चित्रपट – तारे-तारकांचे परदेशप्रेम

सोनम परब

अलीकडील काळात सुट्ट्यांमध्ये किंवा सुट्टीचे निमित्त साधून वीकेंडलाही पर्यटनाला जाण्याची टूम अगदी गावाखेड्यापर्यंत पोहोचली आहे. बॉलीवूडमधील कलाकार तर सुट्ट्यांमध्ये देशात राहातच नाहीत अशी स्थिती असते. बहुतांश तारे-तारका सुट्ट्यांच्या काळात परदेशातील थंड हवेच्या, शांत-सुंदर ठिकाणी जाऊन विसावा घेतात आणि रिफ्रेश होतात. गंमत म्हणजे ताऱ्यांची ही सवय लक्षात घेऊन काही हुशार निर्मात्यांनी याच काळात परदेशातच चित्रीकरण करण्याची शक्‍कल लढवण्यास सुरुवात केली आहे. असे केल्याने या कलाकारांच्या “डेटस्‌’चा प्रश्‍नच उरत नाही.

बॉलिवूडमधील जोड्यांचे विरंगुळ्यासाठी, विश्रांतीसाठी परदेशात जाणे तसे नवे नाही. सध्या चर्चा आहे ती रणवीर – दीपिका यांची. अलीकडेच विवाहबद्ध झालेली ही जोडी आपले काम संपवून लहानशी सुट्टी घालवण्यासाठी परदेशात जाणार आहेत. लग्नापूर्वीही दोघेही गुपचूप एकत्र सुट्टी घालवण्यासाठी परदेशात जात होतेच. दुसरीकडे सैफिना देखील लहानशा सुट्टीवर जाण्याचे मनसुबे रचत आहेत. चित्रपटांना टाटा केल्यानंतर शिल्पा कुंद्राची देखील हीच परिस्थिती आहे. तिचा नवरा व्यावसायिक असल्याने त्याच्याबरोबर ती फिरतच असते. लंडनहून नुकतीच परतलेली ही जोडी पुन्हा फ्रान्सला जाणार आहे. तिथे दोघेही आपल्या मुलाबरोबर सुट्ट्या घालवणार आहेत. अशाच काही चित्रपट तारे-तारकांच्या सुट्ट्यांच्या काळातील या मौजमजेचा आढावा घेऊया.

आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून अभिनेत्री कंगना रानौट आपल्या कुटुंबीयांबरोबर सुट्टी घालवण्यास उत्सुक आहे. नितांतसुंदर समुद्रकिनारा आणि तिथला हिरवागार निसर्ग हे तिचे आवडीचे ठिकाण आहेत. अर्थात तिला थंड हवेच्या ठिकाणी सुट्टी घालवायला आवडते. ती सांगते आपल्या देशातच अनेक थंड हवेची ठिकाणे आहेत ती मला आवडतात. पण तिथे किती वेळा जायचे? परदेशात गेले तर चाहत्यांच्या गराड्यातून थोडी सुटका मिळते. आपल्या सुट्ट्या आरामात घरच्या लोकांबरोबर शांतपणे घालवण्यास ती उत्सुक असते.

काही बड्या चित्रपट निर्मात्यांनी याबाबत हुशारी दाखवली आहे. त्यांना माहिती असते की नामांकित कलाकार सुट्टीच्या काळात परदेशभ्रमंतीला जातात. अशा वेळी हुशार चित्रपट निर्माते आपल्या चित्रपटाचे चित्रीकरणच एखाद्या परदेशातील प्रेक्षणीय स्थळी ठेवून चित्रपट कलावंताना खूष करण्याचा प्रयत्न करतात. अनीस बज्मी टी-सीरीजच्या “पागलपंती’ या चित्रपटाचे सर्व चित्रीकरण लंडनमध्येच पूर्ण करण्याच्या प्रयत्नात आहेत. चित्रपटात जॉन अब्राहम, अनिल, इलियाना डिक्रुझा, उर्वशी, अर्शद वारसी सारखे बडे कलाकार काम करताहेत. पण सर्वच निर्मात्यांना हे बजेट पेलवते असे नाही. त्यामुळे काही निर्माते देशातल्याच एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी चित्रीकरण ठेवण्यास पसंती देतात.

करण जोहरला परदेशातील थंड हवेच्या ठिकाणी चित्रीकरण करण्याचा शौक आहे. तो सांगतो, परदेशात चित्रीकरण करण्याचा एक महत्त्वाचा फायदा होतो तो म्हणजे सर्वच कलाकार एकाच ठिकाणी आमच्या ताब्यात राहतात. त्यामुळे चित्रपटाचे जास्तीत जास्त चित्रीकरण आम्ही करून घेतो. उन्हाळा येताच मी एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी चित्रपटांचे चित्रीकरण सुरू करण्याचा घाट घालतो. तिथे सुट्टी घालवता येते आणि कामही होता. ते कलाकार आसपासच असल्याने त्यांच्या तारखांचीही काही समस्या उद्‌भवत नाही. थोडक्‍यात, चित्रपटाच्या सर्व युनिटचे जणू फॅमिली गॅदरिंग असते.
बॉलीवूडचा बादशहा शाहरुख खानसाठी परदेशात जाणे-येणे काही नवी गोष्ट राहिली नाही. त्याच्या बहुतांश चित्रपटांचे चित्रीकरण परदेशात होते. याचा दुसरा फायदा म्हणजे सदर चित्रपटाची प्रसिद्धी देशाबरोबर परदेशातही केली जाते. काही महत्त्वाचे काम नसेल तर शाहरूख उन्हाळ्याच्या मोसमात लंडन किंवा अन्य देशातील थंड हवेच्या ठिकाणी जातो.

गेल्या काही दिवसांपासून हिंदी चित्रपटसृष्टीतील पिगी चॉप्स म्हणजेच प्रियांका चोप्रा सतत परदेशात राहते. लग्नानंतर अमेरिकाच तिचे दुसरे घर झाले आहे. कधी कधी तिचा नवरा निकबरोबर मांट्रियलमधील आपल्या आलिशान घरातही ती राहात असते. पाच वर्षांपूर्वी हा बंगला खूप मनापासून खरेदी केला होता. जूनच्या पहिल्या आठवड्यात सलमान खानचा “भारत’ चित्रपट प्रदर्शित झाला. त्याच्या प्रसिद्धीसाठी सलमानने युरोपात छोटी चक्‍कर मारली होती. यानिमित्ताने प्रसिद्धीही झाली आणि सुट्टीची मजादेखील घेता आली.

बी-टाऊनमधील कलाकारांचे लंडन हे सर्वांत आवडते शहर आहे. बहुतेक कलाकार लंडनमध्ये मौजमजा करून परत येतात. यंदाही उन्हाळ्याच्या दिवसात कलाकारांचा लंडनकडे जाण्याचा ओढा दिसून आला. शाहरूख खान, दीपिका, करण जोहर, कंगना, हृतिक रोशन हे निवांत वेळ असल्यास लंडनला चक्‍कर मारून येतात. पण यंदा हृतिक लंडनबरोबर फ्रान्समध्येही उन्हाळी सुट्ट्या घालवण्यास गेला होता. त्याच्या दोन्ही मुलांच्या शाऴेलाही सुट्टी होती. हृतिक सांगतो की मला फिरण्याची आवड पहिल्यापासूनच आहे. त्यामुळे उन्हाळ्यात मी कुठेच बाहेर फिरायला जाणार नाही हा विचारच करता येत नाही. यावेळी मुले युरोप व्यतिरिक्त दुसऱ्या ठिकाणीही फिरायला जाऊ इच्छित होते. त्यामुळे मुलांनीच बेत ठरवला.
कतरिना कैफ, एली अवराम, जॅकलीन फर्नांडिस या परदेशी अभिनेत्री चित्रीकरण नसेल तर उन्हाळ्यातील दहा-पंधरा दिवस आपल्या घरी जाणे पसंत करतात. स्वीडनची मॉडेल आणि अभिनेत्री एली अवराम सध्या स्वीडनसह युरोपातील काही देशांच्या सफरीवर जाण्याचे नियोजन करते आहे. कतरिना तर संधी मिळताच लंडनमध्ये आपल्या कुटुंबीयांकडे जाते.
त्यामुळे तिथे आलेल्या कलाकारांची भेट होते. जॅकलीनने आफ्रिकन देशांच्या सफरीबरोबर श्रीलंकेतही जाण्याचे ठरवले आहे. सनी लिओनी, नरगिस फाखरी, एमी जॅक्‍सन सारख्या परदेशी अभिनेत्री सुट्ट्यांच्या दिवसांत भारतात दिसत नाहीत. नरगिस काही दिवसांपूर्वी तिचा बॉयफ्रेंड उदय चोप्राबरोबर मुंबई एअरपोर्टवर दिसली होती. एली सांगते की, स्वीडनमध्ये मॉडेलिंगच्या काही असाईनमेंट आहेत. बिग बी अमिताभ मात्र देशातच फिरताहेत.

बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना मात्र चित्रीकरण नसताना परदेशात फिरण्याचा फारसा शौक नाही. त्याऐवजी आपल्या देशातील काही रम्य आणि निसर्गसंपन्न ठिकाणी फिरणे पसंत करतात. ते सांगतात, देशातील अनेक रम्य ठिकाणी मी फिरून आलो आहे. नैनितालमध्ये मी थोडे शिक्षणही घेतले आहे. याखेरीज सिमला, राणीखेत, श्रीनगर, जम्मू, दार्जिलिंग, उटी आदी सर्वच थंड हवेच्या ठिकाणी मी फिरलो आहे. पण आजही वेळ मिळाल्यावर यापैकी एखाद्या ठिकाणी वेळ घालवणे अधिक पसंत करतो. भूमी पेडणेकरला देश-परदेशातील सुंदर जागांचे फोटो जमवण्याचा नाद लहानपणापासूनच आहे. ती सांगते की, तेव्हा मला वाटायचे की प्रिय लोकांना बरोबर घेऊन या आकर्षक स्थळांना भेट द्यावी. आता मला ही संधी मिळते. त्यामुळे मी एखाद्या अशा जागी फिरायला जाण्याचे नियोजन करते. लहानपणी शक्‍य झाले नाही; पण आता मी या रमणीय स्थळांना भेटी देण्याची हौस भागवते.

Leave A Reply

Your email address will not be published.