चारा पीक जगविण्यासाठी पाण्याचे खाजगी टॅंकर

35 ते 40 टॅंकरने पाणीपुरवठा

मंचर- डिंभा उजव्या कालव्यावर शेवाळवाडी येथून सातगाव पठारसाठी तर लोणी धामणी परिसरासाठी धामणीखिंड येथून पाण्याचे खाजगी टॅंकर भरुन जनावरांचा हिरवा चारा जगविण्यासाठी शेतकरी नेत आहेत. उन्हामुळे पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात भासत असल्याचे शेतकरी बांधवांनी सांगितले.

आंबेगाव तालुक्‍यात यंदा पुरेसा पाऊस न झाल्याने सातगाव पठार आणि लोणी धामणी परिसरातील जनावरांचा हिरवा चारा जगविण्यासाठी पाण्याचे खाजगी टॅंकर सुरू झाले आहेत. 35 ते 40 टॅंकरने पाणीपुरवठा होत आहे. सातगाव पठार भागातील शेतकरी टॅंकरने पाणी आणून पिके जगविण्याचा प्रयत्न करीत आहेत. तालुक्‍यात दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे. उसाचे क्षेत्र आहे; परंतु यंदा पाऊस कमी झाल्याने मार्च महिन्यातच विहिरींनी तळ गाठला आहे. सातगाव पठारावर वाटाणा, मिरची, शाळु ही पिके पाण्याच्या टॅंकरवर काढली जातात. सध्या जनावरांसह माणसांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर बनला आहे.

सातगाव पठारावरील सात ते आठ गावांना टॅंकरने पाणीपुरवठा होत आहे. येथील पिके जगविण्यासाठी शेवाळवाडी येथील उजव्या कालव्यावर पाण्याचे टॅंकर भरले जातात. तसेच पूर्व भागातील पहाडदरा, शिरदाळे, मांदळेवाडी, वडगावपीर आदी गावांना पाण्याचे टॅंकर धामणी खिंडीतील उजव्या कालव्यावर भरण्यात येतात. जनावरांसाठी हिरवा चारा, पाणी आणायचे कुठून असा प्रश्‍न शेतकऱ्यांना पडला आहे. पाण्यासाठी वणवण फिरावे लागत असल्याने शेतकऱ्यांनी दुभत्या गाई मिळेल त्या भावात विकण्यास सुरुवात केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.