चॅलेंज

मान्सूनचे वारे वाहू लागतील, तसतसे वातावरणात बदल होतात. त्याचप्रमाणं जसजसे निवडणुकीचे वारे वाहू लागतील, तसतसे राजकीय वातावरणातही बरेच बदल घडतात हा अनुभव आहे. सर्वप्रथम लोकप्रिय घोषणांचा पाऊस सुरू होतो. हे काम (म्हणजे आश्‍वासनं देण्याचं) आचारसंहिता लागू होण्यापूर्वी करावं लागतं. प्रत्यक्ष कामं करणं बंधनकारक नसतं. कारण दिलेल्या आश्‍वासनांच्या पूर्ततेसाठीच पुढची पाच वर्षे मागायची असतात. वेळ निघून जाण्यापूर्वी घोषणा करणं महत्त्वाचं असतं.

आजकाल तर आश्‍वासनपूर्ती झाली नाही तरी लोकांच्या नाराजीतून सहीसलामत निसटण्याचीही व्यवस्था झालेली आहे. ती म्हणजे तुमच्या काळात काय घडलं, या मुख्य प्रश्‍नाभोवती पिंगा घालणारे दुसऱ्या, तिसऱ्या फळीचे नेते आणि मुख्य म्हणजे याच प्रश्‍नाभोवती फिरणारा सोशल मीडिया! अहो, पेट्रोल आणि डिझेलच्या अवास्तव दरवाढीचं आणि त्यामुळं वाढत असलेल्या एकंदर महागाईचंसुद्धा सोशल मीडियावरून होत असलेलं समर्थन आम्ही उघड्या डोळ्यांनी बघतोय. आजकाल डेटा फुकट मिळतोय म्हणून पेट्रोल दरवाढीवर लोक बोलायला लागलेत, अशा पातळीपर्यंत हे समर्थन पोहोचलंय. मुख्य म्हणजे, असे संदेश धडाधड पाठवणारेसुद्धा पेट्रोल पंपावर जायला घाबरतायत.

एकंदरीतच सोशल मीडियाचं आभासी विश्‍व अत्यंत सीरिअसली घेतलं जातंय आणि वास्तव बोथट होत चाललंय. आश्‍वासनांबरोबरच आव्हानं हाही राजकीय वातावरणातल्या बदलाचा आणखी एक संकेत होय. राजकारणी मंडळी एकमेकांना आव्हानं देत सुटली, की निवडणूक जवळ आली हे ओळखावं. आश्‍वासनं जितकी अवास्तव तितकीच आव्हानंही अवास्तवच!

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

हल्ली मात्र एका विचित्र आव्हानाची चर्चा देशभर सुरू आहे. ते आव्हान देशातील परिस्थिती बदलण्याविषयीचं नसून, येणाऱ्या निवडणुकीसाठी स्वतःला शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त ठेवण्यासंबंधीचं आहे. फिटनेस चॅलेंज या विषयावरची चर्चा माध्यमं आणि समाजमाध्यमं इतकी करतायत, की राजकारणी माणसं जिममध्ये जाऊ लागली की संपूर्ण देशाची प्रकृती सुदृढ होईल, असंच वातावरण निर्माण होऊ पाहतंय. पूर्वाश्रमीचे खेळाडू आणि सध्याचे केंद्रीय मंत्री राज्यवर्धन राठोड यांनी या चॅलेंजची सुरुवात केली. आपल्या कक्षातच पुश-अप्स काढतानाचा व्हिडिओ शेअर करून त्यांनी फिटनेस चॅलेंज हा शब्द देशभर घुमवला.

पाठोपाठ क्रिकेटपटू विराट कोहलीनं राठोड यांचं चॅलेंज स्वीकारलं आणि थेट पंतप्रधानांनाच फिटनेस चॅलेंज देऊन टाकलं. मग पंतप्रधानांनी विराटचं चॅलेंज स्वीकारलं आणि लवकरच आपल्या फिटनेसचा व्हिडिओ शेअर करू असं सांगितलं. (हे सगळं सोशल मीडियावर बरं का!) मग माध्यमांमध्ये या चॅलेंजची चर्चा रंगली. या सगळ्या घडामोडींना एका मोहिमेचं स्टेटस प्राप्त झालं. मग सोशल मीडिया कशाला मागे राहील? तिथंही थट्टा-मस्करी, आव्हानं-प्रतिआव्हानं सुरू झाली.

खात्या-पित्या घरातल्या लोकांनी एकमेकांना दिलेल्या फिटनेस चॅलेंजची चर्चा सोशल मीडियावर गरीबगुरीब माणसांनी रिकाम्यापोटी करावी, हीच तर सोशल मीडियाची खरी ताकद आहे. अर्थव्यवस्थेच्या फिटनेसचा मुद्दा आपोआप मागे पडला की नाही? अर्थव्यवस्थेची सकारात्मक आकडेवारी रोज ताटात येऊन पडतेय. शेअर बाजार फुगताना दिसतोय; मग आमच्या घराचं बजेट का बिघडलंय, हा प्रश्‍न मागे पडला की नाही? बाईकमध्ये पेट्रोल भरण्याऐवजी मोबाइल रिचार्ज करणं अधिक महत्त्वाचं वाटू लागलं की नाही? म्हणूनच फिटनेस चॅलेंजसारख्या मोहिमा दीर्घकाळ सुरू राहणं अत्यावश्‍यक आहे.

हिमांशू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)