चार नेत्यांमुळे ‘आघाडीत बिघाड’

देशातील चार महत्त्वपूर्ण राज्यांमधील चार नेत्यांच्या पक्षबदलांमुळे निवडणुकीची गणितेच पालटली आहेत. उत्तर प्रदेशामध्ये नसीमुद्दीन सिद्दीकी यांना सोबत घेण्याची किंमत कॉंग्रेसला समाजवादी पक्ष-बहुजन समाज पक्ष आणि राष्ट्रीय लोकशाही दल यांच्या महागठबंधनपासून बाहेर राहण्यात चुकवावी लागली. पश्‍चिम बंगालमध्ये खासदार मौसम नूर यांनी कॉंग्रेस पक्षाला बायबाय करून तृणमूल कॉंग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला. पण या निर्णयामुळेच पश्‍चिम बंगालमध्ये कॉंग्रेस आणि तृणमूलमध्ये निवडणूकपूर्व आघाडी होऊ शकली नाही.

वैजयंत जय पांडा यांच्या पक्षबदलामुळे ओडिशामध्ये भाजपा आणि बीजू जनता दलामध्ये निवडणूक पूर्व आघाडीच्या रणनीतीवर आणि अपेक्षांवर पाणी फेरले गेले. तेलंगणामध्ये जितेंद्र रेड्डींनी एकाएकी पक्ष बदलल्यामुळे निवडणुकांनंतर टीआरएस आणि भाजपा यांच्यामध्ये होऊ शकणाऱ्या संभाव्य युतीवर विरजण पडले.

उत्तर प्रदेशात बसपाने कॉंग्रेसपासून विभक्‍त होत निवडणुका लढवण्याचा निर्णय घेण्याचे कारण चंद्रशेखर रावण यांनी प्रियांका गांधींची भेट आणि शिवपाल यादव यांच्या पक्षाशी आघाडीची शक्‍यता पडताळून पाहणे हे होते. अर्थात, बसपाने कॉंग्रेसपासून चार हात लांब राहण्याचा निर्णय तेव्हाच घेतला जेव्हा फेब्रुवारी 2018 मध्ये कॉंग्रेसने बसपामधून हकालपट्टी करण्यात आलेल्या नसीमुद्दीन यांना पक्षात सामील करून घेतले. या मुद्द्यावरून मायावती इतक्‍या नाराज आणि संतापलेल्या होत्या की, समाजवादी पक्षासोबतच्या चर्चेमध्ये त्यांनी आपल्या गठबंधनमध्ये कोणत्याही परिस्थितीत कॉंग्रेसला स्थान नसावे अशी अटच घातली होती.

अशाच प्रकारे ओडिशामध्ये भाजपा आणि बीजू जनता दलामध्ये निवडणूूकपूर्व आघाडी करण्याबाबत चर्चा सुरू होत्या. मुख्यमंत्री नवीन पटनायक हे विधानसभा निवडणुकांमध्ये आपल्या पक्षाला पाठिंबा देण्याच्या मुद्द्यावरून भाजपाला लोकसभेच्या अर्ध्या जागा सोडण्यास तयारही झाले होते. या चर्चांमध्ये नवीन पटनायक यांच्या उत्तराधिकाऱ्याची चर्चाही झाली होती. याचदरम्यान बीजू जनता दलातून काढून टाकण्यात आलेले खासदार वैजयंत जय पांडा यांनी भाजपात प्रवेश केला. या मुद्द्यावरून बीजेडी आणि बीजेपीमधील जुळू लागलेले धागे तुटण्यास सुरुवात झाली. काही दिवसांतच हे धागे तुटले. आता तर बीजेडी आणि भाजपाच्या निवडणुकीनंतरच्या संभाव्य आघाडीवरही प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहे.

तिकडे पश्‍चिम बंगालमध्ये दोन महिन्यांपूर्वी तृणमूल आणि कॉंग्रेस यांच्यामध्ये आघाडीची चर्चा चांगल्या प्रकारे सुरू होती. चर्चेच्या तीन फेऱ्याही झाल्या होत्या. याचदरम्यान खासदार मौसम नूर यांनी तृणमूल कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. या मुद्दयावरुन कॉंग्रेस प्रचंड चिडली. तेव्हापासून दोन्ही पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप आणि वादावादी सुरुवात झाली. संबंध इतक्‍या विकोपाला गेले की शारदा चिटफंड घोटाळा प्रकरणी कॉंग्रेसने थेट ममता बॅनर्जी यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करत संसदेत त्यांच्यावर हल्लाबोल केला.

तेलंगणामध्ये टीआरएसने भाजपा नेतृत्वाला लोकसभा निवडणुकांनंतर पाठिंबा देण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र दरम्यानच्या काळात टीआरएसचे संसदीय पक्षनेते जितेंद्र रेड्डी भाजपामध्ये सामील झाले. साहजिकच त्यावरून टीआरएसचे प्रमुख आणि मुख्यमंत्री चंद्रशेखर राव हे नाराज झाले. ही नाराजी आणि राग इतका वाढला की त्यांनी थेट सर्जिकल स्ट्राईकचे राजकारण करत असल्याचा आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच लक्ष्य करायला सुरुवात केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.