जर काही मुक्तच होणार असेल तर ते भाजप मुक्त असेल

ज्येष्ठ कॉंग्रेस नेते चिदंबरम यांचे प्रतिपादन
बंगळुरू – भारतीय जनता पक्षाच्या कॉंग्रेस मुक्त भारत या संकल्पनेची कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी फार धास्ती घेण्याचे कारण नाही कारण जर काही मुक्तच होणार असेल तर ते भाजप मुक्त भारतच असेल असे प्रतिपादन ज्येष्ठ कॉंग्रेस नेते पी चिदंबरम यांनी केले आहे. येथे पक्ष कार्यकर्त्यांशी बोलताना ते म्हणाले की एक काळ असा होता की कॉंग्रेस देशात निर्विवाद वर्चस्व असलेली पार्टी होती पण आता स्थिती बदलली आहे.

पक्ष कार्यकर्त्यांनी बुथ पातळीवर कॉंग्रेस मजबूत करण्याची गरज आहे कारण आज निवडणुका बुथ पातळीवरील व्यवस्थापनाने जिंकल्या जातात असे ते म्हणाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ते म्हणाले की एक काळ असा होता की केवळ इंदिरा गांधी आणि पंडित नेहरुंचे नाव घेतले की लक्षावधी मतदार मतदान बुथ वर येत आणि कॉंग्रेसला मतदान करीत. पण आता आपल्याला बुथ पातळीवर कॉंग्रेस मजबूत करावी लागेल. कारण तेथील मजबूतीवरच पक्षाचे राजकीय महत्व अवलंबून आहे. आज अनेक राजकीय पक्ष आपल्यापुढे मजबुतीने आव्हान निर्माण करीत असून आता प्रादेशिक पक्षही मोठ्या प्रमाणावर आपला प्रभाव प्रस्थापित करीत आहेत. असे असले तरी देशात आज केवळ दोनच प्रमुख राष्ट्रीय पक्ष आहेत, एक कॉंग्रेस आणि दुसरी भाजप.

भाजपचे लोक आपल्याला मुर्ख बनवण्याचा सातत्याने प्रयत्न करीत आहेत. पण आपण त्यांचे हे प्रयत्न हाणून पाडले पाहिजेत. त्यांनी कॉंग्रेस मुक्त भारताच्या कितीही वल्गना केल्या तरी ते अजिबात शक्‍य नाही उलट जर काही मुक्त होणारच असेल तर देश भाजप मुक्त झालेला असेल असेही चिदंबरम यांनी यावेळी निक्षुन सांगितले.ते म्हणाले की गुजरात सारख्या राज्यात आपण पराभूत झालो असलो तरी कॉंग्रेसचे तेथील अस्तित्व ठसठशीतपणे लोकांच्या समोर आले आहे.

कर्नाटक सारख्या राज्यातही आपला पराभव झाला असला तरी तेथील कॉंग्रेसची ताकद ही भाजप पेक्षाही जास्त आहे कारण तेथे कॉंग्रेसला 38 टक्के आणि भाजपला केवळ 36 टक्के मते मिळाली आहेत असेही त्यांनी नमूद केले.कर्नाटकात बुथ पातळीवर कॉंग्रेस मजबूत करण्यासाठी शक्ती या उपक्रमाचे उद्‌घाटन चिदंबरम यांच्या हस्ते झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)