए. टी. पाटील हे निवडून आले होते. यावेळी मात्र त्यांना उमेदवारी देण्यात आलेली नाही. चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. आधी आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी देऊन नंतर ती बदलण्यात आली आणि आता आमदार उन्मेष पाटील हे जळगावचे भाजप-शिवसेना युतीचे अधिकृत उमेदवार आहेत. त्यांचा सामना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गुलाबराव देवकर यांच्याशी होणार आहे.

जळगाव लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. जळगाव ग्रामीण, एरंडोल, अंमळनेर, चाळीसगाव, पाचोरा आणि जळगाव शहर. जळगाव लोकसभा मतदारसंघ यावेळी चर्चेत राहिला तो येथील उमेदवारीच्या घोळामुळे. भाजपतर्फे आधी स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. त्यांनी उमेदवारी अर्ज भरण्याची तयारीही केली आणि ऐनवेळी त्यांचा पत्ता कट करून उमेदवारी चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील यांना देण्यात आली. या बदलामागे भाजपत होणारी संभाव्य बंडखोरी हे महत्वाचे कारण होते.

2014मध्ये भाजपतर्फे निवडणूक जिंकलेले ए. टी. पाटील यांना पुन्हा उमेदवारी मिळेल असे वाटत होते. ए.टी. पाटील यांना तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाली असती. पण सोशल मीडियावर त्यांची काही आक्षेपार्ह छायाचित्रे व्हायरल झाल्याने त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. मग पक्षातील अनेकांच्या नावाची चर्चा झाली. त्यात अभियंता प्रकाश पाटील, पारोळ्याचे नगराध्यक्ष किरण पवार, आमदार स्मिता वाघ, आमदार उन्मेष पाटील यांच्या नावांवर चर्चा झाली आणि स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर झाली. तेव्हा ए. टी. पाटील यांनी बंडाचा पवित्रा घेतला. वाघ सोडून अन्य कुणालाही आपण पाठिंबा देऊ अशी भूमिका त्यांनी घेतली. अंमळनेरचे आमदार शिरीष चौधरी यांनीही स्मिता वाघ यांच्या नावाला विरोध केला असे बोलले जाते. पक्षातील वाद टाळण्यासाठी स्मिता वाघ यांच्याऐवजी उन्मेष पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

जळगाव लोकसभा मतदारसंघावर भाजप आणि कॉंग्रेस यांचे समसमान वर्चस्व राहिले आहे. आतापर्यंत झालेल्या निवडणुकांत एकूण आठ वेळा कॉंग्रेस आणि सहा वेळा भारतीय जनता पक्षाचा उमेदवार येथून निवडून आला आहे. 1999 पासून मात्र सातत्याने येथे भाजपचाच उमेदवार निवडून आला आहे. 2009 आणि 2014 मध्ये भाजपचे ए.टी. नाना पाटील हे खासदार म्हणून निवडून आले.

2009मध्ये या मतदारसंघात तेरा उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यातून ए. टी. पाटील 96 हजार मतांनी निवडून आले. 2014मध्ये जळगावमध्ये तिरंगी लढत झाली. कॉंग्रेस, भाजप आणि आम आदमी पक्ष या तीनच पक्षांचे उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्याचा फायदा ए. टी. पाटील यांना झाला. ते खूप मोठ्या मताधिक्‍याने विजयी झाले.

जळगाव लोकसभा मतदारसंघावर महाजनांचे वर्चस्व राहिले आहे. कॉंग्रेस असो वा भाजप महाजनांच्या बळावरच येथे विजय मिळवता आला आहे. 1980 ते 84, 84 ते 89 आणि 89 ते 91 या काळात कॉंग्रेसचे उमेदवार शिवराम महाजन यांचा इथे प्रभाव होता. तर 1999 ते 2009 पर्यंत इथे भाजपचे वाय. सी. महाजन यांचे वर्चस्व होते. आताही राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे या मतदारसंघात वर्चस्व आहे. अगदी एकनाथ खडसे यांची नाराजी असताना आणि पक्षात मोठी बंडखोरी झालेली असतानाही गिरीश महाजन यांनी महापालिकेत सत्ता मिळवून दाखवली.

जळगाव लोकसभा मतदारसंघातील समस्या मात्र अद्याप सुटलेल्या नाहीत. ए.टी. पाटील दोन वेळा खासदार झाले पण त्यांनी जळगाव मतदारसंघातील लोकांचा अपेक्षाभंग केला. अगदी भाजपतील कार्यकर्तेही त्यांच्यावर नाराज आहेत. म्हणूनच त्यांच्याविरोधात पक्षात हालचाली सुरू झाल्या होत्या. त्यातच त्यांचे वादग्रस्त छायाचित्र व्हायरल झाले आणि त्यांचा पत्ता कट झाला. पण ए. टी. पाटील यांनी मेळावा घेऊन आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली, इतकेच नव्हे तर भाजपच्या उमेदवाराविरोधात निवडणूक लढवण्याची धमकी दिली. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर तोंडसुख घेतले. भाजपचे अमळनेरचे सहयोगी आमदार शिरीष चौधरी यांनीही निवडणूक लढवण्याची भाषा सुरू केली तेव्हा भाजपची चिंता वाढली. शिवसेनेनेही वाघ यांच्या उमेदवारीवर नाराजी व्यक्त केली होती. पण शिवसेनेची समजूत काढण्यात भाजपला यश आले होते. पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याने भाजपची पंचाईत झाली.

या सगळ्याचा फायदा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार गुलाब देवकर यांना होईल हे लक्षात आल्यावर चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.

राष्ट्रवादीचे गुलाब देवकर यांच्या बाजूने राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस आघाडीने आपली ताकद लावली आहे. पण या जिल्ह्यात भाजप आणि शिवसेनेचेच प्राबल्य आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी जळगाव शहर आणि चाळीसगाव भाजपकडे आहे तर जळगाव ग्रामीण आणि पाचोरा शिवसेनेकडे आहे. अंमळनेरमध्ये अपक्ष आमदार शिरीष चौधरी आणि एरंडोल राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे आहे. कॉंग्रेस आघाडी भाजपच्या उमेदवाराला कशी टक्कर देते हे पाहण्यासारखे असेल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.