जलपर्णीने इंद्रायणीचा श्‍वास गुदमरला

चिंबळी- पुणे-नाशिक महामार्गावरील चिंबळी, मोशी, मोई, डुडुळगाव आदी गावांना पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी मिळावे म्हणून देहू ते मरकळ येथे इंद्रायणी नदीवर सहा ते सात बंधारे बांधले आहेत. मात्र, नदीचे पात्र भर उन्हाळ्यातही जलपर्णीने झाकोळून गेले आहे. दाट जलपर्णीमुळे इंद्रायणीचा श्‍वास गुदमरत असून नदी पात्राला हिरव्यागार मैदानाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. प्रदूषित सांडपाणी प्रक्रियेशिवाय नदीत सोडण्यात येत असल्याने जलपर्णी फोफावत असल्याने नागरिकांच्या आरोग्य धोक्‍यासोबतच परिसरातील शेती धोक्‍यात आली आहे.
बहुतांश सर्वच नद्यांमध्ये उन्हाळ्यात जलपर्णी वाढलेली दिसते. जलपर्णी असेल तर नदीचा प्रवाह खुंटतो. हवेतील ऑक्‍सिजन पाण्यात मिसळण्याची क्रिया मंदावते. डासांचा प्रादुर्भाव वाढतो व लोकांना प्रदूषण झाल्याचे लक्षात येते. मग जलपर्णी काढण्यासाठी मोहीम राबवली जाते. जलपर्णी पूर्ण काढून टाकली की, नदी प्रदूषणमुक्त होईल अशी लोकांची समजूत असते. मात्र जलपर्णी समूळ नाहिशी करण्याचे काम अशक्‍यप्राय आहे हे मागील काही वर्षांत वारंवार दिसून आले आहे . पावसाळा आला की, जलपर्णी वाहून जाते, प्रदूषणाचा प्रश्‍नही विस्मृतीत जातो असा अनुभव या संपूर्ण भागातील नागरिक घेत आहेत.
पिंपरी चिंचवड भागातील तळवडे ,चिखली द्दीतून रसायन मिश्रित पाण्यातून त्याच प्रमाणे परिसरातील गावांमधून रासायनिक खतांचा वापर केलेल्या शेत जमिनीतून झिरपणाऱ्या पाण्यातील वा कारखान्याच्या सांडपाण्यातील नायट्रोजन व फॉस्फरस ही पोषक द्रव्ये पाण्यात मिसळून जलपर्णी फोफावत आहे. ही द्रव्ये पाण्यात मिसळणे जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत जलपर्णीची वाढ अनिर्बंधपणे होत राहणार आहे. याच द्रव्यांवर व इतर सेंद्रीय पदार्थांवर जीवाणूंची ही वाढ होत असते. अनेक रोगजंतू पाण्यात टिकून राहण्यात व त्यांची वाढ होण्यात या दूषित पदार्थांचा सहभाग असतो. जलपर्णी काढण्याबरोबर नद्यांना विष वाहिन्या होण्यापासून रोखण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करणे नितांत गरजेचे झाले आहे.

  • जलपर्णी स्थानिकांसाठी डोकेदुखी
    इंद्रायणी नदीतील जलपर्णीचा वाढता विळखा स्थानिकांसाठी डोकेदुखी ठरत असून त्यातून उत्पत्ती होणाऱ्या डासांचा उपद्रव नदीकाठच्या रहिवाशांना सहन करावा लागत आहे. परिसरातील वस्त्यांमधील अनेक जणांचे आरोग्य बिघड असून रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. एकंदरीतच इंद्रायणीतील जलपर्णी आसपासच्या गावांना त्रासदायक ठरत असून इंद्रायणी शुद्धीकरणासाठी योग्य पाठपुरावा लवकरात लवकर व्हावा, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.
  • प्रशासन झाले हतबल :
    इंद्रायणी नदी परिसरात हवेली व खेड तालुक्‍याच्या हद्दीत प्रदूषणाच्या जोडीने नदी किनाऱ्यावर अतिक्रमण होऊ लागल्याने पात्र अरुंद होण्यास सुरवात झाली आहे. धार्मिक व विकासात्मक अशा विविध कारणांनी इंद्रायणीमधील प्रदूषणाचा आलेख दिवसेंदिवस उंचावत आहे. औद्योगिक क्षेत्रातील सांडपाणी व घरगुती वापरातील सांडपाणी कुठल्याही प्रक्रियेविना सर्रास नद्यांमध्ये मिसळत असल्याने नद्यांच्या प्रदूषणाचा प्रश्न गंभीर झाला आहे. पाणवनस्पती व जलपर्णी हटविण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र नदीपात्रातून जलपर्णी काढल्यानंतरही पुन्हा त्यांची वाढ पुन्हा प्रचंड वेगाने होत असल्याने प्रशासनही हतबल असल्याचा अनुभव आहे.
  • त्या योजना नेमक्‍या कुठे मुरतायत?
    पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व मुख्य नाले आणि एमआयडीसी परिसरातील शेकडो कंपन्यांतून निघणारं रसायनयुक्‍त पाणी या इंद्रायणीत सोडले जाते. मात्र, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे तर दुसरीकडे पिंपरी महापालिकेतील सत्ताधारी मात्र नदी संवर्धनासाठी करू एवढेच म्हणण्यात व्यस्त आहेत. त्यामुळे एकेकाळी खळखळुन वाहणाऱ्या इंद्रायणीचा श्‍वास आता या जलपर्णींखाली गुदमरतोय. तो मोकळा करणे ही आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे. मात्र “नमामि गंगे, नमामि चन्द्रभागे’ म्हणत नदी स्वच्छतेसाठी आणल्या गेलेल्या करोडोंच्या योजना नेमक्‍या कुठे मुरतायत यावर देखील अनेक प्रश्‍नचिन्ह उपस्थित होतायत.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)