चूल आणि मूल “एप्रिल फूल’ (भाग १)

प्रा. शैलेश कुलकर्णी

आपल्या प्रत्येकाला जगण्यापलीकडचं जीवन अधिक आनंद देत असतं. ह्या आनंदात आपण आत्मकेंद्रित झालो, तर मात्र इतरांच्या बाबतीतल्या आपल्या जाणिवाच संपुष्टात येण्याची शक्‍यता असते. आयुष्यात दुसऱ्यांसाठी, खरं तर, करण्यासारखं खूप काही असत; पण आपलंच तिकडे लक्ष नसतं. आनंदातिरेकानं काही वेळा आपल्याला जगाचा, इतरांचा विसर पडतो, पण दु:खाच्या वेळी मात्र प्रत्येकाच्या आठवणी आल्याशिवाय आपला एकही क्षण जात नाही. कोणालाही एखाद्याच्या दु:खापेक्षा सुखात सहभागी व्हायलाच आवडत असतं. सद्य:स्थितीत तर ह्या व्हर्च्युअल जगात रममाण झालेल्या व्यक्ती फेसबुकवरील तुमच्या पोस्टला कदाचित लाईक करतीलही, पण ती पोस्ट शेअर करतीलच असं नाही, अथवा त्यावर कॉमेंट करतीलच असंही नाही. आपणही अनेकदा ट्‌विट करण्याऐवजी क्‍विट करणं अधिक पसंत करतो, योग्य समजतो. का ? काय कारण असू शकेल बरं ? आपापसातील गोष्टी शेअर करण्यातून परस्परांची केअर केल्याची प्रचीती येते, काही वेळा बेअर देखील करावं लागतं; तरच कोणालाही डेअर करताना आश्‍वासक वातावरणाची अनुभूती येत असते. ह्यांपैकी खरंच आपण काय काय करतो? ह्याची गरज नसते का? ह्या सर्वच बाबींची अभ्यासपूर्वक जाणीव करून घेण्याची जरुरी असते.

संस्कृतीच्या नावाखाली…

आजच्या आधुनिक युगातही सर्वच समाजात पुरुषांच्या दृष्टिकोनातून स्त्रीची समानता आभासीच असल्याचं स्पष्ट होतं. अर्थात सद्य:स्थितीत समता आणि स्वातंत्र्य स्त्रीला दिलेलं दिसतं; ते एकूणच शिक्षणानं आलेल्या समाजभानामुळे, स्त्रीला झालेल्या तिच्या मानवी हक्कांच्या जाणिवेमुळे, कायद्यामुळे आणि एकंदरच जगात सर्वत्र वाहत असलेल्या स्वातंत्र्य, समता इत्यादी तत्त्वांच्या विचारप्रवाहामुळ अगदी खोलात जाऊन अभ्यासाच्या दृष्टिकोनातून वस्तुस्थितीकडे बघितलं तर, मुळातच सरंजामी वृत्तीतून येणारी पुरुषी वर्चस्वाची मानसिकता आणि त्यातून निपजणारी विवेकहीनता बदललेली नाही, हे स्पष्ट होतं. एक प्रकारे ही विकृतीच असल्याचं म्हणावं लागेल. अनेकदा संस्कृतीच्या नावाखाली अनेक विचार मांडले जातात, स्त्रियांशी वर्तनही त्याचप्रमाणे केलं जातं आणि तिच्याबरोबर व्यवहार न करता व्यभिचारच केला जातो. एकीकडे आपला देश प्रगत होत असल्याची चर्चा आपण करत असतो, तर दुसरीकडे संस्कृतीच्या बुरख्याखाली स्त्रीचं अस्तित्वच झाकून ठेवतो. काही वेळा तर ते अस्तित्वच संपुष्टात आणलं जातं-स्त्रीभ्रूणहत्या करून. ही असली संस्कारविरहित संकृती काय कामाची? अर्थात संकृती इतकाच ह्या विकृतीला देखील मोठा इतिहास आहे, अलीकडच्या काळांत हे विषय चव्हाट्यावर यायला लागले आहेत इतकेच. पुरुष प्रधान संस्कृतीला अजिबात आक्षेप असायचं कारण नाही, परंतु त्या संस्कृतीच्या नावाखाली जे विकृतीकरण होत आहे, त्यातील गांभीर्याची जाणीव होणं जरुरीचं आहे.

मी” विकृतीचा पगडा

सर्वच जातिधर्मांत, एकूणच आपल्या समाजात हजारो वर्षांपासून परंपरागत रूढी-परंपरा आणि धारणांमुळे पुरुषी वर्चस्वाच्या मानसिकतेचा परिपोष होत असतो. पण त्यातून स्त्रीबद्दल पुरुषांच्या ठायी असूया निर्माण होत असते ही अत्यंत निंदनीय बाब असल्याचं म्हणता येईल. खरं तर, स्त्रीला लाभलेल्या कायदेशीर स्वातंत्र्यामुळे, शिक्षणामुळे आणि अंगी असलेल्या गुणवत्तेमुळे जे नेत्रदीपक यश ती मिळवत असते, ते यशच पुरुषांना आपल्या वर्चस्वाला बसलेला धक्का वाटत असतो का ? पुरुषांकडून स्त्रीच्या गुणवत्तेविषयी आदराऐवजी असूयेने भरलेली, स्त्रीस्वातंत्र्याच्या संतापाने खदखदणारी अनेक अनाकलनीय वक्तव्यं आपण ऐकत असतो, हे प्रत्येक सुज्ञ व्यक्ती केवळ मान्यच करेल असं नाही, तर त्याच्याशी सहमत देखील होईल. कदाचित ह्याच रोषाचं प्रकटीकरण म्हणून पुरुषी वर्चस्व जिथे हमखास दाखविता येईल, तिथे बलात्कारात, स्त्रीवरील अत्याचारांत दिसून येतं. ह्या पुरुषी “मी” विकृतीचा पगडा इतका असतो कि, स्त्रीच्या बाबतीत पुरुष हिंसाचार करायला देखील मागेपुढे बघत नाही. अशा प्रकारे पुरुषत्वाचं जाहीर प्रदर्शन करण्यांत कोणता पुरुषार्थ दाखवायचा असतो, हाच कळीचा मुद्दा आहे. किमान एक माणूस म्हणून तरी ह्याची जाणीव ठेवणं आवश्‍यक असतं.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.