चोरीचे खापर फोटले ‘लिफ्टवर’

सुरक्षा विभागाने बंद केली महापालिकेतील दिव्यांगासाठीची लिफ्ट

पुणे – महापालिकेतील सुरक्षा रक्षकांच्या अनागोंदी कारभारामुळे मागील आठवड्यात पालिकेच्या नवीन विस्तारीत इमारतमध्ये चोरी झाली होती. या चोरीचे खापर सुरक्षा विभागाने चक्क या इमारतीत दिव्यांगासाठी उभारलेले लिफ्टवर फोडले आहे. या लिफ्टमुळेच चोरांना आडोसा मिळत असल्याचे सांगत ही लिफ्टच चोरीनंतर बंद ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

मागील आठवड्यात पालिकेच्या विस्तारीत इमारतीत चोरीचा प्रकार घडला होता. यात स्वच्छतागृहातील सुमारे 20 नळ, हॅन्डफ्लश, फायर ब्रिगेडचे हॉजपाईप तसेच आठ ते दहा पितळी नॉझलसह एक सीसीटीव्हीही चोरीला गेला आहे. या इमारतीत वारंवार असे प्रकार घडत असतानाही प्रशासनाने त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे. त्यातच, या इमारतीसाठी सुरक्षारक्षक असतानाही हे प्रकार होत असल्याने सुरक्षा व्यवस्थेवरच प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले आहे. असे असतानाच सुरक्षा व्यवस्था सक्षम करण्याऐवजी सुरक्षा विभागाकडून ही चोरी करण्यासाठी चोरट्यांनी दिव्यांगांसाठी उभारण्यात आलेली लिफ्ट वापरली आहे. ही लिफ्ट इमारतीच्या प्रवेशद्वारावर असलेल्या सुरक्षा रक्षकांच्या निदर्शनास येत नाही. त्यामुळे ती बंद करण्याची मागणी विद्युत विभागाकडे केली. तसेच, विद्युत विभागाकडून काही निर्णय होण्याआधीच या सुरक्षा रक्षकांनीच ती परस्पर बंद केली आहे. त्यामुळे पालिकेत आलेल्या दिव्यांगांची चांगलीच अडचण झाली आहे. या विस्तारीत इमारतीला दिव्यांगांसाठी रॅम्प उभारण्यात आलेला नाही. मात्र, स्वतंत्र लिफ्ट असून तिथपर्यंत जाण्यासाठी रॅम्पची सोय आहे. त्यामुळे याचा वापर सुरू होता. मात्र, आता चोरीचे कारण देत ही लिफ्टही बंद ठेवण्यात आली असल्याने प्रशासनाची दिव्यांगाबाबत असलेली अनास्था पुन्हा एकदा समोर आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.