जलतरणाचा खेळखंडोबा

तलावायन भाग 9

मोठ्या प्रमाणावर दूरवस्था : वारंवार तलाव बंद ठेवण्याची नामुष्की

पिंपरी – थेरगाव येथील कांतीलाल खिंवसरा नरसिंग पाटील जलतरण तलाव पाणी खराब झाल्याने सध्या बंद ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे पाण्याची कमतरता व पाणी खराब असल्याचे कारण देत तलाव वारंवार बंद केला जातो. तलावातील फरशा फुटल्या असून आतील पायऱ्या व शिड्‌याही तुटल्या आहेत. तसेच तलावाच्या आतील कडप्पेही तुटले आहेत. तसेच येथील लाईट व्यवस्था बसवण्याचे काम सुरु असून बाकीचीही सर्व दुरुस्तीची कामे करण्यासाठी आणखी काही दिवस तलाव बंद ठेवला जाणार आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात तलाव बंद असल्याने जलतरणप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.

थेरगाव जलतरण तलावाची क्षमता एकावेळी 100 लोक पोहू शकतील एवढी आहे. मात्र याठिकाणी उन्हाळ्याचा हंगाम असल्याने लोकांची गर्दी होत आहे. मात्र येथे केवळ 2 जीवरक्षक व एकच सुरक्षा रक्षक काम पहात आहेत. त्यामुळे येथे आणखी 2 जीवरक्षक व एका सुरक्षा रक्षकाची गरज असल्याचे नागरिकांनी सांगितले. तसेच ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे या तलावाची दूरवस्था झाली असून या परिसरात अस्वच्छताही दिसून आली. तसेच या ठिकाणी “प्रभात’च्या प्रतिनिधीने भेट दिली तेव्हा येथे सुरक्षा रक्षकच जागेवर नसल्याचे दिसून आले. एकूण तलावाची सुरक्षाच ऐरणीवर आहे. तलाव परिसरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असून तलावाच्या पार्किंगमध्ये दारुच्या बाटल्याही आढळून आल्या. तलावाचे पार्किंग हे दारुड्यांचा रोजचाच अड्डा बनला असल्याचे नागरिकांनी सांगितले.

व्यवस्थापकाची मुजोरी
तलाव परिसरात सुरक्षा रक्षक जागेवर नाही. वाहनतळात दारु बाटल्या आढळून आल्या, तलाव बंद का आहे व तलावासंबंधी अन्य समस्यांबाबत व्यवस्थापक निखील काळजे यांना “प्रभात’च्या प्रतिनिधींनी विचारणा केली असता. या व्यवस्थापकाची उत्तरे देताना बोबडीच वळाली. अखेर त्याने अरेरावी करत आम्हाला विचारणारे तुम्ही कोण, तुम्हाला काय करायचे ते करा माझे काही वाकडे होणार नाही, अशा शब्दात चुकीच्या कारभारावर पांघरुण घालण्याचा प्रयत्न केला. स्थानिक नगरसेविका माया बारणे यांनीही व्यवस्थापकाच्या मुजोरीबद्दल नाराजी व्यक्त केली. हा व्यवस्थापक लोकप्रतिनिधींनाही जुमानत नसल्याचे त्यांनी सांगितले. हा तलाव स्वयंसेवी संस्था अथवा गणेश मंडळांना चालवण्यास द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

नागरिकांच्या मागण्या
– तलाव वारंवार बंद ठेवु नये
– 2 जीव रक्षक व 1 सुरक्षा रक्षक त्वरीत नेमावा
– लहान मुलांची व महिलांसाठी स्वतंत्र बॅच वाढवावी
– तलाव परिसरातील मद्यपींवर कारवाई करावी
– महिलांसाठी स्वतंत्र महिला सुरक्षा रक्षक व जीवरक्षक नेमावेत
– पिण्याच्या पाण्याची सोय करावी
– येथील कर्मचाऱ्यांवर महापालिकेच्या वरिष्ठांनी नियंत्रण ठेवावे
– येथील स्वच्छतेकडे रोजच्या रोज लक्ष द्यावे
– येथील पार्किंग व्यवस्थेला शिस्त लावावी


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)