जमिनी विकून पाटीलकी करणे बरोबर नाही

शरद पवार : वडगाव घेनंद येथे स्व. नारायणराव पवार यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

राजगुरूनगर- खेड तालुक्‍यात साखर कारखाने देऊ; मात्र या तालुक्‍यातील शेतकरी ऊस उत्पादन करतील का? हा प्रश्‍न आहे. सरकार कोणाचेही असो साखर कारखाना मंजुरीला अडथळा येणार नाही. जमिनी विकून पाटीलकी करणे बरोबर नाही. शेती आणि उद्योगधंदे करणारी उत्तम पिढी तयार करणे काळाची गरज आहे. स्वर्गीय नारायणराव पवार यांचा आदर्श घेत त्यांची पुढची पिढी काम करीत आहे. तालुक्‍याचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम नारायणराव पवार यांनी केले, असे गौरवोद्‌गार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी काढले.

खेड तालुक्‍यातील हरित क्रांतीचे जनक लोकनेते माजी आमदार स्व. नारायणराव पवार यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण रविवारी (दि.28) वडगाव घेनंद येथे शरद पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसेपाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, माजी आमदार दिलीप मोहिते पाटील, राम कांडगे, पोपटराव गावडे, जगन्नाथ शेवाळे, प्रकाश म्हस्के, माजी सभापती रमेश पवार, स्व. पवार यांचे नातू ऋषिकेश पवार, कन्या प्रिया पवार, माजी उपसभापती अमोल पवार, रामदास ठाकूर, बाबा राक्षे, देवदत्त निकम, देवेंद्र बुट्टे पाटील, शांताराम भोसले, कैलास सांडभोर, कैलास लिंभोरे यांच्यासह मोठ्या संख्येने नारायणराव पवार समर्थक, ऋषीकेश पवार मित्र परिवार, परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले, खेड तालुक्‍याच्या विकासात माजी आमदार स्व. नारायणराव पवार यांचे योगदान मोठे आहे. त्यांनी तालुक्‍याच्या विकासाला नेहमी चालना दिली. तालुक्‍यात 54 शाळा आणि 46 बंधारे बांधणारे त्यावेळचे ते पहिले आमदार होते. शिवाय शिक्षण संस्था उभ्या केल्यानंतर त्यात कधीही सहभाग घेतला नाही, त्या-त्या गावाच्या लोकांच्या हातात त्या दिल्या. शिरूर तालुक्‍याला वरदान ठरणारे चासकमान धरणाची त्यांनी निर्मिती केल्याने शिरूर तालुका सधन बनला, यात नारायणराव पवारांची भूमिका मोठी भूमिका असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, माजी आमदार दिलीप मोहितेपाटील, बाबा राक्षे, पोपटराव तांबे आदींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदेश टोपे यांनी केले तर कैलास घेनंद यांनी आभार मानले.

  • स्व. नारायण पवार कर्तव्यदक्ष आमदार
    खेड तालुक्‍यातील अनेक सहकारी संस्थांवर स्व. नारायणराव पवार यांनी ठसा उमटवला. स्वत:पेक्षा जनतेच्या कामाला त्यांनी जास्त महत्त्व दिले. विधानसभेत कर्तृत्व सिद्ध करणारे ते कर्तव्यदक्ष आमदार होते, असे शरद पवार यांनी नमूद केले.
  • बैलगाडा शर्यत भावनेचा प्रश्‍न
    बैलगाडा हा नागरिकांच्या भावनेचा प्रश्‍न आहे. एखादा खेळ लोकांच्या आवडीचा असतो तर त्याला सरकारने मान्यता दिली पाहिजे. केंद्र सरकाने कायदा बदलला पाहिजे. याबाबत पाठपुरावा सुरू आहे. संबंधित विभागाशी बैलगाडा मालक शिष्टमंडळाशी चर्चा केली आहे. नागरिकांच्या भावनेचा प्रश्‍न आहे, लोक त्याला समरस झालेले असतात. त्यावर सरकराने एवढी टोकाची भूमिका घेऊ नये. आम्ही ठरवले आहे. पुन्हा एकदा संबंधित विभागाचे मंत्री, अधिकारी संघटनेची लोकांसोबत बैठक लावून कायदा बदलावा लोकसभेत मंजूर करावा, राज्यसभेत मंजूर करण्याचा प्रयत्न करू, असे आश्‍वासन शरद पवार यांनी दिले.
Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)