चित्रपटगृहांच्या “फायर एनओसी’चे अधिकार महापालिकांनाच!

पिंपरी – राज्यभरातील चित्रपटगृहांना आग प्रतिबंधक आणि जीवसंरक्षण उपाययोजनांबाबत “ना हरकत प्रमाणपत्र’ घेण्याचे अधिकार महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालयाने स्वत:च कमी केले आहेत. त्याऐवजी स्वत:कडील अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थांना पुन्हा बहाल केले आहेत. अग्निशमन ना हरकत प्रमाणपत्र आता पूर्वीप्रमाणचे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अग्निशमन विभागाकडून मिळणार आहे.

महाराष्ट्र चित्रपटगृहे (विनियमन) नियम, 1966 मधील नियम 100 खाली चित्रपटगृह परवाना मंजुरीसाठी प्रस्ताव सक्षम अधिकाऱ्यांकडून सादर होत असतात. राज्यातील सर्व चित्रपटगृहांना स्थानिक पातळीवरील नगरपालिका, नगरपरिषद व महानगरपालिकांकडून “ना हरकत प्रमाणपत्र’ घेणे बंधनकारक आहे. मात्र, राज्य सरकारच्या अग्निशमन सेवा संचालनालयाच्या वतीने स्तानिक स्वराज्य संस्थांचे हे अधिकार काढून घेण्यात आले होते. त्याकरिता अग्निशमन सेवा संचालक प्र. सु. रहांगदळे यांनी 10 एप्रिल 2018 रोजी परिपत्रक काढून केलेला बदल सर्व महापालिका आयुक्‍तांना परिपत्रकाद्वारे कळविण्यात आला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्या दिवसापासून राज्यातील सर्व चित्रपटगृहांच्या फायर एनओसी अग्निशमन सेवा संचालनालयाकडून देण्यास सुरुवात करण्यात आली होती. मात्र, अचानकपणे या कार्यालयाने घुमजाव करत, आपल्या निर्णयात बदल केला आहे. 12 डिसेंबरला जारी केलेल्या परिपत्रकात हे अधिकार पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थांना बहाल करण्यात आले आहेत. यामध्ये चित्रपटगृहाचे बांधकाम सुरु करताना तात्पुरते आणि बांधकाम पूर्ण झाल्यानंतर अंतिम असे दोन्ही प्रकारचे ना हरकत प्रमाणपत्र घेण्याचे प्रस्ताव अग्निशमन सेवा संचालनालयाला न पाठविता स्थानिक स्वराज्य संस्थांना सादर करण्याचे नमूद केले आहे.

…तर “ते’ प्रस्ताव संचालनालयाकडे
राज्यातील सर्वच चित्रपटगृहांना “फायर एनओसी’ स्थानिक स्वराज्य संस्थांकडून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. तरी देखील राज्यातील अग्निशमन यंत्रणा अथवा सक्षम प्राधिकाऱ्याची नियुक्‍ती केलेली नसल्यास अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हद्दीतील चित्रपटगृहांचे “फायर एनओसी’चे प्रस्ताव अग्निशमन सेवा संचालनालयाकडे पाठविण्याचे या परिपत्रकात नमूद केले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत आठ ते दहा चित्रपटगृह आहेत. अग्निशमन सेवा संचालनालयाकडून दिलेल्या सूचनांनुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने “फायर एनओसी’बाबतची कार्यवाही करण्याचे काम सुरु करण्यात आली होती. आता पुन्हा या निर्णयात बदल करण्यात आला आहे. त्याची कार्यवाही देखील सुरु करण्यात आली आहे.
– किरण गावडे, अग्निशमन अधिकारी, पिंपरी-चिंचवड महापालिका.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)