चिंतन: न्यायव्यवस्थेची चपराक

डॉ. दिलीप गरूड

असंच एक खेडेगाव होतं. दोन अडीच हजार लोकवस्तीचं. या गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय होता शेती. त्याकाळी पाऊसकळा भरपूर असे. नद्या खळखळ वाहत असत. ओढे झुळझूळ करीत वाहत. सारा शिवार हिरवागार असे. गोठ्यात खिल्लारी बैल असत. गाई-म्हशीही असत. घरात दुधदुभतं भरपूर असे. गाव खाऊनपिऊन सुखी होते. थोड्याशा कुरबुरी सोडल्या, तर सर्वजण आनंदात जगत होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गावात सर्व सणवार साजरे केले जात. गावच्या भैरोबाची मोठी यात्रा भरे. तमाशाचा फड येत असे. जंगी कुस्त्याही होत असत. दिवाळी, दसरा, रामजन्म, कृष्णाष्टमी, हनुमान जयंती, बैलपोळा हे सर्व सण धुमधडाक्‍यात पार पडत असत.
बैलपोळ्याला गावच्या पाटलांचा आणि मुकादमाचा मानाचा बैल पुढे असे. गावच्या वेशीतल्या मारुती मंदिरापासून बैलांची मिरवणूक निघे. पुढे वाजंत्री वाद्ये वाजवीत. पाटील त्याच्या सजवलेल्या बैलाच्या अंगावरून नोट ओवाळून वाजंत्र्यांना देत असे. बैलांच्या अंगावर झुली असत. शिंगात शेंब्या असत. शिंगांना हिंगूळ लावून त्यावर बेगड लावत असत. गळ्यात झेंडूच्या फुलांची माळ असे. सकाळी बैल नदीवर नेऊन त्यांना साग्रसंगीत आंघोळ घातली जात असे. स्वच्छ धुतलेल्या त्यांच्या अंगावर मग रंगाचे छाप उठवत. सायंकाळी मारुती मंदिरापासून ते भैरोबाच्या देवळापर्यंत मिरवणूक निघे. भैरोबाच्या देवळापुढे गुरव बैलांच्या कपाळाला देवाचा अंगारा लावत असे. मग तेथून बैल माघारी फिरत. असे मोठे रमणीय दृश्‍य असे.

एके वर्षी गावच्या एका धनदांडग्या माणसाने, गावाला न जुमानता, गावाच्या अगोदर स्वतःच्या बैलांची स्वतंत्र मिरवणूक काढली. त्याचे स्वतःचे चार बैल व त्याच्या वस्तीवरच्या इतर लोकांचे सहा बैल अशी दहा बैलांची मिरवणूक काढली. त्या मिरवणुकीपुढे त्याने बॅंड लावला होता. त्या धनदांडग्याचे नाव तुकाराम निगडे. तो पुण्याला राहात होता. त्याचा तेथे बेकायदेशीर व्यवसाय होता. त्यातून त्याला भरपूर अर्थप्राप्ती होत होती. गावात त्याचे घर होते. शेतीवाडी होती. पैशाच्या जोरावर त्याने हा उद्धटपणा केला होता. गावाला वेठीला धरले होते.

तुकारामच्या बैलांची मिरवणूक चावडीपुढे आली. पण गावच्या सरपंचांनी व तरुण पोरांनी ती अडवली. सरपंच म्हणाले, “”तुकाराम, गावाला डावलून तू गावाच्या अगोदर बैलपोळा का काढलास? गावची रीत, परंपरा का मोडली? तुला गावाबरोबर मिरवणुकीत भाग घ्यायचा नसेल तर घेऊ नको. तुझी वेगळी मिरवणूक तू काढू शकतोस. पण गावच्या बैलांची मिरवणूक पार पडल्यावर.” तेव्हा तरणाबांड तुकाराम उद्दामपणे म्हणाला, “”मी गावाला ओळखत नाही. मला गावाची गरज नाही. माझ्या मनगटात धमक आहे. कोण माझी बैलं अडवतो तेच बघतो.” तुकारामाच्या या उर्मट बोलण्यावर गावची पोरं चिडली. ती बैलांच्या मिरवणुकीला आडवी गेली. मात्र तुकारामाने बैलांच्या शेपटीला हात लावून ते उधळवले. पोरांना आडवं करून बैल पुढं निघून गेले. गावाने त्याच्या परीने त्यांचा निषेध नोंदवला. साऱ्या गावभर तुकारामाच्या या वागण्याची चर्चा झाली.

पण तुकाराम कुणाला बधला नाही. त्याने हार मानली नाही. मात्र, गावच्या तरुण पोरांच्या मनात हा सल खदखदत राहिला. पुढे काही महिन्यांनी तुकारामाला अटक झाली. ती बातमी वृत्तपत्रात छापून आली. गाडी चालवताना त्याने सरकारी पोलीस कर्मचाऱ्याला उडवले. आणि जागेवर न थांबता तो निघून गेला. पुण्यात ही घटना घडली. पुढे त्याला पकडला. त्याच्यावर केस दाखल झाली. वेगवेगळी कलमे त्याच्यावर लावली. पुढे पुण्याच्या कोर्टात केस उभी राहिली. दोन वर्षे खटला चालला होता. हाफ मर्डरची केस लावल्यामुळे त्याला बारा वर्षांची शिक्षा झाली. तो येरवड्याच्या तुरुंगात खडी फोडायला गेला. ही बातमी वृत्तपत्रात झळकली. गावभर पसरली. गावची तरुण पोरे सुखावली. न्याय मिळाल्याची भावना त्यांच्यात पसरली. तेव्हा एकमेकांशी गप्पा मारताना मारुतीनाना म्हणाले, “”आरं, या पांढरीत लय ऊत-मात चालत नाही. भैरुबा त्याला बरुबर जाग्यावं बसवतो.” त्यावर हरितात्या म्हणाला, “”आसं मी मी म्हणणारं लय आलं आणि गेलं. पर भैरूबापुढं कुणाचं काय चालत नाही.”

गावच्या लोकांची भैरोबावर अपार श्रद्धा आहे. इथली रीत, परंपरा कोणी मोडली तर भैरोबा त्याला शिक्षा करतो, अशी लोकांची भावना आहे. मात्र, लोकशाही व्यवस्थेतील नियम जो झुगारतो, मन मानेल तसं वागून दंडेली करतो, त्याला न्यायव्यवस्था चपराक देते हेही खरं आहे. गावच्या लोकांना वाटते भैरोबाने तुकारामाला अद्दल घडवली. नागर लोकांना वाटते न्यायव्यवस्थेने त्याला धडा शिकवला. मात्र तुकारामाला जन्माचा धडा मिळाला ही गोष्ट खरी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)