जनता वसाहत, की कचरा डेपो?

आरोग्य धोक्‍यात : जलशुद्धीकरण केंद्र परिसर प्रदूषित

पुणे – पर्वतीच्या पायथ्यालगतच्या जनता वसाहतीत कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. प्रामुख्याने जलकेंद्राची मागील बाजू, जनता वसाहतीमधून पानमळ्याकडे जाणारा लोखंडी पूल आणि रस्त्यावर कचऱ्याचे ढीग लागले आहे. हा कचरा पावसामुळे कुजत असून त्याच्या तयार झालेल्या “लिचेट’मुळे या भागात दुर्गंधी पसरलेली आहे. या शिवाय डासांचा त्रास वाढला असून नागरिकांना आजारांचा सामना करावा लागत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जनता वसाहत ही शहरातील मोठी झोपडपट्टी असून हजारो नागरिक या भागात वास्तव्यास आहेत. ही वसाहत प्रामुख्याने पर्वती जलकेंद्राच्या मागील बाजूस असलेल्या नवीन खडकवासला कालव्याच्या बाजूने आहे. या रस्त्याचा वापर या भागातील नागरिक ये-जा करण्यासाठी करतात. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून येथे प्रचंड कचरा आणून टाकला जात आहे. यामुळे आरोग्य धोक्‍यात आले आहे. या कचऱ्याचे प्रमाणही मोठे असून त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली असल्याचे चित्र आहे. ही बाब लक्षात घेऊन नागरिकांनी महापालिका प्रशासन तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींकडे याबाबत तक्रारी केल्या होत्या. मात्र, त्यानंतरही काहीच झालेले नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. तर एका बाजूला काही रहाण्यायोग्य शहर म्हणून पुरस्कार घेत असलेल्या महापालिकेच्या हद्दीत आम्हाला राहणेही कठीण झाल्याचे काही नागरिक सांगतात.

गेल्या तीन महिन्यांपासून या भागात मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचे ढीग आहेत. याची माहिती प्रशासनास वारंवार देण्यात आली आहे. त्या नंतरही काहीच हालचाल होत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना असून प्रशासनाने वेळीच दाखल न घेतल्यास तीव्र आंदोलन केले जाईल.
– राहुल तुपेरे, माजी नगरसेवक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)