जनतेची सेवा करण्याची अॅक्टिंग मला करावी लागली नाही

आढळराव पाटील : तुमच्यासाठी मी दिवसाचे 24 तास उपलब्ध

राजुरी- तुम्ही माझी जीवाभावाची माणसं आहात, तुमच्यासाठी मी दिवसाचे 24 तास उपलब्ध असतो. माझा कायमच तुमच्याशी संपर्क असतो. पावसाळ्यातील छत्र्यांप्रमाणे निवडणूक आली उगवत नाही. जनतेची सेवा करण्याची अॅक्टिंग मला कधी करावी लागली नाही, कारण तुम्हाला कायमच उत्तरदायी असणारा हा तुमचा हा दादा तुमच्या सुख-दु:खात मी नेहमीच सहभागी होत असतो. माझ्याकडे काम घेऊन येणाऱ्या व्यक्‍तीची “जात’ मी कधीच पाहिली नाही. व्यक्‍तीगत फायद्यासाठी जाती-जातीत भांडणं लावण्याचं काम केलं नाही असे भावनिक उद्‌गार शिवसेना-भाजप-आरपीआय-रासप-शिवसंग्राम महायुतीचे उमेदवार खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी काढले.
जुन्नर तालुक्‍यातील आळे-पिंपळवंडी आणि बेल्हा-राजुरी जिल्हा परिषद गटाचा प्रचार दौरा केला, त्यावेळी ते बोलत होते. या प्रचार दौऱ्याचा प्रारंभ 14 नंबर येथून झाला. त्यावेळी त्यांनी श्री साईबाबांच्या पालखीला खांदा दिला. यावेळी साईभक्‍तांनी अनंत कोटी ब्रम्हांड नायक श्री सच्चिदानंद सद्‌गुरु साईनाथ महाराज की जय अशा घोषणा देत त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यावेळी त्यांच्यासमवेत आमदार शरददादा सोनवणे, शिवसेना जि. प. गटनेत्या आशाताई बुचके, जि. प. सदस्य गुलाबराव पारखे, मा. जि. प. सदस्य प्रसन्न डोके, तालुकाप्रमुख माऊली खंडागळे, नारायणगावचे सरपंच बाबुभाऊ पाटे, युवासेना जिल्हा अधिकारी गणेश कवडे, मा. सभापती संगिताताई वाघ, संतोषनाना खैरे, मंगेश काकडे तसेच शिवसेना-भाजपचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
या दौऱ्यात खासदार आढळराव पाटील यांनी 14 नंबर, वडामाथा कांदळी, वडगाव, भोरवाडी, साळवाडी, बोरी खुर्द, बोरी बुद्रुक, शिरोली, सुलतानपुर, निमगाव सावा, औरंगपूर, पारगाव तर्फे आळे, मंगरुळ, साकोरी, बेल्हे, वडगाव आनंद, पादीरवाडी, आळेफाटा, संतवाडी, कोळवाडी, आळे, राजुरी आदी गावांचा प्रचारदौरा केला. या दौऱ्यात ठिकठिकाणी त्यांचे जोरदार रॅलीद्वारे स्वागत करण्यात आले.
ठिकठिकाणी ग्रामस्थांशी संवाद साधताना खासदार आढळराव पाटील यांनी केलेल्या कामांची माहिती ग्रामस्थांना दिली. संपूर्ण शिरुर लोकसभा मतदारसंघात सुमारे 14 हजार कोटींहून अधिक रकमेची विकासकामे मार्गी लावली असल्याचे सांगत केवळ आळे-पिंपळवंडी व बेल्हे-राजुरी गटात सतरा कोटींहून अधिक रकमेची कामे केली आहेत. तसेच आगामी काळात पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे पूर्ण झाल्यानंतर आपल्या ग्रामीण भागाचा चेहरामोहरा पालटणार आहे. विशेषत: जुन्नर तालुक्‍यातील शेतमाल पाठवणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल हे मी तुम्हाला आवर्जून सांगते असेही खासदार शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले.

आढळराव दादा केंद्रात मंत्री होणार आहेत, त्यामुळे आपल्या जुन्नर तालुक्‍यातून मोठे मताधिक्‍क्‍य देण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. त्यासाठी केंद्रात नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्याची तर दादांना शिरुरमधून पुन्हा खासदार बनवून आपल्याला इतिहास घडवायचा आहे. ज्या पक्षाला 15 वर्षे तुम्ही राज्यात-केंद्रात सत्ता दिलीत, त्यावेळी राष्ट्रवादीचे नेते भ्रष्टाचारात मग्न होते. तेव्हा सत्तेत असताना काही करता आलं नाही, ते विरोधी पक्षात बसून तुमचा विकास काय करणार, असा सवालही आमदार सोनवणे यांनी विचारला. आढळऱाव दादांनी मोठ्या कष्टाने विकासकामांचा डोंगर उभा केला आहे. रस्ते, रेल्वेसारखे मंजूर करुन आणलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी खासदार आढळराव पाटील यांच्यासारख्या अनुभवीच लोकप्रतिनिधी निवडून द्यायला हवा.
-शरद सोनवणे, जुन्नर

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.