#चिंतन : एक कृतज्ञता सोहळा… 

डॉ. दिलीप गरूड 
तीन वर्षांपूर्वीची, म्हणजे 2015 सालातील गोष्ट. पुण्याच्या नूतन मराठी विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी “गेट टुगेदर’ करायचं ठरवलं. बरोबर पन्नास वर्षांपूर्वी म्हणजे 1965 साली जे विद्यार्थी मॅट्रिकच्या वर्गात होते, त्यांनी एकत्र यायचं ठरवलं. मग मणी चितळे, डॉ. शरद कुंटे, उद्योजक आळेकर अशी आता नामांकित असलेली, पण 1965 साली विद्यार्थी असलेली ही मुले एकत्र जमली. त्यांनी त्यावेळच्या आपल्या बॅचच्या विद्यार्थ्यांची यादी तयार केली. कोण कुठे आहे त्यांचा पत्ता मिळवला. फोन नंबर्स मिळवले. त्यांच्याशी संपर्क साधून माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्याची कल्पना मांडली. सर्वांनी ती कल्पना उचलून धरली. त्यावेळची ही मुले म्हणजे आताचे पासष्टीच्या पुढचे प्रौढ लोकच होते. हे प्रौढ लोक मोठमोठ्या पदावर कार्यरत होते. प्रत्येकजण आयुष्यात यशस्वी झाला होता. पैसा, मान, कीर्ती, प्रसिद्धी याच्या पलीकडे हे लोक गेले होते. कुणी परदेशात स्थिरस्थावर झाले होते. त्यांचा एकत्र येण्याचा उद्देश हाच की ज्या गुरुजनांनी आपणाला शिकवलं त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची. जुन्या स्मृतींना उजाळा द्यायचा. छानपैकी गप्पा मारायच्या आणि पुन्हा पुन्हा भेटत रहायचं याचं वचन द्यायचं.
पुण्याच्या आपटे रोडवरच्या श्रेयस हॉटेलमध्ये सर्वांनी जमायचं ठरलं. हॉटेलच्या टेरेसवर कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं. मणी चितळे या विद्यार्थ्याचंच ते हॉटेल होतं. आता तो त्या हॉटेलचा मालक झाला होता. कुणी कोणती जबाबदारी पार पाडायची ते ठरलं होतं. कार्यक्रमासाठी डॉ. न.म. जोशी, बा. ना. अभ्यंकर आणि ज.गं. फगरे या शिक्षकांना आणण्याचे ठरले होते. हे तीनच शिक्षक हयात होते आणि येण्यासारख्या अवस्थेत होते. बाकीचे शिक्षक हे जग सोडून गेले होते. जे शिक्षक हयात होते तेही ऐंशीच्या पुढच्या वयाचे होते. या कार्यक्रमासाठी 78 विद्यार्थी उपस्थित होते.
ठरल्याप्रमाणे शिक्षकांच्या घरी गाड्या पाठवून त्यांना सन्मानाने कार्यक्रमस्थळी आणण्यात आले. औक्षण करून त्यांच्या कपाळी कुंकुमतिलक लावण्यात आला. फुलांच्या पाकळ्या उधळून त्यांचे स्वागत करण्यात आले. प्रवेशद्वारी छान रांगोळी रेखली होती. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर अपूर्व असा आनंद होता. हे प्रौढ विद्यार्थी, शरीराने थकलेल्या आपल्या शिक्षकांकडे पहात होते, तर शिक्षक या विद्यार्थ्यांकडे पूर्वीची ओळखीची खूण सापडते का त्याचं निरीक्षण करीत होते.
एके काळी अर्ध्या विजारीत आणि पांढऱ्या शर्टात वावरणारे हे विद्यार्थी प्रौढ झाले होते. बहुतेकांना चष्मा लागला होता. कुणाचे डोक्‍यावरचे केस उडाले होते. कुणी दाढी राखली होती. कुणाच्या कानाला श्रवणयंत्र लागलं होतं. मग या प्रौढ विद्यार्थ्यांनी आपली पुन्हा नव्याने ओळख सांगितली. सध्या काय काम कतात ते सांगितलं. शाळेतल्या आठवणींना उजाळा दिला. शिक्षकांच्या शिकविण्याच्या लकबी सांगितल्या. शिकवण्याच्या नकला करून दाखवल्या. प्रत्येकाने हसून दाद दिली. तो आनंदसोहळाच होता.
मग शिक्षकांनी आपली मनोगते व्यक्त केली. पुन्हा एकदा या प्रौढ विद्यार्थ्यांना भरभरून आशीर्वाद दिले. मग कृतज्ञता म्हणून या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, रोप आणि कृतज्ञतेचं एक पाकीट त्यांना देण्यात आलं. एक विद्यार्थी म्हणाला, “”सर, हे पाकीट इथं उघडू नका. घरी गेल्यावर उघडा आणि या पैशांनी तुम्ही चैन करा. आयुष्यात काही अडचण आली तर केव्हाही बोलवा. अगदी रात्री बारा वाजताही बोलवा. आम्ही येऊ. संकोच करू नका.
खरं सांगायचं तर, आज आम्ही जे काही आहोत ते तुमच्यामुळे.” हे म्हणताना त्यांचा स्वर अभिमानाने फुलून आला होता. कृतज्ञता सोहळ्यानंतर जेवणं झाली. गप्पा झाल्या. ख्यालीखुशाली विचारून झाली. मग डॉ. न. म. जोशी, वा. ना. अभ्यंकर आणि ज. गं. फगरे या गुरुवर्यांना त्यांच्या घरी गाडीत बसवून सोडण्यात आले. गुरुवर्यांनाही आनंद वाटला. आपण रोपांना घातलेलं पाणी अगदीच वाया गेलं नाही, तर ती रोपं तरारलीत, त्यांचे वृक्ष झालेत, ते येणाऱ्या जाणाऱ्या पांथस्तांना सावली देताहेत, याचं एक दाट समाधान गुरुवर्यांच्या चेहऱ्यावर झळकलं. शिक्षकांना याच्यापेक्षा वेगळं काय हवं असतं? आपले विद्यार्थी जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात मोठं काम करताहेत, त्यांच्या हातून समाजसेवा आणि देशसेवा घडतेय हेच कोणत्याही शिक्षकाला अपेक्षित असतं. म्हणूनच विद्यार्थ्यांनी आयोजित केलेला हा कृतज्ञता सोहळा पाहून या गुरुवर्यांना अपार आनंद झाला. तो आनंद शब्दातीत होता.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)