चार वर्षांत एकही भ्रष्टाचार नाही

रावसाहेब दानवे : कॉंग्रेस-राष्ट्रवादीकडून जनतेला संभ्रमित करण्याचा प्रयत्न
मुंबई – भाजप सरकारच्या गेल्या चार वर्षाच्या कार्यकाळात एकही भ्रष्टाचाराचे प्रकरण विरोधकांच्या हाती लागलेले नाही. त्यामुळे कॉंग्रेसने समाजात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. जनतेला आपल्या बाजूने घेण्यात अपयश आल्याने आता कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस जनतेला संभ्रमित करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी ठणकावून सांगितले.

रंगशारदा येथे भाजपाच्या प्रदेश कार्यकारीणी समितीची दोन दिवसीय बैठक सुरू आहे. त्यावेळी पत्रकार परिषदेत दानवे बोलत होते. राजकीय आणि शेतीविषयक प्रस्ताव बैठकीत संमत करण्यात येत असल्याचे सांगून रावसाहेब दानवे म्हणाले, राजकीय ठरावात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली गेल्या चार वर्षात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्‌दल सरकारचे अभिनंदन करण्यात आले आहे. गेल्या चार वर्षांत भ्रटाचाराचे एकही प्रकरण हाती न लागल्याने कॉंग्रेसने समाजात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण भाजपा या प्रयत्नांना कदापी यशस्वी होउ देणार नाही. त्यांना जशास तसे प्रत्युत्तर देउन हे प्रयन हाणून पाडू, असे दानवे यांनी स्पष्ट केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आरोप झाल्यानंतर स्वतःहूनच मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. आता राज्यात होणा-या मंत्रीमंडळ विस्तारात एकनाथ खडसे यांच्या नावाचा निश्‍चित विचार करण्यात येणार असल्याचेही दानवे यांनी सांगितले.

मधू चव्हाण प्रकरणी पोलीस चौकशी
भाजपा प्रवक्ते मधू चव्हाण यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे. त्याबाबत पत्रकारांनी विचारले असता रावसाहेब दानवे म्हणाले, मधू चव्हाण यांच्यावर या प्रकरणी आधी दोन वेळा आरोप झाला होता. मात्र पोलिसांना प्रकरणात तथ्य न वाटल्याने केस बंद झाली होती. आता न्यायालयात प्रकरण असल्याने केस नोंदविण्यात आली आहे. संबंधित महिलेने आपल्याला पत्र लिहिले होते. मी स्वतः मधू चव्हाण यांच्याशी एक वर्षापूर्वी या प्रकरणी बोललो होतो.

पुन्हा एकदा मी त्यांच्याशी बोलेन. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. त्यानंतरच निर्णय घेण्यात येईल. भाजपाचे दुसरे प्रवक्ते आमदार राम कदम यांच्या वक्तव्याबद्‌दल देखील त्यांना पक्षातर्फे समज देण्यात आली होती. त्यांच्या वक्तव्याला पक्षाने कधीच पाठिंबा दिलेला नाही, असेही दानवे म्हणाले.

समविचारी पक्षांशी युती करणार
शिवसेना असेल वा इतर समविचारी पक्ष असतील त्यांच्यासोबत आगामी निवडणुकांत युती करण्यात येणार आहे. 2014 साली जे पक्ष आमच्यासोबत होते त्यांच्यासोबत येत्या निवडणुकीतही युती करण्यात येणार असल्याचे रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)