चिंता नसावी, युती होणारच …!

रिडलोसप्रमाणे रासप-रिपाइंची युती नक्की ः भाजपच्या खेळीने नेत्यांची मतीगुंग
सम्राट गायकवाड
सातारा, दि.26- निवडणुका जसजशा जवळ येवू लागल्यात तसं तसे राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष व सातारा जिल्ह्याचे सुपुत्र ना.महादेव जानकर जमिनीवर येतायत. भाजपकडून विधानपरिषदेची आमदारकी दुसऱ्यांदा स्वीकारताना त्यांना त्यांनीच स्थापन केलेल्या पक्षाची आठवण आली . सध्या पदाधिकाऱ्यांकडून आढावा घेताना त्यांना मिळत असलेल्या”फीडबॅक’ वरून ते कमालीच्या चिंतेत आहेत. पक्षाची अवस्था अशीच राहिली तर आगामी निवडणुकीत रिपाइं तरी आपल्याशी युती करेल का, अशी शंका वजा खंत नुकतीच कोल्हापूर येथे व्यक्त केली.
खरे तर जानकर यांनी जी चिंता,शंका अथवा खंत म्हणा जी काही व्यक्त केली आहे तशीच अवस्था रिपाइंची देखील झालेली आहे. ज्या मुद्यांवर कालपर्यंत दोन्ही पक्षांची व पक्षाध्यक्षांची वाटचाल सुरू होती त्याच मुद्यांवर आता विरोधक व स्वकीयांनी त्यांना घेरले आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या पुढाकाराने रासप, रिपाइं, स्वाभिमानी शेतकरी संघटना व शिवसंग्राम हे पक्ष भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सहभागी झाले. तत्पूर्वी रासप अन रिपाइं हे पक्ष जवळपास अडगळीतच होते. मुंडेंनी या नेत्यांचे “मूल्य’ ओळखून आघाडीत घेतले. सुरुवातीला आठवलेंना भाजपच्या कोट्यातून राज्यसभेची खासदारकी बहाल केली. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला एकहाती तर राज्यात काठावर सत्ता मिळाली. साहजिकच निवडणुकीनंतर यशातील वाटा मिळावा यासाठी प्रयत्न, विनवण्या, इशारे देणे सुरू झाले होते. मात्र, ऐकायला गोपीनाथ मुंडे नव्हते. त्यामुळे सुरुवातीच्या कालावधीत घटक पक्षांना कोणीही जुमानायला तयार नव्हते. अखेर टप्प्या टप्प्याने सुरुवातीला महादेव जानकर व सदाभाऊ खोत यांना विधानपरिषद देवून गप्प बसविण्याचा प्रयत्न झाला. प्रयत्न करताना मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेत दुही निर्माण करण्याच्या हेतूने रविकांत तुपकर यांना वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्षपद देण्यात आले. या प्रकारात कदाचित सदाभाऊंचा इगो हर्ट झाला असणार.
या नंतर महादेव जानकर व सदाभाऊ खोत यांची मंत्रिपदी वर्णी लागली. जानकर पक्षाध्यक्ष म्हणून त्यांना कॅबिनेट तर सदाभाऊ संघटनेत दुसऱ्या क्रमांकावर असल्याने त्यांना राज्यमंत्रीपद देण्यात आले. साहजिकच दुसऱ्या बाजूला आठवले अन मेटे यांच्या ढुश्‍या देणं सुरूच होते. अखेर मेटे यांना छ. शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्षपद देण्यात आले तर आठवलेंना केंद्रात सामाजिक न्याय राज्यमंत्रिपद क्रमांक दोन चे देण्यात आले. पदाचा कार्यभार घेतल्या नंतर व मंत्रीपदाच्या माध्यमातून चारही घटक पक्षांच्या अजेंड्या वरील प्रश्न सुटतील अशी अपेक्षा कार्यकर्ते व्यक्त करू लागले. धनगर समाजाला वाटले जानकर साहेब मंत्री झालेत आता लवकरच आपल्या “एसटी’ आरक्षणाची मागणी पूर्ण होईल. तर शेतकऱ्यांना ही वाटले सदाभाऊ आता मंत्री झालाय.आता शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी होतील, शेती मालाला हमी भाव मिळेल. मेटेंना स्मारक समिती घेतले आहे तेव्हा लवकरात लवकर छ. शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या कामाला गती मिळेल असे मराठा समाजाला वाटले. आठवले थेट केंद्रात मंत्री झाल्यामुळे मागासवर्गीय समाजाला वाटले आता अन्याय, अत्याचार कमी होतील या आशा अपेक्षा सुरुवातीच्या काळात समाजाला चारही नेत्यांकडून होत्या. मात्र, सरकारकडूनच प्रामाणिक प्रतिसाद मिळत नसल्याने चार ही नेते वैचारिक हतबल झाल्याचे दिसते. जानकर यांनी खा. राजु शेट्टी यांचा कथित स्वाभिमानाचा कित्ता गिरवत भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे पाय धरुन (बांधून) का होईना विधान परिषदेला दुसऱ्यांदा फॉर्म हा त्यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने भरला. खरे तर त्यामागे भविष्यातील अनेक कायदेशीर बाबी मागे लागू नये हे कारण सांगितले जात असले तरी त्यामागे राजकारण आहे.
सरकार येताच एका आठवड्यात धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन सरकारला पाळता आले नाही.त्यामूळे जानकर यांच्यावर धनगर समाजाचा दबाव दिवसेंदिवस वाढत आहे. भीमा-कोरेगाव घटनेनंतर आठवले यांनी ठोस भूमिका घेतली नाही. परिणामी आठवलेंना अनेक ठिकाणी रोष सहन करावा लागला आहे . तिसऱ्या बाजूला शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या, कर्जमाफीबाबत सरकारची भूमिका, शेतीमालाला अद्याप हमीभाव मिळत नाही या कारणांनी शेतकऱ्यांचा ना. खोत यांच्यावर रोष वाढत आहे. या सर्व मुद्‌द्‌यांची जबाबदारी सरकार व परिणामी भाजपने ह्या नेत्यांवर दिली आहे. त्यामुळे आता धनगर आरक्षणासाठी जानकर, शेतकऱ्यांची आत्महत्येस सदाभाऊ, मागासवर्गीय अत्याचार घटनेत खा.आठवले अन स्मारक आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा समोर आला की मेटे. अशी चार नेत्यांची अवस्था सध्या झाली आहे. सदाभाऊंचा विषय स्वतंत्र आहे . मात्र रिपाइं, रासप व शिवसंग्राम पक्षांचे अध्यक्ष हे स्वायत्त आहेत आणि नसले तरी जनतेचा दबाव त्यांना स्वायत्त होण्यास भाग पाडतील. मात्र, तेव्हा वेळ निघून गेलेली असेल मात्र 2009 प्रमाणे रिडलोस प्रमाणे रासप आणि रिपाइंची युती नक्की होईल. तोपर्यंत चिंता नसावी.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)