जरा जपून … आला दिशाहीन तेजी-मंदीचा काळ (भाग-१)

मागील आठवड्याच्या शेवटच्या दोन दिवसांत बाजारानं चांगली तेजी मंदी अनुभवली. अमेरिकेनं आपल्या पतधोरणात बदल न केल्यामुळं गुरुवारी बाजार चांगलाच उसळला, परंतु इराणनं अमेरिकेचे ड्रोन पाडल्याच्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर हल्लाबोल करण्याची दिलेली धमकी, वाढलेल्या कच्च्या तेलाच्या किंमती आणि रुपयाच्या तुलनेत उसळलेला अमेरिकी डॉलर या गोष्टी पुन्हा शुक्रवारी बाजारास खाली ओढण्यास पुरेशा ठरल्या आणि आठवड्याच्या शेवटास बाजाराची अवस्था आदल्या दिवशी दिलेलं क्रीमयुक्त बिस्कीट क्रीम खाऊन परत मिळाल्यासारखी झाली. बिस्कीट तर आहे परंतु त्यास काही अर्थ नाही ! एकूणच मागील एक महिना बाजार हा एका ठराविक पट्ट्यातच दिशाहीन भटकताना आढळत आहे.

एका अभ्यासानुसार राष्ट्रीय बाजारावर नोंदणीकृत असलेल्या एकूण कंपन्यांपैकी ७५% कंपन्यांचे शेअर्स व राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक असलेल्या निफ्टी५० मधील कंपन्यांपैकी ४२% कंपन्या ह्या त्यांच्या २०० दिवसांच्या चलत सरासरीच्या खाली व्यवहार करताना आढळत आहेत. तांत्रिक अभ्यासाच्या लोकप्रिय व सर्वमान्य अभ्यासानुसार २०० दिवसांच्या चलत सरासरीच्या खाली कोणताही शेअरचा व्यवहार होणं ही त्या कंपनीच्या शेअर्सच्या व्यवहारांसाठी नकारात्मक घटना समजली जाते. परंतु माझ्यामते तरी हा गुंतवणुकीसाठी ठोस मूलमंत्र ठरू शकत नाही. माझ्या अंदाजानुसार निफ्टी50 निर्देशांकास खालील बाजूस ११६०० व ११४२० च्या आसपास चांगला आधार संभवतो आणि अशा आधारांजवळ निफ्टी आल्यास त्यामधील कंपन्यांमधून चांगल्या कंपन्यांच्या शेअर्स निवडीसाठी ती एक संधी ठरू शकेल. तरीही, एकूणच मॉन्सूनची पुढील वाटचाल, पुढील महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून जाहीर होणारे प्रमुख कंपन्यांच्या पहिल्या तिमाहीचे निकाल, पुढील आठवड्याच्या शेवटास असलेला अर्थसंकल्प, कच्च्या तेलाच्या किंमती व जागतिक घडामोडी या गोष्टी बाजार अस्थिर ठेवण्यास पुरेशा ठरतील.

… पर मजा आता है..!

आता वळूयात या आठवड्याच्या एक्सलूझिव्ह विषयाकडं,  १९९९ सालात आमच्याकडं परमार नामक, पुण्यातील एक नामवंत व्यापारी यायचे. शेअर ट्रेडिंग हा त्यांचा छंद-वजा खेळ होता, कारण उत्तम कंपन्यांचे शेअर्स त्यांच्याकडं असून देखील ते रोज कॉम्प्युटर समोर बसून ट्रेडिंग करत राहायचे व कधी शेकड्यांत कमवून तर कधी हजारांत घालवून हसत बाहेर पडायचे. बाहेर पडताना त्यांच्या मुखात एक वाक्य असायचे, “प्रसादभाई, शेअर बाजार में पैसा जाता हैं, पर मजाबहुत आता हैं I” आता बाजारात अशा अनेक वल्ली पाहावयास मिळतात. मागील आठवड्यात आपण पाहिलं की बाजारात उलट पोझिशन घेतल्यास मंदीलाही हसत सामोरं जाता येतं, कारण बाजार पडत असतो परंतु खिशात (म्हणजे, ब्रोकरकडील अकौंटमध्ये) पैसे जमा होत असतात. मागच्या एका महिन्यात जर कांही शेअर्सवर आपण नजर टाकली तर लक्षात येईल की त्या कंपन्यांच्या शेअर्सचं होत्याचं नव्हतं झालंय. उदाहरणंच द्यायची झाली तर जेट एअरवेज (५२%), जैन इरिगेशन(५०%), रिलायन्स इन्फ्रा (४३%), रिलायन्स कॅपिटल (४२%), येसबँक(२५%), आदी दिग्गज कंपन्यांची देता येतील जे या महिन्यात अनुक्रमे पडले आहेत.

जरा जपून … आला दिशाहीन तेजी-मंदीचा काळ (भाग-२)

प्रत्येक कंपनीच्या भावातील पडझडीमागं एक कारण मात्र कॉमन होतं ते म्हणजे आर्थिक पेच.अशा कंपन्यांमुळं अनेकांचे हात कपाळावर पडले परंतु जेट एअरवेजच्या शेअर्सच्या भावामुळं मात्र सर्वांचीच म्हणजे त्या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक न केलेल्यांची देखील बोटं तोंडात गेली. याचं कारण त्या कंपनीच्या शेअर्सच्या भावांमधील चढ-उतार.. २० जून रोजी बाजार उघडल्यावर अगदी पहिल्या मिनिटात जेट एअरवेजच्या शेअरनं २६.५५रु. हा आतापर्यंतचा नीचांकी भाव नोंदवला (जो भाव १९ जूनच्या बंद भावाच्या तुलनेत १९.८० % खाली होता) आणि नंतर मात्र त्यानं उर्ध्व दिशेस मार्गक्रमण करीत बाजार बंद होण्याआधी पाचच मिनिटं ८२.७५ हा त्या दिवसातील सर्वोच्च भाव नोंदवून रु.६२.८५ या भावात बंद दिला.  म्हणजेच एका दिवसात या शेअरनं तिप्पट वाढ नोंदवली, तर दिवसानुसार बंद भावातील वाढ होती सुमारे ९०%. नंतर पुढच्याच दिवशी, म्हणजे २१ जून रोजीचा या शेअर्सचा बंद भाव होता ७२.६. म्हणजेच दोन दिवसांत ११९% वाढ. तरी हा शेअर या जून महिन्यात मागील महिन्याच्या बंद भावाच्या म्हणजेच, ३१ मे च्या तुलनेत अजून ५० टक्के खालीच आहे. नक्कीच हे आकडे चक्रावून टाकणारे आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.