चाकण नगराध्यक्षपदाची उत्सुकता शिगेला

उद्या होणार फैसला


कार्यकर्त्यांनी लावल्या रोख रकमेपासून चमनगोटा करण्यापर्यंत पैजा

चाकण- अडीच वर्षांचा कार्यकाल संपल्याने चाकण नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी मंगळवारी (दि. 29) मतदानाने निवडणूक होत असून, नगराध्यक्षपदी कोण विराजमान होणार?, कोण होणार चाकणचा बाजीगर? याचा फैसला होणार आहे. यासाठी चाकण शहरातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी रोख रकमेपासून चमनगोटा करण्यापर्यंत पैजा लावल्या आहेत. त्यामुळे चाकण नगराध्यक्षपदाबाबत उत्सुकता शिगेला पोहचली आहे. पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडून चाकणच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष या दोन्ही पदांच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर केल्याने या पदासाठी इच्छुक असलेल्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे.

चाकण नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाकरिता शेखर श्रीराम घोगरे, स्नेहा नितीन जगताप या शिवसेनेच्या दोन दिग्गज उमेदवारांसह भाजपच्या सुरेखा मनोहर गालफाडे हे तिघेजण निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे या पदासाठी मोठी रस्सीखेच होण्याची शक्‍यता आहे. मंगळवारी (दि. 29) दुपारी साडेबारा वाजता नगराध्यक्ष निवडीसाठी विशेष सभा बोलावण्यात आली आहे. तर उपनगराध्यक्ष पदाची निवडसुद्धा नगराध्यक्ष पदाच्या निवडीनंतर लगेचच दुपारी एक वाजता होणार आहे. चाकणला नव्याने स्थापन झालेल्या चाकण नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी पहिल्या अडीच वर्षाचे आरक्षण हे महिलांसाठी राखीव होते. हा कार्यकाल शिवसेनेने माजी नगराध्यक्षा पूजा साहेबराव कड आणि विद्यमान नगराध्यक्षा मंगल गोरे यांच्यात विभागून दिला होता. आता हे पद पुढील अडीच वर्षांसाठी अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या प्रवर्गातील दोन नगरसेवक सत्ताधारी शिवसेनेचेच आहेत. शिवसेनेचे नगरसेवक शेखर घोगरे व नगरसेविका स्नेहा नितीन जगताप हे दोघेही याच प्रवर्गातील आहेत. याशिवाय नगरपरिषदेत सत्ताधारी सेनेच्या सोबत असलेल्या भाजपच्या एकमेव नगरसेविका सुरेखा गालफाडे याच प्रवर्गातील आहेत. नगराध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी आरक्षित असल्याने व या प्रवर्गातील उमेदवार नगरपरिषदेतील विरोधीपक्ष असलेल्या राष्ट्रवादीकडे नसल्याने शिवसेनेला पुढील काळात नगराध्यक्ष निवडीसाठी अडचण येणार नसल्याची चर्चा नगरपरिषद वर्तुळात आहे. मात्र, चाकणच्या या दोन्ही पदावर कोण विराजमान होणार? याची उत्सुकता नागरिकांना लागली आहे.

सव्वा वर्षाचा कालावधी?
सत्ताधारी हे सेनेच्या दोन आणि सहयोगी अपक्ष सदस्यांशी चर्चा करून संबंधित प्रवर्गातील कोणत्या नगरसेवकांची वर्णी लावणार, की संबंधित दोन्ही नगरसेवकांना सव्वा-सव्वा वर्षांचा कालावधी देणार, याकडे संपूर्ण चाकणकरांसह नगरसेवकांचे लक्ष लागले आहे.

उपनगराध्यक्ष पदासाठी जोरदार रस्सीखेच
चाकण नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. अपक्ष नगरसेवक प्रकाश भुजबळ, प्रकाश गोरे यांच्यासह चाकण नगरपरिषदेतील गटनेते व युवा उद्योजक किशोर शेवकरी यांची नावे उपनगराध्यक्ष पदासाठी चर्चेत आहेत. मात्र, यापैकी किशोर शेवकरी यांच्या नावाची या पदाकरिता जोरदार चर्चा असून, त्यांचे नाव आघाडीवर असल्याचे समजते. हे पद कसल्याही परिस्थितीत आपल्या पदरी पाडून घ्यायचेच असा निर्धार वरील इच्छुकांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)