#आगळे वेगळे : जड झाले ओझे… 

अनुराधा पवार
कधी कधी काही गोष्टींची मोठी गंमत वाटते, विशेषत: या राजकारण्यांची. काही दिवसांपूर्वी कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्याची बातमी सर्व पेपर्सना आली होती आणि टीव्हीवरही दाखवली होती, अनेकदा. कर्नाटकाचे मुख्यमंत्री कुमारस्वामी एक कोणत्यातरी कार्यक्रमात रडले म्हणे. म्हणाले, हा मुख्यमंत्रीपदाचा भार जड झाला आहे. पेलवत नाही. कधीही मुख्यमंत्रीपद सोडून देईन. हे आणि असे बरेच काही ते बोलले. अर्थात हा सारा रोख होता राजकारणातील दबावतंत्रावर. कॉंग्रेसच्या मेहरबानीने मुख्यमंत्री बनलेल्या कुमारस्वामींना इच्छा नसली, तरीे मजबुरीमुळे नको तेथे झुकावे लागत असावे. कदाचित त्यांना आपले रूपांतर कठपुतळीमध्ये-कळसूत्री बाहुलीत होत असल्याची जाणीव झाली असेल आणि कळसूत्री बाहुलीची कळ सोसवेनाशी झाली असेल. त्याच परिणाम सार्वजनिक ठिकाणी डोळ्यातून पाणी येण्यात झाला असेल.
आता गंमत अशी आहे, की त्यांना कोणी त्यांच्या इच्छेचिरुद्ध, जबरदस्तीने मुख्यमंत्री केलेले नव्हते. आकाशातून पडल्यासारखे मुख्यमंत्रीपद त्यांच्या गळ्यात पडले. किंगमेकर होण्याची अपेक्षा बाळगणाऱ्या कुमारस्वामी यांनी स्वत:च किंग म्हणजे मुख्यमंत्री होंण्याची संधी अगदी आवडी घेतली. आता न मागता मिळालेले मुख्यमंत्रीपद समोर आल्यावर त्यांनी ते घेतले. आणि घेतले म्हटल्यावर त्याची किंमत मोजणे भागच आहे. जगात कोणतीही गोष्ट फुकट मिळत नाही. तिची केवळ पैशातच नाही, तर कोणत्या ना कोणत्या स्वरूपात किंमत चुकवावीच लागते. हे तर त्रिवार सत्य आहे. त्यातून सुटका नाही. मग कुमारस्वामी यांचे हे सार्वजनिक रुदन नाट्य कशासाठी?
बाकी ज्याच्या डोक्‍यावर खरोखरचे ओझे असते, टेन्श्‍न असते, तो सहसा त्याचे प्रदर्शन करत नाही. त्या तशाच नेटाने रेटून नेतो. झुंजतो.
उथळ पाण्याला खळखळाट जास्त म्हणतात ना, तसाच प्रकार असतो बरेच वेळा. जड झाले ओझे म्हणतात ना, ते ओझे अनेक प्रकारचे असते. पण मुख्य प्रकार दोन-शारीरिक आणि मानसिक-मुख्यत: भावनिक.
शारीरिक ओझेही अनेक प्रकारचे. काही तात्पुरते तर काही जन्माला पुरणारे. ज्यामुळे श्रम होतात, थकवा येतो ते ओझे परवडते. कारण विश्रामानंतर थकवा जातो. जसे ओझे कायमचे नसते, तसा विश्रामही कायमचा नसतो. काही आजारपणे येतात आणि जातात. पण काही कायमची सोबत करतात. बीपी, मधुमेह ही अशीच दुखणी. कायमची साथ देणारी. ती सोबत आली की हव्या असलेल्या अनेक गोष्टींना तिलांजली द्यावी लागते. मनात नसले तरीही. माझ्या एका काकाला मधुमेह आहे. तो म्हणतो, या मधुमेह नावाच्या रोगाने जीवनातला सारा गोडवाच हिरावून घेतला आहे. पण काय करणार? जीवन गाणे गातच जावे म्हणतात ना तसे आहे. जीवन जगतच राहावे लागते. रस्त्यातून जाताना दिसते, की अनेक अपंग,व्यांधींनी ग्रासलेले, विकलांग झालेले जीवनाचे ओझे वाहत जातच असतात. उलट अतिश्रीमंत अनेकदा तक्रारी करत असताना दिसतात. माणसाला सुख बोचते म्हणतात ना, अगदी खरे आहे.
भावनिक ओझीही तशीच. काही दिसतात, दाखवता येतात. काही छुपी असतात. दिसत नाहीत, दाखवता येत नाहीत आणि त्यावर काही उपायही नसतो. देवाने माणसाला दोन हात, दोन पाय, दोन डोळे , नाक-कान आदी अवयव दिले आहेत. ते आपण स्वीकारतो. घेऊन वावरतो. होईल तेथे सुधारतो. चष्मा, श्रवणयंत्रे, अगदी पेसमेकरपर्यंत साधने घेऊन माणूस जीवन सुसह्य करण्याचा प्रयत्न करतो. करत राहतो.
त्याला जड झाले ओझे असे म्हणताही येत नाही. म्हणूही नये. कोणी कोणाचे ओझे वाहत नाही. ते ज्याचे त्यालाच वाहावे लागते.
आणि हे जग सोडून जाताना माणूस सोबत काय घेऊन जाणार? धन, दौलत, पैसाअडका, काहीही नाही. सारे घर भरलेले असले, बाकी तर काही नेता येत नाही. जातात फक्त आठवणी. त्या चांगल्या असल्या तर मुक्ती मिळते. नाही, तर 84 लक्ष योनींचा फेरा आहेच चालू. मरताना राम नाम घ्यावे अशी रीत आहे ती यासाठी. रामनामाने मुक्ती मिळते. निदान संसाराच्या जाळ्यातून. हे नक्की.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)