#चिंतन: शब्दसाधना   

डॉ. दिलीप गरूड 
काही दिवसांपूर्वी एका मित्राच्या छापखान्यावर गेलो होतो. छापखान्याचे नाव होते “सुरभी प्रिंटिंग प्रेस’. मराठी आणि इंग्रजी शब्दांचे संमिश्र असे हे नाव होते. माझ्या या मित्राला एकुलती एक मुलगी आहे. ती दहावीत शिकते. मला वाटले माझ्या या मित्राने त्याच्या मुलीचे नाव छापखान्याला दिले असावे. म्हणून मी म्हटले-“” सुरभी हे नाव छापखान्याला का दिले आहे? सुरभी हे तुझ्या मुलीचे नाव आहे का?” “”नाही. हे नाव मे सहजच दिले आहे. त्याचा अर्थही मला माहीत नाही.” तो म्हणाला.
या सुरभी शब्दाचा अर्थ काय असावा असा मी विचार करू लागलो. घरी आल्यावर मराठी शब्दकोशात सुरभी शब्दाचा अर्थ पाहिला. शब्दकोशात सुरभी शब्दाचा अर्थ दिला आहे सुगंधी किंवा सुवासिक आणि भ ला दीर्घ वेलांटी दिल्यावर सुरभीचा अर्थ होतो कामधेनू. म्हणजे मनातील इच्छा पूर्ण करणारी गाय. म्हणजे भ ची वेलांटी बदलली की अर्थ बदलतोय हे माझ्या लक्षात आले.
बऱ्याचवेळा आपण वस्तूंना, मुलांना, रस्त्यांना, चौकांना नावे देतो. पण त्या शब्दांचे अर्थ आपणाला माहीत असतातच असे नाही. माझ्या पुतण्याने त्याच्या मुलाचे नाव ठेवले आहे “अर्णव’. मी त्याला विचारले,””अर्णव शब्दाचा अर्थ काय?” तो म्हणाला, “”सागर किंवा समुद्र.”
मी मराठी शब्दकोश उघडून त्यात अर्णव शब्द शोधू लागलो, तर त्यात अर्णव शब्दच नव्हता. मग संस्कृत शब्दकोश उघडून पाहिला, तर त्यात अर्णव शब्दाचा अर्थ दिला आहे- प्रवाह (लाट), समुद्र, अंतरिक्ष, इंद्र, सूर्य. तेव्हा माझ्या लक्षात आले की एखाद्या शब्दाला अनेक पर्यायी शब्द असू शकतात किंवा एखाद्या शब्दाचे अनेक अर्थ असू शकतात. त्यासाठी साधना करावी लागते. त्याला शब्दसाधना म्हणता येईल. ज्याप्रमाणे भीमसेन जोशी यांनी हयातभर स्वरसाधना केली म्हणून आपण त्यांना स्वरभास्कर म्हणतो. लता मंगेशकरांनी विविध भाषेतील, विविध रागांतील गाणी गायिली म्हणून आपण त्यांना स्वरसम्राज्ञी म्हणतो.
प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी हयातभर विविध विषयांवर अभ्यासपूर्ण व्याख्याने देऊन समाजप्रबोधन केले म्हणून आपण त्यांना महाराष्ट्राचे चालतेबोलते विद्यापीठ म्हणत होतो, तर सचिन तेंडुलकरची क्रिकेटमधील साधना पाहून आपण त्यांना क्रिकेटवीर म्हणतो. त्या त्या क्षेत्रातल्या या साधना म्हणजेच तपश्‍चर्या आहेत. आणि प्रदीर्घ तपश्‍चर्येशिवाय जीवनात यश मिळत नाही. प्रत्येकजण आपापल्या निवडलेल्या क्षेत्रांत कमी जास्त प्रमाणात तपश्‍चर्या करत असतो. पण जो नेटान, सातत्याने, अविश्रांतपणे साधना करतो त्यालाच शेवटी यश मिळते. त्याचप्रमाणे जो शब्दांशी खेळतो, शब्दांची उत्पत्ती शोधतो, शब्दांचे अर्थ आणि उपयोजन जाणतो तो शब्दसाधक होय. आणि त्याच्या हातून होणारी साधना ही शब्दसाधना होय.
आचार्य विनोबा बावे यांना शब्दांशी खेळण्याची हौस होती. त्यांना बावीस भाषा येत होत्या. जशा भारतीय भाषा येत होत्या, तशा परदेशी भाषाही ते शिकले होते. ते खऱ्या अर्थाने शब्दप्रभू आणि भाषाप्रभू होते. ते शब्दकोश वाचत असत. म्हणजे आपण जशा कथा-कादंबऱ्या वाचतो, तसा ते शब्दकोश वाचत. आपण शब्दकोश वाचत नाही तर फक्त शब्दाचा अर्थ शोधण्यापुरता तो चाळतो किंवा वापरतो. विनोबांनी खऱ्या अर्थाने भाषेची सेवा केली. ज्या कोणा भाषा शिक्षकाला, आपल्या भाषा विषयात तज्ज्ञ व्हायचे असेल, त्याला शब्दांशी खेळता आले पाहिजे. त्याला शब्दांचा लळा लागला पाहिजे. विविध भाषांचे शब्दकोश त्याच्याकडे असले पाहिजेत. त्याचप्रमाणे व्युत्पत्तीकोश, संस्कृतीकोश, ज्ञानकोश, विश्‍वकोशही असले पाहिजेत. ज्याला शब्दसाधना करायची आहे, त्याच्या व्यक्तिगत ग्रंथसंग्रहात वरील ग्रंथ असले पाहिजेत. मुळातून अभ्यास करणाऱ्या अभ्यासकाची ती गरज आहे. त्यातून अभ्यासकाची ज्ञानतृष्णा तर भागेलच, पण विद्यार्थ्यांनाही अध्ययन तृप्तीचा आनंद मिळेल. ज्ञानेश्‍वरांच्या भाषेत सांगायचे तर “या हृदयीचे त्या हृदयी’ पोहोचवणे सुलभ होईल.
तुकाराम महाराज हे जसे कवी होते तसे ते संतही होते. त्यांना शब्दांची फार जाण होती. ते त्यांच्या अभंगात शब्द तोलून मापून वापरतात. खरं म्हणजे ते शब्दसाधकही होते, म्हणूनच शब्दांचं माहात्म्य सांगताना ते म्हणतात-
आम्हां घरी धन, शब्दांचीच रत्ने।
शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू।।
शब्दची आमुच्या जीविचे जीवन।
शब्द वाटू धन जनलोका।।
तुका म्हणे पहा शब्दची हा देव।
शब्दची गौरव पूजा करू।।
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)