चिंतन: देवाघरचा संकेत

डॉ. दिलीप गरूड

पुण्यात “दिशा परिवार’ नावाची संस्था आहे. ही संस्था गरीब पण होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करते. महाविद्यालयीन शिक्षण घेऊ इच्छिणारे परंतु आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणात व्यत्यय येणारे विद्यार्थी दिशा परिवाराशी संपर्क साधतात. महाराष्ट्रातील जवळपास 30 जिल्ह्यांतील तरुण संस्थेकडून अर्थसहाय्य मिळवितात. यात कुणाला महाविद्यालयाची प्रवेश फी, कुणाला वसतिगृहाची फी, कुणाला खाणावळीचे पैसे, तर कुणाला रहायच्या जागेचे भाडे द्यायचे असते. ज्याची त्याची गरज पाहून, खातरजमा करून संस्था मदत करते. त्यासाठी मुलांची माहिती मागविली जाते. गरजू मुलांशी संपर्क साधला जातो. फोनवरून चर्चा केली जाते. नंतर प्रत्यक्ष मुलाखत घेतली जाते. वेळप्रसंगी कॉलेजशीही संपर्क केला जातो.

2007 साली दिशा परिवाराची स्थापना झाली. आजपर्यंत संस्थेने सुमारे 3500 विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य केले आहे. यात मुलांबरोबर मुलीही मोठ्या प्रमाणात आहेत. तसेच हे विद्यार्थी विविध ज्ञानशाखांमध्ये शिकणारे आहेत. मदत स्वीकारणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आईवडील नसणाऱ्यांना प्रथम प्राधान्य दिले जाते. त्यानंतर अल्पभूधारक, शेतकरी-शेतमजूर, रिक्षाचालक, छोटे व्यावसायिक यांच्या पाल्यांचा विचार केला जातो.

2010 सालापासून संस्थेन एक नवीन उपक्रम सुरू केला आहे. तो उपक्रम म्हणजे स्पर्धा परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका सुरू केली आहे. पुण्याच्या कुमठेकर रोडवरील अण्णा भाऊ साठे विद्यालयात ही अभ्यासिका सुरू करण्यात आली आहे. ज्यांना घरात अभ्यासासाठी जागा नाही असे विद्यार्थी या अभ्यासिकेचा लाभ घेतात. दिशा परिवार या संस्थेने अजून एक पाऊल पुढे टाकले आहे. पुण्याजवळील वाघोली येथे एक वसतिगृह बांधले आहे. यात 100 विद्यार्थिनींची राहण्याची सोय होणार आहे. जून 2019 पासून ते प्रत्यक्ष सुरू होईल. त्यासाठी अनेक देणगीदारांकडून देणगी मिळविली आहे. दानशूर दाते शोधून, गरजू मुलांपर्यंत मदत पोहोचवणे हे संस्थेचे उद्दिष्ट आहे. संस्था फक्त दोन हातांमधील अंतर कमी करण्याचे काम करते. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे अडलेले शिक्षण सुरळीत सुरू झाले आहे. संस्था दरवर्षी मोठा समारंभ आयोजित करून शिष्यवृत्ती प्रदान कार्यक्रम घडवून आणते. या कार्यक्रमाला दानशूर दाते हजर असतात. आणि प्रमुख पाहुण्याच्या उपस्थितीत दात्यांच्याच हस्ते विद्यार्थ्यांना मदतीचे धनादेश दिले जातात. तसेच पुण्यात राहणाऱ्या आणि संस्थेमार्फत मदत स्वीकारणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्त्व विकास शिबिरही आयोजित केले जाते.

ऑक्‍टोबर 2018 मध्ये कार्याध्यक्ष राजाभाऊ चव्हाण यांना एक फोन आला. ती व्यक्ती फोनवर म्हणाली,
“”नमस्कार! मी कैलास हुंबाडे बोलतोय. आपण राजाभाऊ चव्हाण बोलताय ना?”
“”बोलतोय. बोला.”
“”आपल्या दिशा परिवार संस्थेची माहिती मला मिळाली. मी उमरखेडला राहतो. माझा मुलगा वैभव यवतमाळला इंजिनिअरिंगचा कोर्स करतोय. मी साधा कार ड्रायव्हर आहे. मला आठ हजार रुपये पगार मिळतो. तीनही मुले सध्या शिकत आहेत. म्हणून वैभवच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत हवी.”
“”हे बघा, तुम्ही संस्थेच्या पत्त्यावर मुलाची माहिती पाठवा. त्याला कशासाठी मदत हवी आणि किती मदत हवी ते लिहा. मग अर्जाचा विचार करू.”
“”धन्यवाद सर.” फोनवरचे बोलणे संपले. नंतर संस्थेच्या पत्त्यावर वैभव हुंबाडेची माहिती पोस्टाने आली. त्या माहितीची शहानिशा राजाभाऊ चव्हाणांनी केली. नंतर फोनवरून वैभवशी संपर्क साधून त्याच्या अडचणी जाणून घेतल्या. मग राजाभाऊ वैभवला म्हणाले,
“”डिसेंबरमध्ये व्यक्तिमत्त्व विकास कार्यक्रम पुण्यात आहे. तेव्हा तू वडिलांबरोबर ये. म्हणजे आपल्याला समक्ष भेटता येईल, बोलता येईल.”

त्यावर वैभव म्हणाला, “”सर, पुण्यापर्यंत यायला आमच्याकडे भाडेखर्च नाही.” मग राजाभाऊ म्हणाले, “”आता कुठूनतरी पैसे घेऊन या. इथे आल्यावर मी प्रवासखर्च देईन. जेवणाची सोय करीन.” ठरल्याप्रमाणे 23 डिसेंबर 2018 च्या कार्यक्रमास वैभव वडिलांबरोबर आला. मराठवाडा मित्र मंडळाच्या सभागृहातील कार्यक्रमास हजर राहिला. प्रत्यक्ष भेटीत राजाभाऊंनी त्याची गरज जाणून खात्यावर मदत पाठविण्याचा शब्द दिला. कार्यक्रम संपल्यावर जेवण करून, भाडेखर्च घेऊन वैभव वडिलांबरोबर उमरखेडला माघारी गेला. जाताना त्याचे वडील राजाभाऊंचे पुन्हा पुन्हा आभार मानत होते. त्यांचे हात हातात घेऊन आपल्या कपाळी लावत होते.

एका मुलाचा शिक्षणाचा खर्च मार्गी लागला म्हणून समाधान व्यक्त करीत होते. दिशा परिवार संस्था त्यांना देवदूतासारखी वाटत होती. जाताना कैलास हुंबाडे यांच्या डोळ्यात अतीव समाधानाचे अश्रू दाटले होते. ठरल्याप्रमाणे 24 जानेवारी 2019 रोजी राजाभाऊंनी वैभवच्या खात्यावर ऑनलाईन पैसे पाठवले. त्याने पैसे मिळाल्याचे फोनवर सांगितले आणि आभार व्यक्त केले. त्यानंतर 31 जानेवारी 2019 ला राजाभाऊंना वैभवचा मेसेज आला. त्यात वडील कैलास हुंबाडे यांचे निधन झाल्याची वार्ता होती. राजाभाऊंना धक्काच बसला. सगळे अचानकच झाले. कैलास हुंबाडेंना मधुमेह होता. त्यात रक्तदाब कमी झाला आणि ते देवाघरी गेले. म्हणजे देवाने वैभवला आणि त्याच्या भावंडांना दिशा परिवाराच्या स्वाधीन केले. आता दिशा परिवारची जबाबदारी आणखी वाढली आहे. ती जबाबदारी पार पाडायला देव निश्‍चितच बळ देईल. अशा घटना अधूनमधून घडत असतात. मात्र, दिशा परिवारचे दाते पुढे येऊन संकटातून मार्ग काढतात. त्यामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक वाटचाल सुरळीत सुरू राहते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)