चाकण नगरपालिकेचा गड शिवसेनेने राखला

चाकण- चाकण शहराच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेचे शेखर घोगरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली . घोगरे हे चाकण नगरपरिषदेचे तिसरे नगराध्यक्ष आहेत. तर उपनगराध्यक्षपदी शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार प्रकाश गोरे यांची 14 विरुद्ध 9 निवड झाली. अटीतटीच्या राजकीय खेळीत शिवसेनेने गड राखण्यात यश मिळविले.
ऑटो हब म्हणून जगाच्या नकाशावर झळकणाऱ्या चाकण नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाचा अनपेक्षीत निकाल लागणार का याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. दरम्यान, तत्कालीन नगराध्यक्ष मंगल गोरे यांनी आपला पदाचा राजीनामा दिल्यानंतर अनुसूचित जातीसाठी राखीव नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेचे शेखर घोगरे यांच्यासह स्नेहा जगताप (शिवसेना) सुरेखा गालफाडे (भाजप) यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते .जगताप व गालफाडे यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर शेखर घोगरे यांची नगराध्यक्ष म्हणून निवड झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. दरम्यान, उपनगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीकडे 7 सदस्य संख्या असताना दोन नगरसेवकांना आपल्या बाजूकडे वळविण्यात शिवसेनेला यश आले, त्यामुळे उपनगराध्यक्ष पदाच्या झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी पुरस्कृत प्रकाश भुजबळ यांना 9 तर शिवसेनेचे प्रकाश गोरे यांना 14 मते मिळाली. संवेदनशील व संभ्रमाचे वातावरण असताना देखिल शिवसेनेचा गड अभेद्य राहिला.
नगरसेवकांमध्ये विकास कामाच्या मुद्‌द्‌यावरून नाराजी असल्याचे स्पष्टपणे जाणवले विशेषतः चाकण बाजार पेठेतील रस्ता, कचरा समस्या आदी समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नगरसेवक करत आहेत. याच मुद्याला अनुसरून दोन नगरसेवक विरोधात गेले असल्याची चर्चा सर्वत्र सुरू होती. संभाव्य उपनगराध्यक्ष अशी प्रतिमा असणाऱ्या शिवसेनेचे गटनेते किशोर शेवकरी यांना डावलण्यात आल्याने ते नाराज आहे का? की वेगळी काय भूमिका घेता का? याकडे आता साऱ्यांचे लक्ष लागले आहे. संवेदनशिल वातावरणात सुरू असलेल्या निवडणुकीसाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. प्रांताधिकारी आयुष प्रसाद व मुख्याधिकारी अशोक साबळे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)