सांगली – राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांची आज निवड झाल्याचा आनंद येथे पेढे वाटून, फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष साजरा करण्यात आला. जिल्हा परिषदेसमोरील पक्षाच्या कार्यालयात स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
जयंत पाटील यांची निवड होणार, हे कालपासूनच चर्चेत होते. त्याबद्दल सांगलीत प्रचंड उत्सुकता होती. त्यांची निवड जाहीर होताच कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयात गर्दी केली. महिला आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्ष विनया पाठक, विधानसभा शहर क्षेत्राध्यक्ष सागर घोडके, उत्तम कांबळे, दिग्विजय सूर्यवंशी आदी प्रमुखांच्या उपस्थितीत पेढे वाटण्यात आले.
याआधी दिवंगत आर. आर. पाटील यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षपद भूषवले होते.
आता विधानसभा, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर जयंतरावांकडे पक्षाची धुरा सोपवण्यात आली आहे. त्याबद्दल कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त करतानाच महाराष्ट्रात राष्ट्रवादीची सत्ता आणण्यासाठी अत्यंत योग्य नेत्याची निवड झाल्याची भावना व्यक्त केली. 2 तारखेला नागरी सत्कार लोकनेते राजारामबापू पाटील जनता पक्ष आणि कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते. त्यांचे सुपुत्र जयंत यांनाही या पदावर कामाची संधी मिळाली आहे. जयंत पाटील यांचे 2 तारखेला इस्लामपुरात आगमन होणार आहे. या दिवशी त्यांचा नागरी सत्कार घेण्याचे नियोजन राष्ट्रवादी कॉंग्रेसने केले असल्याचे शहाजी पाटील, खंडेराव जाधव यांनी सांगितले.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा