चौकार की त्रिफळा!

“शिवाजी विरूद्ध संभाजी’ रंगली लढत

जिल्हा प्रतिनिधी

पुणे-अगदी सुरुवातीपासूनच राज्यभरात चर्चेत राहिलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघात आज (दि. 29) चौथ्या टप्प्यात किरकोळ अपवाद वगळता कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततेत मतदान झाले. पुण्यातील मतदानाचा टक्का पाहता व सलग सुट्यांचा विचार करता मतदानाचा टक्का वाढविण्याचे निवडणूक कर्मचाऱ्यांपुढे मोठे आव्हान होते. त्यातच गेली महिनाभराहून अधिक काळ निवडणुकीत वातावरण तापलेले होते. आज दिवसभर प्रचंड उकाडा असतानाही मतदारांचा उत्साह पाहायला मिळाला. सायंकाळी सहापर्यंत तब्बल 21 लाख 73 हजार 424 मतदारांपैकी सुमारे —–टक्के मतदारांनी या लोकशाहीच्या उत्सवात सहभाग घेत आपला मतदानाचा हक्क बजावला.

 • सकाळच्या काही तारसांमध्ये मतदानाचा वाढलेला वेग दुपारच्या सत्रात काहीसा मंदावलेला दिसला. दुपारी दोन वाजेपर्यंत सुमारे 35 टक्के मतदान झाले. तर चारनंतर मतदान केंद्रांवर पुन्हा रांगा मोठ्या दिसायला लागल्या. सायंकाळच्या टप्प्यात मतदान चांगले वाढल्याने मतदानाच्या टक्केवारीने साठी पार केली. कात्रजच्या घाटापासून ते ठाणे जिल्ह्याच्या सरहद्दीवर माळशेज घाटापर्यंत आणि रायगड जिल्ह्याची सीमेवरील भीमाशंकर ते नगर जिल्ह्याचे दक्षिणेकडील टोक शिरूर तालुक्‍यातील मांडवगण फराटा अशी तब्बल 5500 चौरस किलोमीटर भौगोलिक रचना असणाऱ्या शिरूर लोकसभा मतदारसंघात यंदाच्या निवडणूक मोठी चुरशीची पाहायला मिळाली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे डॉ. अमोल कोल्हे विरूद्ध शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील या प्रमुख उमेदवारांसह 23 जण या लोकसभा मतदारसंघातून रिंगणात होते. तरीही ही लढत शिवसेना व राष्ट्रवादी अशीच पाहायला मिळाली.

पुणे-नाशिक रेल्वे, वाहतूककोंडी, विमानतळ, बेराजगारी अन्‌ शेतमाला मिळत नसलेला बाजारभाव हे मुद्दे प्रचारात अग्रस्थानी होते. 15 वर्षांपेक्षा एनडीए सरकारच्या पाच वर्षांचय काळात सर्वाधिक निधी आणल्याचे खासदारांनी सांगितले तर 15 वर्षे खासदार कसे निष्क्रीय राहीले, याचा पाढा विरोधकांनी वाचला. शिवसेनेच्या प्रचाराला केंद्रातील मंत्र्यांसह, मुख्यमंत्री, मंत्रीमंडळातील इतर सहकारी, आजी-माजी आमदार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी हजेरी लावली. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून दिलीप वळसे पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली प्रचाराची सुत्रे होती. दरम्यान शरद पवार, अजित पवार, धनंजय मुंडे यांच्यासह माजी मंत्री, आजी-माजी आमदार यांनी प्रचारामध्ये राळ उडवून दिली.

 • युवा मतदारांचा टक्का निर्णायक
  या मतदारसंघात एकूण मतदारांची संख्या 21 लाख 11 हजार 465 इतकी आहे. त्यात 9 लाख 99 हजार 66 महिला आहेत. तर त्यापैकी 18 ते 39 वयोगटातील मतदार 11 लाख 57 हजार 103 इतकी आहे. हा युवा मतदारांचा टक्का निम्म्याहून अधिक आहे. हा वर्ग आपल्याकडे खेचण्यासाठी दोन्ही उमेदवारांनी जीवाचे रान केलेले पाहायला मिळाले.

विधानसभानिहाय काय राहिली चर्चा

मतदारसंघपुरूष मतदारस्त्री मतदारएकूण मतदार
जुन्नर1,53,4441,45,4032,98,848
जुन्नर मतदान केंद्रे 356

 • स्थानिक उमेदवार विरूद्ध कट्टर शिवसैनिक
  याआधीच्या तिन्ही निवडणुकांत मतदारांनी शिवसेनेला लीड दिले आहे. यावेळी आमदार शरद सोनवणे यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर जुन्या-जाणत्या; परंतु शिवसेनेपासून दुरावलेल्या नेत्यांसह केलेला शिवसेनाप्रवेश. रुसवेफुगवे काढण्यात आलेले यश त्यातच गावोगावी केलेला प्रचार ही शिवसेनेसाठी जमेची बाजू आहे. तर यावेळी राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांनी एकत्र येऊन प्रचार केला. तसेच कॉंग्रेसही प्रचारात सक्रीय राहिली. महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रवादीचे उमेदवार हे स्थानिक व तालुक्‍यातील असल्यामुळे येथे राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या पारड्यात मतदारांनी आपले मत टाकले की आमदार शरद सोनवणेंचा शिवसेना पक्षप्रवेश व आशा बुचके यांची काढलेली समजूत यामुळे मागील तीन निवडणुकांप्रमाणे येथून शिवसेनेला लीड मिळते हे निकालानंतरच स्पष्ट होईल.

मतदारसंघपुरूष मतदारस्त्री मतदारएकूण मतदार
आंबेगाव1,44,4631,35,8712,80,334
आंबेगाव-शिरूर मतदान केंद्रे 344

 • आमचं ठरलंय!
  आंबेगाव विधानसभा हे विद्यमान खासदारांचे होमपीच; मात्र येथेही यावेळी राष्ट्रवादीने मोठे आव्हान निर्माण केले. दोन्ही नेते तुल्यबळ असले तरी आंबेगावच्या मतदारांना दोघेही हवे आहेत, ही जणू परंपराच झाली आहे. आमदारकीला आम्ही तुमच्यासोबत पण खासदारकीला यांच्यासोबतच राहणार हे “आमचं ठरलंय!’, असे अनेक मतदार उघड-उघड सांगतात. गेल्या काही निवडणुकींचा इतिहास पाहिला तर तालुक्‍यातील मतदारांची भूमिका लवचिक राहिली आहे. येथील मतदारांना दोन्ही नेते हवे असल्याने विधानसभेला राष्ट्रवादीला भरभरून लीड देणारे लोकसभेला हेच मतांचे दान शिवसेनेच्या पारड्यात टाकतात. यावेळी चित्र बदलेल अशी अपेक्षा राष्ट्रवादीला आहे.

मतदारसंघपुरूष मतदारस्त्री मतदारएकूण मतदार
खेड-आळंदी1,54,2861,68,7633,23,051
खेड-आळंदी मतदान केंद्रे 379

तालुका ठरवतोय खासदारांचे भवितव्य
पूर्वीचा खेड व आताचा शिरूर लोकसभा मतदारसंघ खेड तालुक्‍यातल जनतेमुळे नेहमीच चर्चेत राहिला आहे. येथील मतदार ज्या उमेदवाराच्या पाठिशी राहिला तो उमेदवार निवडून येण्याचा इतिहास आहे. यावेळी खासदार, आमदार सत्ताधारी आहेत; परंतु विरोधकांनी निर्माण केलेल्या प्रश्‍नांना उत्तरे देताना सत्ताधाऱ्यांना नाकीनऊ आल्याचे संपूर्ण प्रचारात पाहायला मिळाले. बैलगाडा शर्यत, विमानतळाचे झालेले स्थलांतर, बेरोजगारी, स्थानिक उमेदवारांना नोकरीत डावलणे, चाकण-खेडमधील होत असलेली वाहतूककोंडी हे मुद्दे प्रामुख्याने विरोधकांनी टार्गेट केले. यातील बरेचसे प्रश्‍न सुटण्याच्या मार्गावर असले तरी मतदारांना ते कितपत पटलेत हे येणाऱ्या निकालातूनच स्पष्ट होईल.

मतदारसंघपुरूष मतदारस्त्री मतदारएकूण मतदार
शिरूर-हवेली1,93,0761,76,7913,69,812
शिरूर-हवेली मतदान केंद्रे 388

 • नेत्यांचे मनोमिलन राष्ट्रवादीच्या पथ्यावर
  या मतदारसंघात वाहतूककोंडी ही समस्या सत्ताधाऱ्यांसाठी मोठी डोकेदुखी ठरलेली आहे. एमआयडीसीतील रोजगाराचा प्रश्‍न, शिरूर तालुक्‍याच्या पूर्व भागात असेलेली पाणी टंचाई. हवेली तालुक्‍यातील सर्वांत मोठा प्रश्‍न म्हणजे यशवंत कारखाना सुरू करण्यात आलेले अपयश. या गोष्टी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आहेत. दुसरीकडे अष्टविनायक थेऊर परिसर व अनेक होत असलेली विकासकामे येथे सत्ताधाऱ्यांना फायदेशीर ठरतील. स्थानिक आमदारही भाजपचेच असल्याने युतीची मते वाढणे अपेक्षित आहे. तर राष्ट्रवादीचा उमेदवार तुलनेने तुल्यबळ असल्याने व स्थानिक स्वराज्य संस्था राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. कधी नव्हे ते सर्व नेते मतभेद विसरून प्रचारात सक्रीय झाल्याने राष्ट्रवादीलाही मताधिक्‍याची अपेक्षा आहे.

मतदारसंघपुरूष मतदारस्त्री मतदारएकूण मतदार
भोसरी2,26,7801,86,8864,13,680
भोसरी मतदान केंद्रे

 • आजी-माजी आमदारांकडे खासदारांचे भवितव्य
  शिरूर लोकसभा मतदारसंघात पिंपरी चिंचवडमधील असलेला हा मतदारसंघ नात्यागोत्याच्या संबंधांनी जोडलेला आहे. या मतदारसंघाने याआधी सर्वच निवडणुकांत शिवसेनेनला मताधिक्‍य दिले आहे. अगदी 2009मध्ये राष्ट्रवादीकडे स्थानिक उमेदवार असूनही लीड शिवसेनेला मिळाले होते. यावेळी युती झाल्याने आमदार शिवसेनेचा प्रचार करीत आहेत; मात्र आमदारसमर्थकांनी शिवसेना उमेदवाराचा किती मनापासून प्रचार केला हे निकालानंतर स्पष्ट होईल. तर उमेदवारी न मिळाल्याने सुरुवातीला नाराज असलेले माजी आमदार नंतर मात्र प्रचारात सक्रीय झालेले दिसले. याच निवडणुकीत राष्ट्रवादीचे विधानसभेचे गणित अवलंबून असल्याने माजी आमदारांसह, महापालिकेतील विरोधी पक्षनेते यांनीही आपली ताकद पणाला लावली आहे.

मतदारसंघपुरूष मतदारस्त्री मतदारएकूण मतदार
हडपसर2,58,2662,29,4114,87,699
हडपसर मतदान केंद्र

शहरी तोंडावळा असलेल्या या मतदारसंघात स्थापिक स्वराज्य संस्थेत आधी कॉंग्रेस व नंतर राष्ट्रवादीची ताकद मोठी राहिलेली आहे. तर विधासभेवर आधी शिवसेनेचे व आता भाजपचे आमदार निवडून आले आहेत. खासदारकीच्या निवडणुकीत या मतदारसंघाने शिवसेनेला मोठी साथ दिली. यावेळी मात्र शरद पवार, अजित पवार यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते एकदिलाने कामाला लागलेत. या मतदारसंघात माळी समाजाचे मोठे प्राबल्य आहे. स्वतः आमदार माळी समाजाचे असले तरी आमदारकीला तुम्हाला मदत केली आता खासदारकीलाही आपल्याच समाजाचा उमेदवार असावा, अशी या समाजाची भूमिका प्रचारादरम्यान दिसली. त्यामुळे राष्ट्रवादीच्या उमेदवाराला त्याचा कितपत फायदा होईल, याची उत्सुकता आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.