तुमच्याआधीच माझं बरचं काही ठरलयं : आ. गोरे

सर्वपक्षीय नेत्यांवर बोचरी टीका; एकत्रित आलेल्या नेत्यांची खेळी बारामतीच्या इशाऱ्यावर

सातारा, दि. 30

ज्यांची साधी जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती सदस्य व्हायची लायकी नाही, अशा माण- खटावमधील बाजारबुणग्यांचे ठरायच्या अगोदर माझे बरेच काही ठरलेय. हनीमुनपण झालेय. ज्यांना साधे बसचे तिकीट मिळायची मुश्‍कील आहे ते माझ्या तिकीटाला विरोध करत आहेत. पण या जयकुमारने लोकसभेचे तिकीट आणि खासदारकीही आणली हे त्यांनी विसरु नये.

आमचं ठरलयं म्हणणारे फक्त मला आडवायला एकत्र आलेत. त्यांना माण खटावच्या पाणीप्रश्नाचे काही देणे घेणे नाही. एकत्र यायची बुद्धिपण त्यांची नाही. बारामतीतून चावी मिळाल्याने त्यांचे माकडचाळे सुरु आहेत, अशी बोचरी टीका आमदार जयकुमार गोरे यांनी विरोधकांवर केली. त्यांचे काहीही ठरले असले तरी माझी पाणी प्रश्नाबाबतची प्रामाणिक भूमिका आणि प्रयत्न जनतेला माहित आहेत. माझी लढाई दुष्काळाशी आहे. माझी बांधीलकी इथल्या जनतेशी आहे.

माझा पक्षच जनता आहे. त्यामुळे कुणीही कितीही प्रयत्न केले तरी माझे काहीही बिघडणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. बोराटवाडी येथे प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमाला माण आणि खटावमधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

जयकुमार यांच्या विरोधात दोन्ही तालुक्‍यांतील सर्वपक्षीय प्रमुखांनी आमचं ठरलयं असे म्हणत आघाडी उघडली आहे. जयकुमार गोरे यांच्यावर विरोधकांनी अनेक वेळा टीका केली होती. आज गोरेंनी विरोधकांच्या टीकेचा समाचार घेतला. गोरे म्हणाले, “”जनतेला पाणीप्रश्न सोडविण्याचे आणि सर्वांगीण विकासाचे दाखवलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिलो. बारामती आणि फलटणकर निष्क्रिय राहिले म्हणूनच एका शेतकऱ्याचं पोरगं दहा वर्षापूर्वी माण खटावचा आमदार झाले. माझ्या प्रयत्नांना यश आले आणि उरमोडीचे पाणी 90 गावांमध्ये पोहचले. आता जिहे कठापूर आणि टेंभूचेही पाणी दृष्टीक्षेपात आले आहे. त्यासाठी केलेल्या प्रयत्नांना मुख्यमंत्र्यांसह जलसंपदा आणि सहकारमंत्र्यांनी पाठबळ दिले आहे. अगदी पाणीवाटप लवादातील तरतुदी बदलण्याच्याही हालचाली होऊन माण खटावला हक्काचे पाणी मिळवणार आहे.”

आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही बाजारबुणग्यांच्या अंगात आले आहे. मला थांबवायचा एकमेव अजेंडा घेऊन काहीजण ठरवून एकत्र आले आहेत. त्यांना जनतेशी काही देणेघेणे नाही, असे सांगून गोरे म्हणाले, “”ज्या मायणीत सर्वाधिक वर्षे आमदारकी होती त्या गावाला प्यायला पाणी मिळत नाही.

अपघाताने एकदा निवडून आलेल्यांना जनतेने त्यांची लायकी ओळखून पाचच वर्षात घरी बसविले. माझ्या विरोधात डिपॉझीट जप्त झाले होते हे विसरुन दुसरे एक दलबदलू उगाच आव आणत आहेत. भाजपचे सरकार आले तेव्हा ते दोघेही राष्ट्रवादीत होते. त्यांचे लोकसभा निवडणुकीतही गोरेंच्या उमेदवाराला पाडायचे असे ठरले होते.

आणि आता हे जनतेसमोर भाजपाचा कळवळा दाखवत आहेत. ज्यांनी अधिकारी म्हणून नोकरी आणि पवारांची चाकरी करण्यात हयात घालवली. मात्र, मतदारसंघातील एकाही तरुणाला नोकरी लावली नाही असे आणखी एक महाभाग बारामतीकरांच्या नादाला लागून घर जाळून घ्यायची तयारी करत आहेत.

बायकोला झेडपी सदस्यपदी निवडून आणता येत नाही पण आमदारकीची स्वप्न पहाणाऱ्या एकाची विनाकारण लुडबुड सुरु आहे. जेव्हा सगळे विरोधक एक होतात तेव्हा राज्याचा कारभार व्यवस्थित सुरु आहे आणि राजाही योग्य मार्गावरुन चालला आहे, हे जनतेला चांगलेच समजते, असेही त्यांनी सांगितले.

अडविणाऱ्यांना सोडणार नाही…
लोकसभा निवडणुकीत मी मतदारसंघाच्या पाणी आणि औद्योगिकीकरणासाठी मोठी जोखीम पत्करली होती. त्या मिशनमध्ये यश मिळाले. अनेक कामेही मार्गी लागली. यापुढेही घेतलेल्या रिस्कमुळे जनतेच्या भल्याची अनेक कामे होणार आहेत. मतदारसंघात ज्यांचे ठरलयं ते जनतेच्या भल्यासाठी ठरले असते तर मीसुध्दा त्यांच्याबरोबर राहिलो असतो. मात्र, त्यांचा स्वार्थ धडधडीत दिसत आहे. मला अडविण्याचा आणि डिवचण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना सोडणार नाही, असा इशाराही गोरेंनी दिला.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×