जनतेच्या सुख-दुःखांची जाणीव असावी लागते

  • आमदार पाचर्णे यांचा डॉ. कोल्हेंना टोला : आढळरावांच्या प्रचारार्थ अण्णापूर येथे कोपरासभा

मांडवगण फराटा, दि. 17 (वार्ताहर) – जुन्नर तालुक्‍यात बिबट्यांच्या हल्ल्यात अनेक शेतकरी जखमी झाले, काहींना प्राण गमवावा लागला. त्यावेळी डॉ. कोल्हे यांनी पीडितांची भेट घेऊन त्यांचे अश्रू पुसल्याचे ऐकिवात तरी आहे का? आता त्यांना आपण भूमिपूत्र असल्याची जाणीव झाली आहे. जनतेच्या सुख-दुःखांची जाणीव असावी लागते. कुठलेही काम करायचे असेल तर आधी प्रशिक्षण घ्यावे लागते. तेव्हा डॉ. कोल्हे यांना आधी समाजसेवेचे प्रशिक्षण घेऊ द्या. पण यावेळी केंद्रात मंत्रिपदाची संधी असलेल्या खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनाच पुन्हा एकदा लोकसभेत पाठवा असे आवाहन आमदार बाबुराव पाचर्णे यांनी केले.
शिवसेना-भाजप-रासप-आरपीआय-रासप-शिवसंग्राम-रयतक्रांती महायुतीचे उमेदवार तथा खासदार शिवाजीराव आढळराव यांच्या प्रचारार्थ मंगळवारी (दि. 16) शिरूर तालुक्‍यातील अण्णापूर, रामलिंग, करडे, आंबळे, न्हावरे, कोहकडेवाडी, नागरगाव, आंधळगाव, कुरुळी, वडगाव रासाई, सादलगाव, मांडवगण फराटा व कोळगाव डोळस आदी गावांचा दौरा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मांडवगण फराटा येथे झालेल्या कोपरासभेत पाचर्णे बोलत होते. यावेळी माजी सभापती वाल्मिकराव कुरंदळे, पं.स.सदस्य आबासाहेब सरोदे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अनिल काशीद, भाजपचे तालुकाध्यक्ष भगवानराव शेळके, तालुकाप्रमुख पोपट शेलार, सरपंच दत्तात्रय कुरंदळे, नामदेवराव घावटे पाटील, नगरसेवक विठ्ठल पवार, रवी शिंदे, महेश कुरंदळे, भाऊसाहेब गिरे, किरण झंझाड, दत्ता चौगुले, भाऊसाहेब चौगुले, बापूसाहेब शिंदे, रामभाऊ देवकर, हृषिकेश नवले, विकास पवार, धनंजय शिंदे यांच्यासह मतदार उपस्थित होते. या दौऱ्याला ठिकठिकाणी मोठा प्रतिसाद मिळाला.
खासदार आढळराव पाटील म्हणाले की, गेली 15 वर्ष आपण दिवस-रात्र जनतेची सेवा करीत असून 24 तास नागरिकांसाठी उपलब्ध असतो. दर रविवारी जनता दरबार भरवून जनतेच्या समस्या सोडवण्याचे प्रयत्न करतो. मतदारसंघातील प्रत्येक गावांत जाऊन मी संपर्क करीत असल्याने माझी नाळ जनतेशी जोडलेली आहे जनतेच्या पाठिंब्याच्या बळावर मी विजयाचा चौकार मारणारच असा आत्मविश्‍वास आहे. तरी सोमवारी (दि. 29) धनुष्यबाणासमोरील बटन दाबून आपल्याला विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.