#चिंतन: मित्रा, तू सुद्धा?

डॉ. दिलीप गरूड 
शेक्‍सपियर या महान नाटककाराने “ज्युलियस सीझर’ नावाचे नाटक लिहिले आहे. हे रंगभूमीवर अनेक वर्षे गाजत आहे. याचे कारण त्या नाटकाचा विषय. या नाटकात ज्युलियस सीझर हा सत्तापदावर विराजमान झालेला असतो. मात्र, त्याच्या विरोधकांना ते सहन होत नाही. ते सीझरविरोधात कट रचतात. या कटात सीझरचा विश्‍वासू मित्र ब्रूट्‌स याला सामील करून घेतात. सुरुवातीला ब्रूट्‌स कटात सामील व्हायला नकार देतो. पण सीझरमुळे लोकशाहीला कसा धोका आहे. माणसांना कसा त्रास होणार आहे, हे त्याला पुन्हा पुन्हा पटवून दिले जाते. शेवटी ब्रूट्‌स या कटात सामील होतो.
हे सर्व विरोधक सीझरला मारण्यासाठी जातात. या सर्व हल्लेखोरांमध्ये आपला विश्‍वासू मित्र-साथीदार ब्रूट्‌स आहे पाहून त्याला धक्का बसतो. ज्याला मित्र मानलं, ज्याच्यावर विश्‍वास ठेवला, ज्याला अंतःकरणातल्या गोष्टी सांगितल्या तो सहकारीही या कटात सामील आहे, हे पाहून सीझरचा माणसाच्या जातीवरचा, मित्रत्वावरचा विश्‍वास उडून जातो. कुणावर विश्‍वास ठेवावा आणि कुणाला मित्र म्हणावे हे कळेनासे होते. तेव्हा त्याच्या मुखातून शब्द बाहेर पडतात,
“”ब्रूट्‌स, तू सुद्धा? मग आता सीझरला मेलंच पाहिजे.”
सीझरला म्हणायचंय, की जेव्हा माणुसकीवर हल्ला होतो, विश्‍वासाला तडा जातो, मित्र जेव्हा शत्रू होतात आणि शत्रूंच्या कळपात सामील होतात, तेव्हा जगण्यासारखं काही उरलेलंच नसतं.
शेक्‍सपियरचं हे नाटक एक सुंदर कलाकृती आहे. या नाटकातील सीझरच्या मुखातील वाक्‍य. “”ब्रुट्‌स यू टू? देन डाय सीझर” हे अजरामर झाले आहे. त्याला सुभाषिताचा दर्जा प्राप्त झाला आहे. ज्युलियस सीझर हे केवळ एक नाटक नाही, ती केवळ एक सुंदर साहित्यकृती नाही; तर ती मानवी जीवनावर भाष्य करणारी अक्षर वाङ्‌मयीन कलाकृती आहे. मनुष्य साठ-सत्तर वर्षांचं आयुष्य जगतो. त्यात येताना काय बरोबर घेऊन येतो आणि जाताना काय बरोबर घेऊन जातो? सारे इथेच ठेवून जातो. हे सर्व माहीत असतानाही या छोट्याशा आयुष्यात माणसे एकमेकांना किती फसवतात? किती विश्‍वासघात करतात?
फसवणूक करणे, लबाडी करणे, स्वार्थासाठी शब्द बदलणे, दिलेला शब्द न पाळणे, या बोटावरची थुंकी त्या बोटावर करणे, दुसऱ्याचा द्वेष करणे, त्याचा मत्सर करणे हे सारे सारे तो करत असतो आणि हे सर्व कशासाठी? तर कुणाचे तरी पद आपल्या डोळ्यात खुपत असते. कुणाचेतरी धन, सुख, मान, प्रतिष्ठा, कीर्ती आपणाला पाहवत नसते. त्यासाठी आपण आपली सारी शक्ती, बुद्धी पणाला लावत असतो. त्याचे पद काढून घेतले की आपल्याला परमसुख मिळणार असते म्हणून. अशी ही मानवी प्रवृत्ती. म्हणूनच बहिणाबाई चौधरींनी आपल्या काव्यात म्हणून ठेवलंय.
“”अरे, मानसा मानसा, कधी व्हशील मानूस?”
म्हणूनच म्हणतात की माणसाला एकतरी विश्‍वासू मित्र असावा. ज्याच्या खांद्यावर विश्‍वासाने मान टाकून, जीवनातली सुखदुःख सांगता यावीत. गळा कापणारे अनेक असतात; पण प्रेमाने गळ्यात गळा घालणारा एकतरी असावा. विश्‍वास हे एक महान जीवनमूल्य आहे. तेच जर संपले तर जगायचे कशासाठी हा प्रश्‍न पडतो. सीझरने समोरच्या हल्लेखोरांत जेव्हा ब्रुट्‌सला पाहिले, तेव्हा तो हेच म्हणाला. आता जगायचं तरी कशाला? आता सीझरला मेलंच पाहिजे. ही फक्त सीझरची एकट्याची शोकांतिका नाही. ही माणसांची शोकांतिका आहे. जीवन जगत असताना, आपल्या आजूबाजूला असे अनेक ब्रुट्‌स दबा धरून बसलेले असतात. त्यांच्यावर आपली नजर पाहिजे. त्यांना वेळीच ओळखता आलं पाहिजे. यांची कटकारस्थानं वेळीच हाणून पाडता आली पाहिजेत. नाही तर आपलीही तीच अवस्था होईल आणि म्हणावं लागेल, “”ब्रुट्‌स यू टू?” – “”मित्रा, तू सुद्धा?”
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)