#चर्चेतील चेहरे: जाणून घ्या…’विजय चव्हाण’ यांच्याबद्दल  

मराठी रंगभूमीवर स्त्रीपात्रातून कॉमेडी साकारणारे विख्यात कलाकार अर्थात “मोरूची मावशी’ विजय चव्हाण यांचे या आठवड्यात देहावसान झाले. आपल्या अफलातून टायमिंग आणि विनोदाची कमाल उंची गाठत असतानाच कोठेही अश्‍लीलतेला स्पर्शही न करणारे विजय चव्हाण यांच्या “मावशी’ने रंगभूमीला किमान दोन दशके हसवले. त्यांच्या या नाटकाचे तब्बल 2 हजार प्रयोग झाले. त्यांच्या नंतर त्याच धर्तीचे रोल सचिन पिळगावकर, लक्ष्मीकांत बेर्डे आणि दिलीप प्रभावळकर यांनीही केले आणि प्रेक्षकांचे मनोरंजन केले. त्याबरोबर “तू तू मी मी’ या नाटकामध्ये त्यांनी वेगवेगळ्या 20 भूमिका साकारल्या होत्या.
विजय चव्हाण यांनी रंगमंच, सिनेमा आणि मालिका या तिन्ही व्यासपीठावर आपली विनोदी मुद्रा उमटवली. “जत्रा’, “झपाटलेला’, “पछाडलेला’, “मुंबईचा डबेवाला’, “माझा छकुला’ आणि “श्रीमंत दामोदरपंत’ यासारख्या विनोदी सिनेमांमधील त्यांच्या भूमिका खूप गाजल्या. त्यांनी एकूण 400 चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या होत्या. बहुतेक भूमिका विनोदी होत्या. तर काही अक्षरशः खलनायकीही होत्या. लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ आणि सचिन, महेश कोठारे या कलाकारांच्या काळात सातत्याने विनोदी भूमिकांसाठी त्यांच्या टीमचे सदस्य असलेले कलाकार विजय चव्हाण असत. सेटवर आणि सेटबाहेरही विजय चव्हाण यांचे टायमिंग अफलातून असायचे. अभिनय करण्याची त्यांची एक वेगळी शैली होती. कोणत्याही भूमिकेत चपखल बसत होते.
आजच्या नव्या कलाकरांनी त्यांच्याकडून हे कौशल्य शिकण्यासारखे आहे. लेखकाने जसा रोल लिहीला आहे, तसाच साकारण्याकडे त्यांचा कल असायचा. आपल्या मनची वाक्‍ये घुसवून हसा मिळवण्याचा त्यांचा स्वभाव नव्हता. त्यामुळेच त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी कधीही रोलसाठी ऑडिशन दिली नव्हती, असे सांगितले जायचे. कलाकार म्हणून विजय चव्हाण हे विजया मेहता यांना गुरुस्थानी मानायचे. विनोदी भूमिकांबरोबरच गंभीर भूमिकाही ते तितकेच जीव ओतून करत असत. विजय चव्हाण यांना अभिनयाचे बाळकडू आपल्या वडिलांकडून मिळाले होते. त्यांच्या वडिलांना व्ही. शांताराम यांच्याबरोबर काम करायचे होते. ते शक्‍य न झाल्याने विजय चव्हाण यांनी त्यांना मिळालेला व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार वडीलांना समर्पित केला होता.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)