चॅरिटेबल साडेपाच कोटीची थकबाकी हि गंभीर बात

आ. पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप ः कॉंग्रेसच्या सांगता सभेत मतदारांचा गर्दीचा उच्चांक

कराड – गत पाच वर्षाच्या काळात मनोहर शिंदे यांनी मलकापूरमध्ये केलेला विकासात्मक कायापालट जगभर सर्वश्रृत आहे. मलकापूरचा इतिहास काय हे माहिती नसणाऱ्यांनी निवडणुकीत बेताल वक्तव्ये करण्याचा उद्योग सुरु केला आहे. चॅरिटेबलने मलकापूर नगरपंचायतीची साडेपाच कोटी रुपयांची थकबाकी थकवली आहे, ही गंभीर बाब असून ती माफ करण्याच्या उद्देशानेच डॉ. अतुल भोसले हे मलकापूरची सत्ता ताब्यात घेण्यासाठी आटापिटा करीत असल्याचा घणाघाती आरोप आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मलकापूर नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुक प्रचारार्थ आगाशिवनगर, ता. कराड येथे आयोजीत केलेल्या प्रचार सांगता सभेत ते बोलत होते. यावेळी आ. आनंदराव पाटील, आ. जयकुमार गोरे, ऍड. उदयसिंह पाटील, ऍड. राजाभाऊ पाटील, मनोहर शिंदे, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार निलम येडगे, राजेंद्र यादव, हिंदूराव पाटील, कराडचे भाजपचे नगरसेवक इंद्रजीत गुजर, अजीत पाटील-चिखलीकर, सभापती फरिदा इनामदार, बंडानाना जगताप, प्रदीप पाटील तसेच सर्व उमेदवार यांची उपस्थिती होती.

आ. चव्हाण म्हणाले, माजी आमदार स्वातंत्र्य सैनिक स्व. भास्करराव शिंदे यांचा आदर्श वैचारिक वारसा समर्थपणे चालवणाऱ्या मलकापूर शहराच्या विकासाची भूमिका घेवूनच सर्वजण काम करीत आहेत. राष्ट्रीय कॉंग्रेसच्या माध्यमातून मलकापूर शहराचा पूर्णपणे कायापालट होत आहे. केवळ विकासात्मक कायापालट नव्हे तर विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी आणि नाविण्यपूर्ण कल्पक पथदर्शी प्रकल्प यशस्वी करुन मलकापूर नगरपरिषदेने अनेक बहुमान पटकावले आहेत. या गौरवशाली वाटचालीचा मी साक्षीदार आहे. आज कै. भास्करराव शिंदे यांच्या स्वप्नातील मलकापूर साकारले आहे. महाराष्ट्रातील सर्वात वेगाने वाढलेले शहर म्हणून मलकापूरची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. पिण्याचे पाणी मीटरने देण्याची योजना राबवणाऱ्या मलकापूर शहराची नगरविकास खात्याने विशेष दखल घेत नगरविकास खात्याच्या पुस्तकात या शहराची नोंद केली आहे.

आ. जयकुमार गोरे म्हणाले, एक हाती सत्ता मिळाली नाही तर विरोधकांचे फावते. यामुळे विकासकामांना खीळ बसते. मनोहर शिंदे म्हणाले, कृष्णा चॅरिटेबलमुळे मलकापूरला वैभव प्राप्त झाले अशा वल्गना करीत जनतेची दिशाभूल करणाऱ्या डॉ. अतुल भोसले यांचा खोटारडेपणा या निवडणुकीच्या निमित्ताने चव्हाट्यावर आला आहे. मलकापूर नगरपंचायतीची सुमारे साडेपाच कोटी रुपयांची थकबाकी थकविणाऱ्या डॉ. अतुल भोसले यांना मलकापूरवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही.

ट्रस्टची असणारी थकबाकी माफ व्हावी अथवा गंगाजळी जावी, याचसाठी मलकापूरची सत्ता मिळविण्याचे स्वप्न डॉ. भोसले बाळगूण आहेत. मात्र मलकापूरची जनता हे स्वप्न पूर्ण होवू देणार नाही. यासाठी मतदारांनी कॉंग्रेसच्याच उमेदवारांना निवडून द्यावे, असेही आवाहन शिंदे यांनी यावेळी केले. यावेळी आ. आनंदराव पाटील, ऍड. उदयसिंह पाटील, बंडानाना जगताप, ऍड. राजाभाऊ पाटील यांची भाषणे झाली. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कॉंग्रेसच्या जाहीरनाम्याने प्रकाशन करण्यात आले. प्रास्तावीक आनंदराव सुतार यांनी केले. आभार राजेंद्र यादव यांनी मानले.

भाजपाच्या घोषणा पोकळ

भाजपा सरकारने सर्वसामान्य जनतेवर अनेक घोषणांची खैरात केली. मात्र प्रत्यक्षात जनतेच्या पदरी निराशाच देण्याचे काम या सरकारने केले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये मोदी सरकार व फडणवीस सरकारला सर्वसामान्य मतदारच सत्तेवरुन खाली खेचतील, असा विश्‍वास आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.

सभांचा सपाटा

मलकापूर पंचवार्षिक निवडणुकीसाठी दोन्ही गटाकडून कोपरा सभांसह जाहीर सभांचा सपाटा सुरु आहे. प्रभागनिहाय होणाऱ्या सभांचा विचार करता शुक्रवारी झालेल्या कॉंग्रेसच्या सांगता सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहत मतदारांनी गर्दीचा उच्चांक नोंदविला. याची एकच चर्चा सर्वत्र सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)