चाकोरीबाहेरच्या चित्रपटांचा काळ म्हणजे सुवर्ण काळ

प्रसिद्ध चित्रपट निर्माते राहुल रवैल यांचे विचार

पणजी – 1970 च्या काळाने हिंदी चित्रपट क्षेत्रात नव्या कल्पना, नवे प्रयोग, नव्या जॉनरचे ऍक्‍शन चित्रपट अनुभवले. चाकोरीबाहेरच्या चित्रपटांचाही तो सुवर्णकाळ आणि नव्या तंत्राचाही उदयकाळ असल्याचे प्रसिद्ध चित्रपट निर्माते राहुल रवैल यांनी म्हटले आहे. 51 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, इफ्फीच्या “इन कन्व्हरसेशन’ या ऑनलाईन सत्रात ते “50, 60 आणि 70 या काळातली चित्रपट निर्मिती’ या विषयावर बोलत होते. हिंदी चित्रपट सृष्टीतल्या परिवर्तनाचा मनोहारी प्रवास त्यांनी प्रतिनिधींना घडवला.

60 मध्ये के असिफ आणि मेहमूद यांच्यासारख्या मान्यवरांनी भव्य सेट सह चित्रपट निर्मिती केली. त्यानंतर 70 मध्ये चित्रीकरण स्थळी 25-30 दिवसात चित्रीकरण करत बाबुराम इशारा यांच्या “चेतना’ ने क्रांती घडवली. त्या काळात ही बाब असाधारण होती. 70 च्या सुवर्णकाळात हिंदी चित्रसृष्टीची जोमाने वाढ होत असताना “जंजीर’ या चित्रपटात अमिताब बच्चन यांनी साकारलेला “चाकोरीबाहेरचा हिरो’ या जगताने पाहिला. यातून “अँग्री यंग मेन’ ही नवी संकल्पना उदयाला आली. त्या काळात चित्रपट तारे-तारका यांच्यात निकोप स्पर्धा असे. प्रत्येक अभिनेता एकापेक्षा एक वरचढ होता मात्र त्यांच्यात वैर नव्हते असे ते म्हणाले.

महान सचिन देव बर्मन यांनी “लैला मजनू’ या चित्रपटासाठी संगीत देणे आपल्याला शक्‍य नाही असे सांगून त्यासाठी मदन मोहन यांचे नाव त्यांनी सुचवले, या मनोवेधक प्रसंगाचे त्यांनी वर्णन केले. संगीतकार, महान गायक, गीतकार हे दिग्दर्शका समवेत एकत्र बसून कथानक जाणून घेत चित्रपट अधिक सरस व्हावा यासाठी कोणत्या अभिनेत्यासाठी गाणे आहे याचीही माहिती घेत असत. प्रेक्षकही नव्या प्रकारचे सिनेमे अनुभवत होते. 80 मध्ये नवे लोक आले आणि आधीचे दिग्गजांनीही काम सुरु ठेवले. याकाळात सुभाष घई, शत्रुघ्न सिन्हा यांच्यासह इतर दिग्गज आले. रवैल यांनी अर्जुन चित्रपट केला आणि कथानक नव्हे तर व्यक्तिरेखेचे प्राबल्य असलेल्या चित्रपटांचा जमाना आला.

अर्जुन साठी जावेद अख्तर यांनी सलग 8 तास कथानक लिहिले याची आठवण त्यांनी सांगितली. खलनायकाच्या भूमिकेसाठी ओळखल्या जाणाऱ्या अमजद खान यांना रवैल यांनी विनोदी भूमिकेसाठी निवडले. या निर्णयाबाबत काहींनी शंका उपस्थित केली, मात्र महान कथानक नेहमीच चालते हा आपले गुरु राज कपूर यांचा मंत्र लक्षात ठेवून त्यांनी निर्णय घेतला. 70 आणि 80 च्या काळात सिने सृष्टीची मोठी वाढ झाली मात्र अजूनही यात वाढ होत असल्याचे त्यांनी समारोप करताना सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.