चाकण बसस्थानक नावालाच!

अनधिकृत वाहनाचे अधिकृत वाहनतळ : स्वच्छतागृह कधी सुरू कधी बंद

चाकण- पुणे व पिंपरी-चिंचवड शहराच्या जवळच असणारे चाकण निमशहरी झाले आहे. औद्योगिक वसाहत म्हणून जगाच्या नकाशावर अल्पवधीत स्वतःची ऑटो हब ही ओळख निर्माण केलेले चाकण आता झपाट्याने आपला विस्तार वाढवू लागले आहे. एवढ्या मोठ्या औद्योगिक वसाहतमध्ये असणारे येथील बसस्थानक म्हणजे केवळ नावालाच शिल्लक असल्याचे चित्र आहे. तसेच अनधिकृत वाहनाचे अधिकृत वाहनतळ, भाजीपाला बाजार, कचराकुंडी झाले आहे. अनेक स्वयं घोषित पुढारी, सामाजिक कार्यकर्ते आदींच्या वाहनामुळे तसेच स्थानकाच्या आवारात बिनधास्तपणे बसणाऱ्या भाजीपाला व तस्तम व्यवसायिकांकडे येणाऱ्या ग्राहकांची वाहनामुळे बसस्थानकाच्या आवारात एक-दोन स्थानिक वाहतूक करणाऱ्या एसटी बस वगळता दुसऱ्या बस स्थानकात दिसत नाहीत.

सुमारे सहा वर्षांपूर्वी चाकण बसस्थानकाचे नूतनीकरण करण्यात आले. हे नूतनीकरण बांधा वापरा आणि हस्तांतर करा या तत्वावर झाले असल्याने बसस्थानकाच्या आवारात अनेक व्यापारी गाळे असून त्यांच्याकडे येणाऱ्या ग्राहकांची वाहने बसस्थानकाच्या आवारातच जागा मिळेल त्याठिकाणी उभी करतात. त्यामुळे पुणे-नाशिककडे जाणाऱ्या अनेक एसटी बसेस स्थानकाकडे न वळता महामार्ग रस्त्यावरून परस्पर जातात त्यामुळे प्रवाशांची अडचण, कुचंबणा होते. लांब पल्ल्याच्या मुंबई, नगर, बीड, औरंगाबाद याकडे जाणाऱ्या बसेस आवारात येतात, त्यामुळेतरी बसस्थानकाने आपले अस्तित्व टिकविले आहे.
बस स्थानकात बेकायदा वाहने लावणारी मंडळी चाकण शहर व परिसरातील काही नागरिक स्वत:ला मुरब्बी पुढारी, राजकारणी समजत असल्याने जाणीवपूर्वक याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप सामान्य नागरिक करत आहेत. या परिसरातील भाजीपाला विक्रेत्यांची महामार्गावरील दुतर्फा दूकाने असल्याने वाहतूककोंडी होत असल्याने जा-ये करणाऱ्या प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

रस्त्याच्या दुतर्फा बसणाऱ्या या भाजीपाला व्यावसायिकांना बसण्यास मनाई करणे अत्यंत गरजेचे आहे, अन्यथा एखाद्या दिवशी खूप मोठा अपघात होण्याची शक्‍यता नाकारता येणार नाही. कित्येकदा येथे भरणाऱ्या भाजीपाला बाजाराला बंदी घालण्यात आली होती. मात्र, काही दिवसांतच हा भाजीपाला बाजार सुरू झाला. कंत्राटी पद्धतीने चालवायला दिलेले शौचालयही कधी सुरू कधी बंद असते. त्याची व्यवस्थित स्वच्छता व निगा राखली जात नसल्याने प्रवाशांना नाक मुठीत धरून वापरावे लागत असल्याच्या तक्रारी वाढल्या असूनही प्रशासन लक्ष देत नसल्याने आश्‍चर्य व्यक्‍त केले जात आहे.

 थांबे “असून अडचण नसून खोळंबा’
ऍटो हब आणि कांदा मार्केट म्हणून प्रसिद्ध असलेले चाकणशहराकडे बाहेरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्या तुलनेत एसटी, पीएमपीच्या फेऱ्या जरी वाढल्या असल्या तरी त्या पुरेशा नाहीत. तसेच एवढ्या मोठ्या चाकण शहरात एक ही पीएमचा बस थांबा सुस्थित नाही किंवा योग्य ठिकाणी उभारले नसल्याने प्रवाशांना ऊन, वारा, पावसा पासून बचाव करता येत नाही. चाकण शहरात एक आंबेठाण चौक व दुसरा तळेगाव चौक असे दोनच बस थांबे असून त्याची अवस्था “असून अडचण नसून खोळंबा’ अशी आहे.

  • …तरीही प्रशासनाला जाग येत नाही
    चाकण बस स्थानकात असणाऱ्या बेकायदा वाहनतळ व बसस्थानकाच्या दुतर्फा बसणाऱ्या किरकोळ भाजी विक्रेत्यांमुळे भाजी खरेदी करत असताना स्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ गंभीर अपघात झाले आहेत. किरकोळ अपघात तर अधूनमधून होतच असतात, तरीही संबंधित प्रशासनाला जाग येत नाही हे विशेष म्हणावे लागेल.
  • आठ महिन्यांनंतरही कार्यालय “जैसे थे’
    चाकण येथे 30 जुलै 2018 रोजी झालेल्या आंदोलना दरम्यान काही समाजकंटकानी चाकण बसस्थानकाच्या कार्यालयाची तोडफोड केली. या घटनेला आठ महिने उलटून गेले तरी एसटी महामंडळाने अजूनही त्या जळीत तोडफोड झालेल्या कॅबिनची दुरूस्ती केली नाही. किंवा ते पूर्ववत करण्यासाठी गेल्या आठ महिन्या मध्ये काही प्रयत्न ही नाही यावरूनच सम्बधित विभागाची उदासीनता दिसून येते.तसेच वाहतूक नियंत्रण कक्ष नसल्याने प्रवाशांना नाहक मनस्ताप सोसावा लागत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.