चर्वित्‌चरण 

– हिमांशू 

झालं! पुन्हा एकदा हरिदासाची कथा मूळपदावर! कुठल्याही निवडणुकीसाठी मतदान झालं रे झालं की लगेच इलेक्‍ट्रॉनिक मतदानयंत्रांची चर्चा सुरू! आता हा परिपाठ झालाय. अगदी “तुमच्या काळात काय घडलं,’ असं नेहमी विचारणारेसुद्धा आपण पूर्वी घेतलेले आक्षेप विसरून भांडायला तयार! काहीजण म्हणतात, जिंकणारा ईव्हीएमचं समर्थन करतो आणि हरणारा आक्षेप घेतो. पण खरी परिस्थिती अगदी उलट आहे. राजकारणातले चाणाक्ष लोक खासगीत म्हणतात, हाच खरा ओपिनियन पोल! जी पार्टी ईव्हीएमच्या नावानं खडे फोडते, ती हरणार हे नक्की समजावं! भंडारा-गोंदिया आणि पालघरच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू झालं आणि लगेच ईव्हीएमची चर्चा सुरू झाली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अर्थात, यावेळी परिस्थिती जरा वेगळी होती. मोठ्या संख्येनं ईव्हीएम बंदच पडली म्हणे! खरंतर भारतातली ईव्हीएम जगात भारी, असं सर्टिफिकेट खुद्द न्यायालयानंही दिलंय. मग ती अशी पटापट बंद का पडली? या प्रश्‍नाचं उत्तर देताना प्रशासनानं आकाशाकडे बोट दाखवलं. आकाशात तळपता सूर्य. म्हणजे उन्हाळा जास्त असला, तर तो ईव्हीएमना सहन होत नाही, हा निष्कर्ष! असं असेल तर निवडणूक केंद्रंच एसी करायला हवीत. त्या निमित्तानं लोक मतदानाला तरी येतील. एवढी यातायात करून अवघं 46 टक्के मतदान होत असेल, तर उपयोग काय? मतदानयंत्रांना विरोध करणारी मंडळी लगेच म्हणाली, लोकांचा यंत्रांवर विश्‍वास उरलेला नाही. काहीजण म्हणाले, जितकं मतदान होतं, तितकं यंत्रावर दिसत नाही.

आपल्याकडे मुख्य प्रश्‍न बाजूला राहून केवळ चर्वित्‌चरण होत राहतं, हा अनुभव जवळजवळ प्रत्येक बाबतीत येतो. मतदानयंत्रांना विरोध आहे तर निवडणुकीच्या आधीच तो का प्रकट होत नाही? त्यावेळी राजकारणी मंडळी फोडा-झोडा आणि अन्य “महत्त्वाच्या’ कामात व्यस्त असतात, असं मानायचं का? अखेरच्या क्षणापर्यंत मतांच्या जुळणीसाठी सगळ्या पक्षांचे खास प्रयत्न सुरू होते, असं मतदानाच्या आधीचं वृत्त आहे. नंतर चर्चेची गाडी थेट ईव्हीएमच्या रुळावर आली. खरंतर निवडणुका जाहीर होताच मतदानयंत्रांना विरोध का केला जात नाही? आणि मतदानयंत्रांना गरम हवा सहन होत नाही हे आधी ठाऊक नव्हतं का? हे दोन महत्त्वाचे प्रश्‍न आहेत. पण प्रशासनानं सूर्याकडे बोट दाखवल्यावर विरोधकांनी सुरतेकडे बोट दाखवलं. यंत्रं तिथूनच का आणली, हा विरोधकांचा प्रश्‍न! म्हणजे, सूरतमध्ये काहीतरी गोलमाल करूनच यंत्रं आणली गेली, असा अप्रत्यक्ष आरोप! एवढं करून उद्या मतमोजणीत विरोधक जिंकले तर ते आपल्या भूमिकेवर ठाम राहतील का? निकालानंतर या मुद्द्यावर चर्चा पुढे सुरू राहील का?

असं होणार नाही. रात गयी; बात गयी, हा आपला शिरस्ता आहे. केवळ चर्वित्‌चरणासाठी आपल्याला विषय लागतात. पावसाळा जवळ आल्यामुळं असेच काही विषय पुन्हा चर्चेत आहेत. मुंबईत पाणी तुंबणार का? तुंबलंच तर त्यासाठी कुणाला जबाबदार धरायचं? या प्रश्‍नांचा फुटबॉल सुरू झालाय. आता खंडाळ्याच्या घाटातल्या दरडींचा विषयही असाच ऐरणीवर आलाय. मुळात मुंबईत पाणी का तुंबतं आणि एक्‍स्प्रेस वेवर दरड का कोसळते, यावर चर्चाच नकोय आपल्याला. कारण ती झाली तर विषयच संपून जाईल. मग बोलणार कशावर?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)