छताला गळती अन्‌ वायपरही बंदच; पीएमपीची अवस्था

पुणे – शहराची प्रमुख सार्वजनिक वाहतूक असणाऱ्या पीएमपी बसेस सध्या बिकट अवस्थेत आहेत. सध्याच्या अवस्थेमुळे प्रवाशांना बस थांबे आणि बसमध्ये पावसाचा अनुभव घ्यावा लागत आहे.

पावसात धावणाऱ्या अनेक बसेसचे वायपर बंद असल्याने चालकांना करावी लागते. बसेसच्या काचा फुटक्‍या असल्याने खिडक्‍यांतून पाऊस आत येतो. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

पावसाळ्यापूर्वी तब्बल 1,100 बसची देखभाल आणि दुरुस्ती केली असल्याचे पीएमपी प्रशासनाकडून सांगण्यात आले. प्रत्यक्षात मात्र नादुरुस्त बसेस रस्त्यावर धावत असल्याने प्रवाशांनी बसेसची दुरुस्ती केली असल्याच्या दाव्यावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहे.

याबाबत प्रवासी निलकंठ मांढरे सांगतात, “बसने प्रवास करताना अचानक पाऊस सुरू झाला. काही वेळातच छतातून पाणी गळण्यास सुरुवात झाली. त्याचबरोबर गाडीचा वायपर देखील सुरू नव्हता. त्यामुळे चालकाला समोरचे दिसणेही कठीण झाले. बसच्या अशा स्थितीने प्रवास करणे धोकादायक वाटल्याने नाईलाजाने वाटेतच उतरलो.’

दरम्यान, या सर्व प्रकाराबाबत पीएमपी प्रशासनाने सांगितले, “आतापर्यंत 12 तक्रारी आल्या आहेत. बसेस दुरुस्तीबाबत कार्यवाही सुरू आहे.’ तर, या तक्रारी 12पेक्षा कितीतरी अधिक असल्याचा दावा पीएमपी प्रवाशांनी केला आहे.

पावसाळ्यात पीएमपी बसेसमधून पाणी गळते. त्याचबरोबर काही बसेसच्या काचांना तडे गेले आहेत, वायपरसुद्धा नादुरुस्त आहेत. काचांच्या या दुरवस्थेमुळे चालकांना बस चालविणे कठीण होते. परिणामी पावसाळ्यामध्ये नादुरुस्त बसेसमधून प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो.
– नीळकंठ मांढरे, प्रवासी

Leave A Reply

Your email address will not be published.