चॅम्पियन्स करंडक स्पर्धेसाठी भारतीय हॉकी संघाची घोषणा 

सरदार सिंग, वीरेंद्र लाक्रा यांचे पुनरागमन 
नवी दिल्ली – हॉलंड येथे 23 जूनपासून रंगणाऱ्या चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली असून या संघात भारतीय संघाचा माजी कर्णधार व मध्यरक्षक सरदार सिंग आणि वीरेंद्र लाक्रा यांचे पुनरागमन झाले आहे. तसेच पी. आर. श्रीजेशकडे संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार सरदार सिंगचे पुनरागमन हेच या संघाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले आहे. राष्ट्रकुल क्रीडास्पर्धांमध्ये सरदारला संघातून वगळण्यात आले होते. त्या स्पर्धेत भारताने निराशाजनक कामगिरी केली होती. त्यामुळे सरदारला पुन्हा संघात स्थान मिळणार हे जवळपास निश्‍चित होते. त्यातच बंगळुरू येथे झालेल्या राष्ट्रीय शिबिरातही त्याला सहभागी करून घेण्यात आल्यामुळे त्याच्या पुनरागमनाची शक्‍यता अधिक होती. अपेक्षेप्रमाणे त्याला भारतीय संघात पुन्हा स्थान मिळाले आहे.

सरदारप्रमाणेच राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेला मुकलेला वीरेंद्र लाक्रा याचेही संघात पुनरागमन झाले आहे. जरमनप्रीत सिंग, सुरेंद्र सिंग, रमणदीप सिंग यांनाही संघात स्थान देण्यात आले आहे. तर खराब कामगिरीमुळे रूपिंदर, कोठाजीत सिंग आणि गुरिंदर सिंग यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. ललित उपाध्याय आणि गुरजन्त सिंग यांनाही संघात स्थान मिळवता आले नसून रमणदीप सिंगने बाजी मारली आहे. भारताची सलामीची लढत 23 जून रोजी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा हॉलंडमधील ब्रेडा येथे 23 जून रोजी सुरू होणार आहे. या स्पर्धेसाठी आज 18 जणांच्या संघाची घोषणा करण्यात आली असून अनुभवी गोलरक्षक पी. आर. श्रीजेश याच्याकडे संघाच्या कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. या संघात गोलरक्षक सूरज करकेरा याच्या जागी कृष्ण बहादूर पाठकची वर्णी लागली आहे. गतवर्षी या स्पर्धेत भारताने रौप्यपदक मिळवले होते. यंदाच्या स्पर्धेत भारतीय संघ चांगली कामगिरी करेल, असा विश्वास कर्णधार श्रीजेशने व्यक्‍त केला आहे.

भारतीय संघ – 
गोलरक्षक – श्रीजेश परत्तु रविंद्रन (कर्णधार) व कृष्ण बहादूर पाठक.
बचावपटू – हरमनप्रीत सिंग, वरुण कुमार, सुरेंद्र कुमार, जरमनप्रीत सिंग, वीरेंद्र लाक्रा व अमित रोहिदास.
मध्यरक्षक – मनप्रीत सिंग, चिंग्लेसाना सिंग (उपकर्णधार), सरदार सिंग व विवेक सागर प्रसाद.
आघाडीवीर – सुनील विठ्ठलाचार्य, रमणदीप सिंग, मनदीप सिंग, सुमित कुमार (ज्युनिअर), आकाशदीप सिंग व दिलप्रीत सिंग.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)