चिखलीतील घरकुलच्या कामाला “ब्रेक’

80 लाखांची बीले रखडली : ठेकेदारांची ठेकेदारांविरोधात पोलिसांत तक्रार

पिंपरी – इमारतीचे काम केलेल्या छोट्या ठेकेदारांचे बील मुख्य ठेकेदार आणि सब ठेकेदारांपैकी नेमके कोणी द्यायचे यावरून वाद निर्माण झाल्याने महापालिकेच्या चिखलीतील घरकुल गृहप्रकल्पाचे बांधकाम एका आठडाभरापासून ठप्प झाले आहे. त्यामुळे या छोट्या ठेकेदारांनी या दोन्ही ठेकेदारांविरोधात पोलीस तक्रार करूनही याबाबत कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे हे व्यवसायिक हवालदिल झाले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने चिखली येथे गृहप्रकल्पाचे काम सुरू आहे. या प्रकल्पात एकूण 162 इमारती बांधल्या जाणार आहेत. त्यापैकी दहा इमारतींचे काम सुरू आहे. या कामाचा ठेका पवार पाटकर ऍण्ड डी. एस. कॉन्ट्रॅक्‍टर यांना देण्यात आला आहे. या ठेकेदाराच्या वतीने सिल्व्हर ओक कमर्शिअल प्रा. लि. या सब ठेकेदाराला हे काम देण्यात आले आहे. या सर्व इमारतींचे काम पूर्ण करण्यासाठी या ठेकेदाराने सुमारे 25 छोट्या ठेकेदारांना हे काम विभागून दिले होते. यामध्ये बांधकाम, लेबर सप्लाय, पेंटींग, इलेक्‍ट्रिक वर्क, प्लास्टर, कोअर कटिंग, टाईल वर्क्‍स, सेंट्रींग, डोअर फिटींग, लिफ्ट मशिन ड्रेनेज व चेंबर अशा विविध कामांचा समावेश आहे.

दरम्यान, मुख्य ठेकेदाराने सब ठेकेदाराला कामाची रक्कम न दिल्याने, या ठेकेदारांना अनेक दिवसांपासून पूर्ण केलेल्या कामाचे पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे त्यापैकी सहा इमारतींचे काम गेली सहा महिन्यांपासून अंशत: बंद ठेवण्यात आले होते. मात्र, बीले रखडल्याने या छोट्या ठेकेदारांनी देखील गेली आठवडाभरापासून हे काम बंद ठेवले आहे. मात्र, केलेल्या कामाची बील न मिळाल्याने त्यांनी मुख्य ठेकेदार व सब ठेकेदाराशी संपर्क साधला असता, काही तरी करुन तुमचे पैसे देऊ, काही दिवस थांबा, अशी आशवासने मिळत आहेत. मात्र, ज्या मजुरांकडून ही कामे करु घेतली आहेत, त्यांनी या छोट्या ठेकेदारांकडे तगादा लावल्याने, या व्यवसायिकांना घराबाहेरदेखील पडणे मुश्‍किल झाले आहे. मुख्य ठेकेदार व सबठेकेदाराने या प्रकल्पाजवळील कार्यालयांना टाळे ठोकले आहे. त्यामुळे त्यांच्याशी प्रत्यक्ष भेट होऊ शकत नाही. केवळ मोबईलवर संपर्क ठेवत, अनेक दिवसांपासून पोकळ आश्‍वासनांवर या ठेकेदारांची बोळवण केली जात आहे.

या गृहप्रकल्पात एकूण 24 लहान-मोठ्या व्यवसायिकांनी विविध प्रकारची कामे केली आहेत. त्यापोटी सर्व छोट्या ठेकेदारांना मिळून एकूण 80 लाख रुपये देणे बाकी आहे. मात्र, ठेकेदार व सब ठेकेदाराने याठिकाणचे कार्यालय बंद केले असून, केवळ मोबाईलवर ही बीले देण्याचे आश्‍वासन दिले जात आहे. महापालिका आयुक्त व चिखली पोलिसांत लेखी तक्रार करूनही याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही.
अजीज शेख, ठेकेदार, चिखली गृहप्रकल्प.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)